Amazon

Thursday, April 16, 2015

तरीही वसंत फुलतो

प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो
तरीही वसंत फुलतो.......................!!

उमले फुले इथे जे, ते ते अखेर वठते
लावण्य, रंग, रूप, सारे झडून जाते
तो गंध, तो फुलोरा, अंती धुलिस मिळतो
तरीही वसंत फुलतो.......................!!

जे वाटती अतूट, जाती तुटून नाते
आधार जो धरावा, त्यालाच कीड लागे
ऋतू कोवळा अखेरी, तळत्या उन्हात जळतो
तरीही वसंत फुलतो.......................!!

तरीही फिरून बीज, रुजते पुन्हा नव्याने
तरीही फिरून श्वास, रचती सुरेल गाणे
तरीही फिरून अंत, उगमाकडेच वळतो.......
उगमाकडेच वळतो..........................!!

प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो
तरीही वसंत फुलतो.......................!!

   --- सुधीर मोघे

No comments:

Post a Comment