बाबा आमटेंना आपण ओळखतो ते त्यांनी कुष्ठरुग्णासाठी उभारलेल्या
आनंदवनासाठी;पण त्यांचं काम तेवढ्यापुरतं मर्यादित नव्हतं. बाबांचा ‘भारत
जोडो यात्रा’ आणि ‘नर्मदा बचाव आंदोलन’ याच्यामधील सहभाग गांधींच्या
रचनात्मक संघर्षाचं द्योतक होता. बाबांच्या एकूण विचारात ‘श्रम’ या
संकल्पनेला विशेष महत्व दिलेलं आहे. त्यांच्या काही वाक्यांमधून,
घोषणांमधून हेच प्रतीत होत, जसं की-
‘श्रम ही है श्रीराम हमारा’
‘ हाथ लगे निर्माण में, नही मांगने, नही मारने’
“कष्ट करुन घामेजलेलं शरीर हेच परमेश्वराचं रुप आहे. खरोखरची क्रांती कधीच
विनाशकारी नसते.ख-या क्रांतीतून मोठं कार्य उभं रहातं. अशी क्रांती
रक्तलांछित नसते तर कष्टाच्या घामाने थबथबलेली असते.”
आनंदवन थोडं
स्थिरस्थावर झाल्यावर बाबांच लक्ष तरुणाईकडे गेलं. तरुणाई घडवणा-या
शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी त्यांनी जाणल्या आणि श्रमाचा तिरस्कार करणा-या
तरुणाईवर श्रमाचा संस्कार व्हावा म्हणून श्रमिक विद्यापीठाची कल्पना
त्यांना सुचली. त्यासाठी त्यांनी शासनाला जागेची मागणी केली. आनंदवनापासून
जवळच मूल तालुक्यात १८०० एकर जमीन देण्यात आली;पण तिथं लोक वस्ती करुन रहात
होते. बाबांनी त्या जमीनीचा त्याग केला नि महारोगी समितीला त्या ठिकाणी
१२५० एकर जमीन मिळाली तिथे तिथल्या सोमनाथ ( महादेव) मंदिरामुळं या
प्रकल्पाला सोमनाथ असं नाव पडलं. बाबांनी सोमनाथ हा ‘स्वयंपूर्ण शेतकी’
प्रकल्प म्हणून विकसित केला. सोमनाथ तर आता गांधींच्या स्वप्नातलं खेडं
बनलं आहे. सोमनाथमधले बरे झालेले कुष्ठरोगी त्यांची स्वतःची संसाधने, रक्त,
घाम माती, कष्ट वापरुन एकत्र राहतात. सोमनाथमध्ये कुष्ठरोग्यांनीच
धान्याचे कोठार उभारलं आहे नि सोमनाथमध्ये मत्स्यव्यवसाय,
दुग्धव्यवसाय..आदी शेतीपूरक व्यवसायांचंही केंद्र आहे.
बाबा
श्रमिक विद्यापीठ उभा करु शकले नाहीत ;पण सोमनाथची स्थापना झाल्यापासून
इस.१९६७ पासून श्रमसंस्कार छावणी शिबीर १५ मे ते २२ मे या काळात आयोजित
केलं जातं. हा देशभरातून आलेल्या तरुणांचा वार्षिक श्रमोत्सव असतो. इथं
वेगवेगळी कामं केल्यामुळं तरुणांमध्ये श्रमाचं मूल्य वाढीस लागतं.हे शिबीर
सकारात्मक श्रमसंस्कृती, धर्मनिरपेक्ष मूल्य, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण
संरक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, यासाठी प्रयत्नशील असते.
शिबीरात सहभागी असलेली मुलं विविध विषयातील तज्ञ व्यक्तींसोबत त्या विषयावर
चर्चा करत, प्रसंगी वादविवाद करतात. ही मुलं निरनिराळ्या
समाजसुधारकांबरोबर मोठमोठ्या द्रष्ट्या व्यक्तींबरोबर वेळ व्यतीत करतात.
शिबीरातील दैनंदिन कार्यक्रम असा असतो- सकाळी श्रमदान, दुपारी चर्चा व
वादविवाद आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम. बाबा असे म्हणत- शिबीरात
सहभागी झालेल्या १५०० युवक-युवतींपैकी एकाने जरी आपला वेळ, बुध्दी व शक्ती
विकासाच्या कामी खर्च केली तरी आपल्या शिबीराला प्रचंड यश मिळेल, असं मी
म्हणेन.”
आणि ते खरंच होत अशा कितीतरी यशाच्या गाथा सांगता येतील.
महाराष्ट्रात नामवंत म्हणून गाजलेली अनिल अवचट, नागेश हडकर,कुमार शिराळकर,
कुमार सप्तर्षी, दीनानाथ मनोहर, मुरलीधर शहा,अतुल शर्मा, सोमनाथ रोडे, अशोक
बेलखोडे, माधव बावगे, गिरीश कुलकर्णी ही सगळी मंडळी सोमनाथच्या मातीतून
घडलेली आहेत. २००८ साली मी पहिल्यांदा या शिबीराला गेलो होतो. त्यावर्षी
सोमनाथला बिबट्यांचा त्रास सुरु होता म्हणून शिबीर आनंदवनात झालं ते पहिलंच
शिबीर होतं. मी नववीत असताना ‘समिधा’ हे साधनाताई आमटे यांचं आत्मचरित्र
वाचलं. ती माझी आनंदवनाशी आणि बाबा आमटेंशी पहिली ओळख. ‘समिधा’ वाचल्यानंतर
मी खुओ भारावून गेलो होतो, वेडा झालो होतो.आनंदवन, सोमनाथ, लोकबिरादरी
प्रकल्प, हेमलकसा हे सर्व पाहण्याची बाबांना भेटण्याची तीव्र इच्छा मनात
जागृत झाली होती. समिधामध्येच मी शिबीराविषयी वाचलं होतं आणि तेव्हापासून
शिबीरात जायचं ठरवलं होतं. बाबांसोबत भामरागड साहस सहलीत, दुस-या भारत जोडो
यात्रेत आणि पंजाब शांतीयात्रेत सहभागी असलेले माधव बावगे हे आमच्या
कुटुंबाचे मित्र व शेजारी आहेत आणि स्वतः सोमनाथ शिबीराचे गेले काही वर्ष
संयोजक होते. त्यांच्याच माध्यमातून मी जायचं ठरवलं आणि तो योग
दहावीनंतरच्या सुट्ट्यांमध्ये आला;पण तत्पूर्वीच फेब्रुवारीमध्ये बाबांचे
निधन झाले होते. त्यांना प्रत्यक्ष पाहता आलं नाही, याचं दुःख आजही आहे.
विदर्भातला उन्हाळा तोपर्यंत फक्त पेपरमध्येच वाचला होता. प्रत्यक्ष तिथे
गेल्यानंतर ४० ते ४५ डिग्री कधीकधी ४८ डिग्री तापमान आम्ही अनुभवलं. अशा
कडाक्याच्या उन्हाळ्यात तिथं काम करण्याचं थ्रीलही होतं. पहाटे ४ वाजता
बाबांच्या गीतांनी शिबीर परिसराला जाग येते. पाच वाजेपर्यंत आवरुन चहा घेऊन
सगळे ध्वजाजवळ येतात. ध्वजवंदन झालं की ‘नौजवान आओ रे’, ‘जोडो भारत’ ही
गीतं गायली जातात. ग्रुप पाडून ग्रुपनिहाय कामं वाटून दिली जातात.
शेतातली उन्हाळ्यातली वेगवेगळी कामं, तलावातला गाळ काढणे, आनंदवन पध्दतीचे
बंधारे बांधणे, खोदकाम, स्वच्छता अशा प्रकारची कामं सांगितली जातात तर दोन
ग्रुप जेवणाच्या व्यवस्थेचं आणि निवासाच्या ठिकाणच्या स्वच्छतेचं काम
पाहतात.
श्रमदानानंतर आंघोळ करुन आराम झाल्यानंतर दुपारी मार्गदर्शन
असते तज्ञ व्यक्तीचे. संध्याकाळी सोमनाथ परिसरात फिरणं, खेळ..इ आणि मग
संध्याकाळी जेवण झालं की रात्री सांस्कृतिक कार्यक्रम. नृत्य, गाणं, नाटक,
पथनाट्य..अशा वेगवेगळ्या गोष्टी सादर होतात. तसंच वृक्षदिंडीसारखा एक अभिनव
कार्यक्रमही इथे सादर होतो. एका सजवलेल्या पालखीत वृक्ष ठेऊन पारंपरिक
वाद्यांचा गजर करत ही दिंडी शिबीर परिसरात फिरते व शिबीरात आलेल्या लहान
मुलांच्या हस्ते वृक्षारोपण होते.
या शिबीराने आम्हाला काय
दिलं,असेल तर या शिबीरामुळं आम्हाला समाजातल्या मुख्य समस्यांची ओळख झाली.
आपली समाजव्यवस्था अशी का आहे, प्रॉब्लेम्स काय आहेत..याविषयी विचार करायला
सुरुवात होते. शारीरिक कष्टाची कामे करणारी आपल्या आजूबाजूला असंख्य लोक
असतात. त्यांना समाजात हलक्या दर्जाचं समजलं जातं;पण इथं आम्हाला
श्रमप्रतिष्ठा हे मूल्य समजल. या सा-या श्रमिकांमुळेच, कष्टक-यांमुळेच देश
चालतो, ही बाब समजली.
त्यामुळे शिबीराहून परत आल्यानंतर मी शांत
राहिलो नाही. स्वस्थ बसलो नाही. वेगवेगळ्या सामाजिक चळवळींमध्ये आणि
उपक्रमांमध्ये मी सहभागी झालो. माझा अभ्यास सांभाळून मी शक्य तितके सक्रिय
राहण्याचा प्रयत्न करतो नि दरवर्षी शिबीराला जातो.
-घनःश्याम येनगे