Amazon

Showing posts with label Just written. Show all posts
Showing posts with label Just written. Show all posts

Friday, June 6, 2025

पर्यावरण आणि चिंतन

   शीर्षक पाहिल्यावर वाटले असेल हा  चिंत्तन वगैरे कधीपासून करायला लागला. त्याच कारण असा आहे की मी दिलीप कुलकर्णी यांच " निसर्गाय" नावाचे शिबीर मार्च २०२४ मध्ये केलं. शिबीर करण्याचा योग्य कसा आला? ते मी नंतर सांगेन कधींतरी. 

     ते शिबीर म्हणजे एक युरेका मोमेन्ट आहे की काय असं वाटू लागले आहे. आनंद नाडकर्णी यांनी दिलीप कुलकर्णी यांची मुलाखत घेतलेली आहे , ती तुम्ही युट्युब वर पाहू शकता.  म्हणजे त्त्यांचे शिबीर केले त्यानंतर मी युट्युब वर त्यांच्या मुलाखती पहिल्या. लोक म्हणतात की वेळ नाही मिळत कशालाच, इतके आपण व्यस्त झालेलो असतो. पण जस जसे पर्यावरण/ निसर्ग याविषयी वाचन वाढले तस तसे कळून चुकले की आपल्या दररोजच्या सवयी मध्ये खूप बदल करण्याची गरज आहे . आपण सोशल मीडियाचा खूप वापर करतोय आणि ते हि काही ध्येय न ठेवता ( Mindless Scrolling )  आणि  ह्यामध्ये आपण ऊर्जा किती खर्च करतोय त्याविषयी न बोललेलच बरं आता तरी , त्यासाठी वेगळ लिहायचं आहे, ते मी नंतर लिहीन.  तर तशी ती सवय कमी केली की आपोआप रिकामा वेळ मिळू लागला. रात्री चांगली ११:०० ते सकाळी ७ ( किंवा १० ते ६ ) या वेळेत  झोप मिळू लागली. वाचन करण्यासाठी चांगला वेळ मिळू लागला. आणि त्यातून चिंतन करायला वेळ मिळाला.  आय टी एम्लपोयी  असल्यामुळे आपल्याला वर्षभरात काय काय केलं? कुठल्या चांगल्या गोष्टी शिकलो ? कुठले काम चांगले झाले ? यासाठी वर्षाच्या शेवटी एक मीटिंग असतेच की, त्याला आपण वार्षिक कामगिरी आढावा (Yearly performance review) म्हणतो. तस आपण स्वतःबद्दल कधी केलं आहे का? म्हणजे आपल्या सवयी , त्यात काय बदल हवेत म्हणजे स्वतः ला आणि समाजाला त्याचा काही उपयोग होईल? यातूनच माझे चिंतन वाढले आणि त्याच्यावर लिहायला सुरवात करावी म्हटले. याविषयी मी चिंतन करत होतो आणि आपल्या सवयी मध्ये किंवा जगण्यामध्ये शाश्वतता आणता येईल का असा विचार करत असताना काही बाबी मला खटकल्या. आपण खरंच स्वतंत्र आहोत का ?  किंवा आपण खरंच स्वयंपूर्ण आहोत का ?


आपण जे अन्न खातो त्याबाबती स्वयंपूर्ण आहोत का ?  


    पूर्वी  म्हणजे हरितक्रांतीच्या अगोदर जे देशी बियाणे  शेतकरी  पुढील वर्षीच्या पेरणीसाठी ठेवायचे तस आता होत आहे का ? आजूबाजूला सध्या शेती कशी होत आहे  आणि ती खरंच शाश्वत आहे का ? याचा प्रश्न पडतो. जे आपले आजोबा पणजोबा शेती करायचे किंवा त्याच्या अगोदरच्या पिढ्या ज्यांनी १० हजार वर्ष सातत्याने शाश्वत शेती केली. १० हजार वर्षांपासून शेती अस्तित्वात आहे, याचे पुरावे मिळतात.  आणि १० हजार वर्षे शेती केली होती म्हणजे ती शाश्वत आहे याचाच हा पूरावा.  हरितक्रांती झाली ती त्यावेळेची गरज होती पण नंतर ज्यावेळी परिस्थिती  चांगली झाली त्यावेळी आपण परत शाश्वत शेती कडे का आलो नाही , जी परंपरागत १० हजार वर्ष चालू होती. सध्या सहज पहिले तर नवीन शेती पद्धती मुळे  आपण कितीतरी देशी वाण गमावले आहे. जे आपल्या वातावरणाशी जुळवून घेऊन म्हणजे कमी पाण्यात वाढणारे असेल किंवा थंडीच्या दिवसात फक्त दवबिंदूंच्या पाण्यावर वाढणारे पीक असेल( पर्यावरणाचा नाश आणि त्यामुळे थंडी कशी कमी झाली आणि त्याचे शेतीवर होणारे परिणाम हे वेगळ सांगायला नको ). चांगली प्रतिकार शक्ती असणारे बियाणे असायचे.  आपण सर्वच गमावून बसलो आहोत. आपण सध्या रासायनिक खते , कीटकनाशके , हायब्रीड बियाणे  हे घेण्यासाठी सर्वस्वी दुसऱ्या कंपन्यांवर अवलंबून आहोत.  दरवर्षी आपल्याला नवीन बियाणे का खरेदी करावे लागते. जे पीक उगावल्यावर त्याचे बी फक्त खाण्यासाठी वापरू शकतो आणि परत नवीन रोप उगवण्याची क्षमता पिकवलेल्या बियाणांमध्ये नसते, असच संशोधन का बर झाले असेल? आणि याच कारणामुळे मनुष्य प्राणी पण नवीन पिढी जन्माला घालण्यापासून वंचित होत आहे असं काही विचारवंत सांगताना आढळतात. कारण जस अन्न  तुम्ही खाणार तसेच परिणाम तुमच्या आरोग्यावर होणार. बाजारामध्ये  आजकाल बी नसलेली फळ मिळू लागलीत. त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतील हे वेगळे सांगायची गरज नाही. 


    मी काही दिवसापूर्वी "आहारातला औद्योगिक ‘अन्ना’चार " असं शीर्षक असलेला लेख लोकसत्ता मधे वाचला, तो लेख एका पुस्तकाच परीक्षण होते  - ‘अल्ट्रा प्रोसेस्ड पीपल’.  त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. ते वाचल्यावर मला खरंच प्रश्न पडला, आपण खरंच काय खातो त्यावर आपले नियंत्रण आहे का ? की  आपले स्वातंत्र्य हिसकावून घेतले आहे.  खालचे वाक्य वाचून तर मी शॉक झालो. " आज सर्रास वापरला जाणारा सॅक्करीन हा कृत्रिम गोड पदार्थ कोळसा आणि डांबरापासून औषधनिर्मिती करताना अनवधानाने निर्माण झाला."  म्हणजे आपल्या ताटात भविष्यात पेट्रोकेमिकल येत कि काय ? अशी भीती वाटू लागली आहे.

चला आपण उद्या ठरवलं कि प्लास्टिक वापरायचं नाही तर आपण कितपत प्रयत्न करु ? खरंच आपल्याला प्लास्टिक मुक्त जगण्याच स्वातंत्र्य आहे का ? सहज सुपर मार्केट मध्ये गेले तर कळेल की हे व्यावसायिक लोक स्वतःच्या नफेखोरी साठी किती कचरा विकत आहेत.  तुम्ही म्हणाल नव्या वस्तूंना  कचरा काय म्हणतोय ?  कारण प्लास्टिक च्या वस्तू ह्या काही काळासाठी उपयोगी आणि अनंत काळासाठी ( अनंत काळ अतिशयोक्ती झाली ,  तरी  ५०० वर्ष तरी ते कचरा बनून पृथ्वी वरती राहते ) कचरा होऊन बसतात. एका मोठया शास्त्रज्ञ / विचारवंत याने म्हटले आहे कि मनुष्य प्राणी कचरा( वेस्ट) निर्माण करतो आणि त्यातुन थोडाफार उपयोग स्वतः साठी / वापरण्यासाठी करतो. म्हणजे पहा, तुम्ही एका समारंभात गेला आहात आणि तिथे पाणी पिण्यासाठी वन टाइम युज प्लास्टिक ग्लास ( एकदा वापरण्याचा प्लास्टिक 

ग्लास)  वापरला , तर लक्षात येईल की फक्त एकदा पाणी पिण्यासाठी तो आपण वापरला  म्हणजे ५ मिनिट त्याचा वापर झाला , पण पुढचे ५०० वर्ष तो या पृथ्वीवर म्हणजे  तुमच्या पुढच्या २० ते २५ पिढ्या त्याच्यासोबत असणार आहे.  तुम्ही सहज बघा कि एखादी स्टील ची पाण्याची बाटली घ्यावी आणि प्लास्टिकचा वापर टाळावा , पण नंतर तुम्हाला दिसेल की त्या बाटलीच्या टोपणासाठी परत  प्लास्टिक वापरले आहे. म्हणजे तुमची प्लास्टिक पासून सुटका नाही. महानगरपालिका सांगून सांगून थकली  कि प्लास्टिक पिशव्या वापरू नका , तरी आपण बाजाराला जाताना कापडी पिशवी घेऊन जायचं विसरतो किंवा सवय लावून घेत नाही. या साध्या कारणामुळे आपण प्लास्टिक पिशवी घेतो आणि पुढची ५०० वर्ष तिच्या सोबत पृथ्वीवर राहायला तयार असतो.


प्लास्टिक बद्दल आक्रमक आपणच व्हायला हव आहे. कारण ते तुमच्या आरोग्याशी निगडित आहे. काही दिवसापूर्वी मी "डाउन टू अर्थ " (सेंटर फॉर सायन्स अँड डेव्हलोपमेंट हे पर्यावरण विषयक पत्रकारिता करते )वर एक लेख वाचला होता,की मनुष्याच्या रक्तामध्ये प्लास्टिक कण (Micro-plastic) आढळले. त्याची लिंक मी खाली दिली आहे.  म्हणजे हे प्लास्टिक आता आपल्या रक्ता पर्यंत पोहचले आहे. त्यावेळी वाटत आपण खरंच प्लास्टिक मुक्त/ स्वतंत्र आहोत का ? किंवा होऊ शकतो का ?


पुढचा मुद्दा आहे की इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीजेचा  प्रचंड वापर. आपण आसपास पाहिले तर दिसेल की सुशोभीकरणासाठी किंवा करमणूक म्हणून असेल,आपण विजेचा वापर खूप करतो. ही गोष्ट तुम्हाला शहरात जास्त जाणवेल. सहज तुम्ही एखादी दुकान किंवा रेस्टॉरंट  पाहिले तर तुम्हाला दिसेल की विजेच्या रंगीत फुलांच्या माळा लखलखत आहेत. आणि त्या रात्रभर चालू असतात. मी एका मेडिकल च्या बाहेर असलेली लाईट पहिली . मेडिकल चालू असेल तर ठीक आहे , पण रात्री अकरा नंतर ते सकाळी ६ पर्यंत लाईट चालू ठेवायचं काही कारण दिसत नाही.  नैसर्गिक अधिवासात असलेल्या प्राण्यांना रात्री अंधार हवा असतो, उदा. घुबड. असे भरपूर प्राणी आहेत. या अश्या  जास्त प्रकाशामुळे त्यांचा अधिवास धोक्यात येतो. बर आपण फक्त माणसाचा विचार करूया, ठीक आहे आपल्याला त्रास होत नाही प्रकाशाचा, पण ज्याठिकाणी वीज तयार होते , तिथल्या पर्यावरणाच काय ? आजही  भारतात सर्वात जास्त विजेची निर्मिती ही दगडी कोळश्या मार्फत होते. ( तुम्ही इंटरनेटवर डेटा पाहू शकता ) दगडी कोळसा म्हटले की खाणी आल्या त्यामुळे मानवाला होणारे दुष्परिणाम. तुम्ही एखादी खाण पाहा आणि तेथील नैसर्गिक साधन संपत्तीचा झालेला ऱ्हास पहा. आपण आपली जीवनशैलीच अशी बनवली आहे की विजेचा वापर न करणे शक्य नाही. विजेचा वापर न करता जगणं शक्य नाही तर मग फक्त मूलभूत गरजा ज्या आहेत त्यासाठी फक्त वापर करता येईल का ? कि तेवढही स्वतंत्र्य नाही ? दिवसेंदिवस तापमान वाढत आहेत आणि त्यामुळे "वातानुकूलक" किंवा "एअर कंडिशनिंग" चा वापर वाढला आहे. म्हणजे आपले घर थंड राहावे म्हणून आपण पृथ्वीचं  तापमान वाढवत आहोत. हा शाश्वत मार्ग नाही. एसीचा वापर वाढेल आणि त्यामुळे   विजेचा वापर वाढत राहील आणि हरितगृह वायू वाढत राहतील आणि त्यामुळे भविष्यात तापमान अजून वाढेल. दुसरा कुठला शाश्वत  मार्ग आहे का ? मानवाला दिलेल्या बुद्धीचा वापर करून आपण ते शोधू शकत नाही का ? 


अजून एक मुद्दा आहे की विजेचा वापर करून होणारे ध्वनिप्रदूषण. तुम्ही कुठला उत्सव पहा किंवा लग्न समारंभ  अजून कुठले समारंभ असतील. तिथे वाजणारे डीजे. वर्षाचे ३६५ दिवस कुठे ना कुठे लग्न किंवा समारंभ हे चालूच असतात आणि तिथे  डीजेच्या प्रचंड आवाजामुळे होणारे ध्वनिप्रदूषण. लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिक सोडा, पण तरुण पिढी आहे त्यांनाही सार्वजनिक बहिरेपणा येत आहे. खरंच आपल्याला शांत वातावरणात जगण्याचा अधिकार आहे ? खरंच आपण त्या बाबतीत स्वतंत्र आहोत.


माणसाच्या मूलभूत गरज काय आहेत ?


शुद्ध हवा 


वातावरणात वाढलेलं प्रदूषण लक्षात घेता शुद्ध हवा मिळणे दुरापास्त झाले आहे. निसर्गामध्ये वायू प्रदूषण कमी करण्याची नैसर्गिक क्षमता असते पण त्याला काही मर्यादा आहेत. ती मर्यादा आपण केंव्हाच ओलांडली आहे . त्यामुळे शुद्ध हवा घेण्याचा मूलभूत अधिकार आपण केंव्हाच गमावला आहे. 


शुद्ध पाणी


जस निसर्गामध्ये वायू प्रदूषण कमी करण्याची नैसर्गिक क्षमता असते तशीच क्षमता वाहणाऱ्या नद्यांमध्ये पाणी शुद्ध करण्याची नैसर्गिक क्षमता असते. तुम्ही पूर्वी नद्या पाहिल्या असतील तर नक्की लक्षात येईल वाहणारे पाणी पुढे जाऊन स्वच्छ होते. पण साचलेले डबके अस्वच्छ पाण्याने भरलेले असते. वाहणाऱ्या नद्यांमध्ये पाणी शुद्ध करण्याची नैसर्गिक क्षमता आहे तिची मर्यादा पण आपण केंव्हाच ओलांडली आहे. सांडपाणी प्रक्रिया ना करता आपण नदीमध्ये सोडतो. त्याचे प्रमाण इतके वाढलेले आहे कि नदी ते पाणी नैसर्गिक रित्या स्वच्छ करू शकत नाही.  दुसरा मुद्दा हा की स्वच्छ पाणी शुद्ध करण्यासाठी आपण क्लोरीनचा वापर करतो जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्याचे लगेच नाही पण  दिर्घकाळानंतर आपल्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम दिसतील. बर ते फक्त पिण्याच्या पाण्यासाठी क्लोरीनचा वापर केला तरी ठीक म्हणू , पण इतर वापरासाठी असलेल पाणी गरज नसताना त्यामधेही क्लोरीनचा वापर होतो. जो सरते शेवटी नदीत मिसळून नद्या प्रदूषित करतं. तुम्ही म्हणाल प्लास्टिकबंद बाटली चे पाणी वापरू. पण मायक्रोप्लास्टिक मुळे होणार दुष्परिणाम वरती नमूद केलेले आहेत. मूर्त ऊर्जा (embodied energy),  वॉटर फूटप्रिंट आणि कार्बन फूटप्रिंट चा विचार केला तर खूप परिमाण पुढे येतील. म्हणजे शुद्ध पाणी पिण्याचे मूलभूत अधिकार आपण गमावला आहे. 


पौष्टिक आहार 


माणसाला जगण्यासाठी पौष्टिक आहार लागतो . आजच्या काळात रासायनिक खतांचा प्रचंड वाढलेला वापर लक्षात घेता आपला आहार हा पौष्टिक राहिलेला नाही. शेतीचे उत्पन्न वाढावे म्हणून झालेला हायब्रीड धान्याचा वापर हे हि एक कारण आहे माणसाचे आरोग्य ढासळण्यामागे. आजकाल वाढलेल्या वंध्यत्वाच्या समस्याचे मूळ कारण हेच हायब्रीड धान्य आहे. असे वाचनात आले. पौष्टिक आहार न मिळण्याचं अजून एक कारण म्हणजे फास्ट फूड. आजकाल कुठेही जा जवळच्या स्टॉल वर तुम्हाला फास्ट फूड ( जंक फूड ) पॅकेट विकायला दिसतील. आपले नकळत त्याच्यावरील अवलंबत्व वाढत आहे. आपण परावलंबी होत आहोत.  इथेही पौष्टिक आहार मिळवण्याचे स्वतंत्र्य आपण गमावून बसलो आहोत


कपडे  


फास्ट फॅशन चे दुष्परिणाम खूप लोकांच्या लक्षात आलेले नाहीत. पूर्वी कपडे दिवाळी / पाडवा या सणामध्ये घेतले जायचे  किंवा एखाद्या जवळच्या लग्न समारंभामध्ये घेतले जायचे. पण सध्या लोक दर दोन ते तीन महिन्यात नवीन कपडे घेतात , जुनी फॅशन बाद होते. कुठल्याही क्षुल्लक कारणासाठी शॉपिंग होते. त्यामुळेच शॉपिंग मॉल मध्ये नेहमी  भरगच्च गर्दी असते. या अश्या फास्ट फॅशन मुळे प्रचंड कचरा तयार होतो आणि पुढचे कित्येक वर्ष तो आपल्यासोबत पृथ्वीवर राहतो. पूर्वी सुती कपडे वापरायचो जे कचऱ्यात गेले तरी निसर्ग त्याला कुजवत असे. तसे आता आलेले टेरेलिन सारखे  कपडे निसर्गात कुजत नाहीत , पुढची ५०० वर्ष ती पृथ्वीतलावर आपल्यासोबत राहतील. म्हणजे आपल्या २/३ महिन्याच्या गरजेसाठी आपण त्यांना ५०० वर्ष पृथ्वीवर कचरा म्हणून ठेवतो. घन कचरा ही  पण एक गंभीर समस्या होऊन बसली आहे  


राहायला घर असणे ही एक माणसाची मूलभूत गरज आहे. 


पूर्वी मातीची घरं असायची. काही जुने वाडे असतील जे चुना आणि दगड वापरून बांधलेले असायचे जे जवळपास १०० वर्ष टिकायचे. आजकाल माणसाला नवीन घर बांधायचं किंवा घ्यायचं म्हंटले तर आयुष्यभराची कमाई घालवावी लागते. तेंव्हा कुठे घर तयार होते. पण सध्या सिमेंट काँक्रीट चा वापर करून घरं बांधली जात आहेत. आणि ती उन्हाळ्यामध्ये तापतात. पण जुनी घर जी दगड , माती आणि लाकूड हे वापरून बांधली जात. जी उन्हाळ्यात थंड आणि थंडीत गरम राहत असत. पण सिमेंट काँक्रीटचा वापर सुरु झाल्यापासून घराचे तापमान हे वाढलेले दिसते. आजकाल आपण फर्निचर करतो आणि त्याच्या गुणवत्ते  बद्दल विचारले असता ते व्यावसायिक स्वतः सांगतात की लोक आजकाल दर ४/५ वर्षात नवीन फर्निचर बनवतात आणि जुने टाकून देतात. त्यामुळे मटेरियल ची गुणवत्ता पण त्याप्रमाणे असते ( ४/५ वर्ष टिकणारी ) त्यामुळे तिथेही आपल्याला तडजोड करावी लागते. म्हणजे  दर ४/५ वर्षांनी तो खर्च करावा लागतो. जरी तुम्हाला वाटले घनकचरा कमी करावा आणि  जास्त पैसे देऊन चांगली गुणवत्ता असलेले मटेरियल शोधावे. जेणेकरून पुढचे २० वर्ष तरी दुरुस्ती करावी लागणार नाही. किंवा जुना कचरा तयार होणार नाही. पण ते बाजारामध्ये शोधले तरी मिळणार नाही. म्हणजे व्यावसायिकानी नफेखोरी साठी ते बनवलेच नाही. 


अजून एक दुसरा मुद्दा असा की या सिमेंटची घरं ज्याचे आयुष्य हे जास्तीत जास्त २५ ते ३० वर्ष असते . तुम्ही पाहता २५ ते ३० वर्ष जुन्या इमारती धोकादायक होतात आणि पडून नवीन बांधाव्या लागतात. म्हणजे जे तुम्ही तुमच्या कर्तृत्वाच्या काळात कमावलेले सर्व घर घेण्यासाठी घालता आणि परत २० ते ३० वर्षांनी पुन्हा नवीन बांधायची पाळी येते त्यावेळी तुम्ही निवृत्त झालेले असता. त्यामुळे हि सिमेंटची घरं कितपत शाश्वत आहेत सांगता येणार नाही. राहायला घर असणे हे पण एक चैनीची वस्तू होऊन बसली आहे. जी फक्त धनाडग्या लोकांनाच परवडते. या मूलभूत गरजेपासूनही आपण पारतंत्र्यात आहोत असं वाटत ?

- प्रमोद डमरे 

बुकमार्क : आहारातला औद्योगिक ‘अन्ना’चार | book review chris van tulleken ultra processed people why do we all eat stuff that isnt food

https://www.downtoearth.org.in/amp/story/pollution/microplastics-detected-in-human-blood-for-the-very-first-time-82111


 

Wednesday, February 14, 2018

खयालोंका आबाद शहर ....



आठवण यावी अस जास्त काही घडलं नाही,
पण ज्यावेळी मनासारखे रंग कैनव्हासवर उतरायचे तेंव्हा वाटायचे लगेच तुला दाखवावं.
तर कधी रानातल्या चिंचेच्या झाडावर चिंचा काढुन देणारं कोणी नसतं आणि बोराच्या झाडाखाली बोरंही तशीच पडलेला असतात, त्यावेळी वाटायचं आपल्या पिशव्या भरल्या असत्या चिंचा आणि बोरानी.
कधी सकाळी सकाळीच सायकलची रपेट करताना घामाने भरलेल्या चेहऱ्यावर अचानक वाटेतील एखाद्या नदी- तलावामुळे थंड झुळुक यायची, वाटायचं हा आनंद सोबत अनुभवावा.
कधी एखाद्या नामवंत लेखकाचे एखादे टाळी मिळवणारं  वाक्य किंवा वाचकाला आपुसकच"वा" म्हणायला लावणारं वाक्य वाचलं की वाटायचं तुला ऐकवावं आणि लगेच टाळी घ्यावी.
तर कधी सकाळी 6 वाजता बाइक वरून जाताना तो सतत पडणारा पाऊस काटे बोचल्यासारखा वाटायचा त्यावेळीही वाटायचं तुलाही हे काटे आवडले असते.
तर कधी भंडारा डोंगरावर सुर्य बुडत असताना दिसायचा त्यावेळी आकाशाचा झालेला जांभळा रंग...वाटायचा हाही तुझ्यासारखाच सर्वांच्या आनंदात रंग भरतोय.
तर कधी पोर्णिमेच्या रात्री मोकळया आकाशात शरीर आराम करायचं त्यावेळी समोर डोळे दीपवून टाकणारं आणि शहराच्या झगमगाटात हरवलेलं पांढरशुभ्र तारांगण दिसायचं आणि वाटायचं तुला दिसत असेल का हे सर्व.
तर कधी एखादे सात्विक नाटक पाहताना जेव्हा नायकाचे एक एक वाक्य हृदयाला भिडायचं आणि मनात साचलेल्या कचऱ्याला मोकळी वाट करून द्यायचं त्यावेळी वाटायचं की तुला सांगावं 'अस नाटक असतं.. अस नाटक असतं !!'
तर कधी बालगंधर्व नाट्यगृहाबाहेर नाटक पाहायला आलेली, ज्यानी त्यांच्या आयुष्यात चांगले वाईट अनुभवलेली आणि उतारवयातही त्याच जोमाने प्रेमाला नवीन आकार देणारी उत्साही चेहऱ्याची वृद्ध जोडपी पाहिली की वाटायचं तुलाही जगण्यातला खरा आनंद पाहायला मिळाला असतां.
- स्वगत  लिहिण्याचा प्रयत्न 

Sunday, January 7, 2018

संगीत देवबाभळी - मस्त नाटक !

संगीत देवबाभळी - मस्त नाटक.


 समीक्षा वगेरे लिहिणे हा आपला प्रांत नाही पण तरीही एक
सच्चा रसिक, साहित्यप्रेमी आणि नाट्यप्रेमी असल्यामुळे नाटकाबद्दल ख़ूप काही लिहावसं वाटतंय म्हणून ही उठाठेव.

नाटक, साहित्य आणि संत तुकाराम यांचे काव्य हे माझे weak पॉइंट आहेत. ज्यांचे कनेक्शन डायरेक्ट हृदयाशी आहे, त्यामुळे नाटक पाहताना आज रुमाल भिजणार आहे हे पहिल्या प्रवेशामधेच ओळखलं. पूर्ण नाटकात आपण वेदनेच्या आनंदात न्हाऊन निघतो. डोळे आणि कान तृप्त होतात, अगदी नाटकाच्या पाहिल्या वाक्यापासुन ते शेवटच्या वाक्यापर्यन्त खिळुन राहतो. काही कलाकृतींना डोळ्यानी दाद मिळते हे ऐकून होतो त्याचा आज प्रत्यय आला. कलावंत फक्त दोनच आहेत पण त्यांची  अभिनय आणि संगीत नाटकामुळे गायन खुपच सुंदर. संपूर्ण नाट्यग्रह हेलावून टाकण्याची क्षमता आहे त्यांच्या मधे. एखाद्या वक्त्याने टाळी मिळवण्यासाठी आपल्या भाषणात ज्ञानेश्वरीची एखादी ओवी सांगावी तसे पहिल्या वाक्यापासुन ते शेवटच्या वाक्यापर्यंत संवाद, कधी टाळ्या तर कधी आपोआप  'वाह' येऊन जातं आणि त्यासोबतच साचलेल्या कित्येक भावनांची वाट मोकळी होते आणि आपण मोकळे होतो. देवबाभळीचा काटा कधी आपल्यात घुसतो कळत नाही आणि ती वेदना कायम हवीहवीशी वाटत राहते, वाटतं नाटक संपुच नये.
संत तुकाराम आणि विठ्ठल यामधे भक्त कोण आणि देव कोण असा प्रश्न पडावा इतकी दोघांमधली एकरूपता  दाखवण्यात नाटक यशस्वी झालेलं आहे.
नाट्यप्रेमी असल्याने खुप नाटकं पाहतो पण महाराष्ट्रात जन्मल्याचा अभिमान आणि पुण्यात राहतो याचा आनंद खुप दिवसांनी झाला तो आजच्या या नाटकामुळे. कारण अशी सुंदर कलाकृती पाहायला मिळणं म्हणजे दुर्मिळ योगायोग म्हणावा लागेल. आता हे नाटक परत एकदा पहावाच लागेल, तोपर्यंत मन स्वस्थ बसणार नाही.

नाटक संपल्यावर नटसम्राट मधलं शेवटच वाक्य आपण स्वतःशीच बोलतो,

" अस नाटक असतं राजा, अस नाटक असतं !!! "

- नाट्यप्रेमी मी.

Sunday, October 8, 2017

कुंदन शाह

कुंदन शाह ( १९ ऑक्टोबर १९४७ - ७ ऑक्टोबर २०१७ )


सकाळ पासुन कुंदन शहा यांची गेल्याची बातमी पहात होतो, इतर कलावंत जातात तसे वाटले आणि त्याप्रमाणे थोडेसेच वाईट वाटले. त्यानी नुक्कड़ , जाने भी दो यारो (film) या सारख्या कलाकृती केल्या त्या खुप प्रसिद्ध होत्या  त्या मी पाहिल्या नाहीत ( माझं दुर्दैव ) पण माझा सर्वात आवडता चित्रपट - 'कभी हाँ कभी ना' याचे writer , director  ते होते हे माहीत नव्हते ( माझं सर्वात मोठं दुर्दैव्य) या चित्रपटाशी माझा एक वेगळाच जिव्हाळा आहे म्हणून त्यांच्या विषयी कृतज्ञता म्हणून ही पोस्ट टाकण्याचा आटापीटा, ( जशी माहिती मिळाली तस मला राहवलच नाही) त्याचं कारण म्हणजे लहान असताना दूरदर्शन वर शुक्रवारी रात्री जागुन पाहिलेला हा सिनेमा .. जस जस वय वाढत गेलं तस तसे तो चित्रपट लैपटॉप मधील एका फोल्डर मधे कधी येऊन बसला माहीत नाही, 20-25 वेळा तो चित्रपट पाहिला असेल मी, अजूनही तो चित्रपट पाहिला की त्या काळतील लोकांविषयी खुप आदर वाटतो, त्या काळी लोक किती साधे सिंपल विचारांचे होते. तो चित्रपट पाहिला की त्या काळतील आठवण आल्याशिवाय राहत नाही. अजूनही youtube वर ' वो तो है अलबेला हजारों में अकेला ' गाण पहावसं वाटतं ( कित्येक वेळा पाहिलही आहे) माझ्या माहितीप्रमाणे तो शाहरुख़चा सर्वात बेस्ट परफॉरमेंस होता. आणि त्यांनी शाहरुख खानची या जगाला ओळख करून दिली. त्यानंतर शाहरुख़ कधी थांबलाच नाही. त्याचित्रपटाबद्दल खुप काही गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, त्याची एक स्वतंत्र पोस्ट तयार होऊ शकते. तुम्ही गेलात खरे पण तुमची कलाकृती ( कभी हां कभी ना) मधून नेहमीच सोबत असाल. तुमच्या निधना नंतर ही माहिती मला मिळावी हे माझं सर्वात मोठे दुर्दव्य. आमच्या काळतील पीढ़ी नेहमीच कृतज्ञ राहील. आताही त्या 90 च्या दशकात जायची इच्छा झाली तो चित्रपट पाहतो. आणि पाहत राहणार . 'कभी हां कभी ना' मधील ओळी तुमच्या साठी,

"ओ तो है अलबेला
हजारों में अकेला"

- Written date 8 October 2017

Thursday, February 2, 2017

धागा समूह आणि आनंदवन - हेमलकसा भेट

धागा समूह व आमचे वेगवेगळे  उपक्रम याबद्दल मी अगोदर लिहिले आहे. धागा समूहाशी मी कसा जोडला गेलो, वगैरे वगैरे..  सांगण्याच्या उद्देश हा कि हे खर तर  गेल्या वर्षी झालेल्या सोमनाथ श्रम संस्कार शिबीर २०१६  यामुळे धागा मधील कार्यकर्त्यांची ओळख झाली. हळू हळू जस जस एक एक उपक्रम राबवत होतो तस तशी मैत्री घट्ट होत गेली. त्यावेळी शिबिराला जाण्यासाठी मला फक्त ७ दिवसच सुट्टी मिळाली आणि शिबीर झाल्यावर आनंदवन संस्था तेथील उद्योग, लोक बिरादरी प्रकल्प -हेमलकसा पाहायची इच्छा होती पण सुट्टी नव्हती म्हणून शिबिरानंतर लगेच पुण्याला परतावे लागले. तेंव्हा पासून मनात होत कि,बाबा आमटे व त्यांचे कार्यकर्ते यांनी सुरु केलेले सर्व प्रकल्प पाहायचे आहेत. एका नंतर एक धागाचे उपक्रम चालू होते आणि अचानक जानेवारी मधे  लॉन्ग वीकएंड मिळाला, म्हणजे ४ दिवसाची सलग सुट्टी. आणि जानेवारीच्या सुरवातीपासूनच ठरले होते कि ह्या ४ दिवसात आनंदवन - हेमलकसा येथे भेट द्यायला जायचे आहे. शेवटी जायचा दिवस आला आणि ठरल्याप्रमाणे पाहिल्यादिवशी आनंदवन मधे पोचलो. फक्त भेट द्यायच्या उद्देशाने गेलो नव्हतो . हेमलकसा येथे वॉल पेंटिंग करण्यासाठी आम्हाला परवानगी मिळाली होती. मुख्य उपक्रम वॉल पैंटिंग हा होता आणि या निमित्ताने आम्हाला संस्थेलाही भेट देण्यासाठी वेगळा वेळ काढावा लागला नाही. 

आनंदवन ते हेमलकसा हे जवळपास ५ तासाचे अंतर आहे त्यामुळे, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून  ६ वाजता हेमलकसा कडे जायचे ठरले. सकाळी हेमल कसा साठी निघताना विकासभाऊंची ( डॉ विकास आमटे ) भेट झाली. त्यावेळी मनात विचार आला कि हे तेच आहेत ज्यांचे लोकसत्ता - लोकरंग मधे  ' संचिताचे कवडसे ' नावाचे आनंदवन याविषयी लेख येतात. मी ते दर वेळी वाचतो तशी मी बाबा आमटे आनंदवन विषयीची बरीचशी  पुस्तके वाचलेली आहेत. परंतु वाचनात नसलेले आणि विकास भाऊंनी अनुभवलेल्या जुन्या आठवणी किंवा प्रेरणा देणाऱ्या काही घटना त्या वाचायला मिळतात. आणि आयुष्य सरत असताना एक वेगळी दिशा मिळते किंवा असं होत कि कितीही मोठ्या आनंदाने डोक्यात हवा जात नाही, पाय जमिनीवरच राहतात आणि खूप असं दुःखही आले तरी मोडून पडत नाही, त्याचा सामना करण्यासाठी एक वेगळीच प्रेरणा आपल्या अंगात नकळत रुजली जाते. आणि गोष्टी साध्या सोप्या होऊन जातात. माझं त्यांच्याशी जास्त बोलणे नाही झाले. बोलण्यापेक्षा ऐकत राहण्यामधे मी विश्वास ठेवतो. शिबीरमधे  असतानाही एक भेट झाली होती, त्यावेळी काहीजण त्याच्या बरोबर फोटो काढण्यासाठी विचारणा करत होते. त्यावेळी त्यांचे ते वाक्य खूप आवडले, ते म्हणाले होते, - 'अरे माझा फोटो काय काढता.. सोमनाथ मधे जी घर बांधली आहेत, त्यांचे फोटो काढा, ती बांधलेली घरांची रचना कशी आहे ? ती का वेगळी आहेत ? ह्याची माहिती सर्वाना कळू द्या. त्यांच्या सहज बोलण्यातून अशा किती तरी गोष्टी समजून जातात. 

पहिल्या दिवशी आनंदवन पाहत असताना बाबा आमटे यांचा सहवास लाभलेले एक जुने गृहस्थ भेटले,  जुन्या लोकांना भेटायला,बोलायला खूप आवडतं कारण त्यांच्या कडे तसा अनुभवाचा खजिना असतो. त्यामुळे त्याचे अनुभव ऐकायला खूप आवडते. ते भेटलेले गृहस्थही थोड्या मिश्किल स्वभावाचे होते. तस मी नवीन कॅमेरा घेऊन पक्ष्याचे फोटो काढताना पाहिल्यावर त्यांनी मला सांगितले, कि आनंदवन मधे कुठले पक्षी कोणत्या वेळी कुठे येतात, म्हणून wildlife फोटोग्राफी साठी मार्गदर्शनही केले. त्यांनी बाबाचे , पु ल देशपांडे यांचे खूप अनुभव सांगितले. जाता जाता त्यांना म्हटले तुमचा पण एक फोटो द्या, तर त्यांनी मिश्किल पणे फोटोसाठी पोज दिली. आणि सांगितले फोटो खाली कॅपेंशन लिही -" कॉम्म्नाडर्स ऑफ बाबा आमटे" . 
    असे अनुभव किंवा एक दोन दिवसासाठी का होईना थोडेसे वेगळं जगणं,जगण्यात एक वेगळीच गोडी निर्माण करतं. अगदी दोन पायांच्या प्राण्यामधून बाहेर येऊन माणसात आल्यासारख वाटणं अस म्हणतात ते हेच.

आम्ही सर्वजण ( धागा समूह)  दुसऱ्या दिवशी दुपारी १२ पर्यंत हेमलकसा येथे पोचलो, फ्रेश झाल्या बरोबर  थोडा वेळ आराम करून पूर्ण प्रकल्प पहिला , Amte Animal Ark ( प्राण्यांचे अनाथालय) पाहायला मिळाले. त्याच्या विषयी सर्वाना माहिती आहे म्हणून मी जास्त लिहीणार नाही. प्रकल्प पाहत असताना आम्ही तेथील  निवासी शाळेकडे पोचलो बहुतेक मधली सुट्टी झालेली असावी, सर्व मुले वर्गातून मैदानातून बाहेर पडत असताना दिसत होती, त्यातील एकाने कुतूहलाने आणि निरागस पणे विचारले तुम्ही कुठून आला आहात? त्यांच्या त्या बोलण्यात खूप नम्रता होती.  नाहीतर कुठे कुणाला भेटलो तर खोडकर आणि हट्टीच मुले भेटायची. पण इथे चित्रच वेगळं होतं, आणि नंतर लक्षात आले कि यांचा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध नसल्याने त्यांच्या मधे निरागसकता टिकून राहिली आहे. हि सर्व मुले म्हणजे माडिया गोंड आदिवासी समाजातील विद्यार्थी. यांच्या विषयी पुस्तकामधे वाचले असेल किंवा हेमलकसा वरच्या माहितीपटा मधे तुम्ही पाहिलं असेलच. 
याना असं मैदानावर पाहताना त्याच्या चेहऱ्यावरची निरागसता कॅमेरा मधे टिपायचा मोह मला आवरला नाही.

हेमलकसा मधला पहिला दिवस प्रकल्प पाहण्यात आणि इथल्या कार्यकर्त्याच्या भेटीमधे आणि गप्पांमधे गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता वॉल पैंटिंगच्या कामाला सुरवात केली, त्यादिवशी शनिवार असल्याने तेथील विद्यार्थ्यांना दुपारनंतर सुट्टी होती. म्हणून विद्यार्थ्यांना घेऊन वॉल पैंटिंग आम्ही करणार होतो. आम्ही चित्रे काढत असताना काही विदयार्थी तेथे आले, त्यांनीही आमच्या बरोबर चित्रे काढायला सुरवात केली. सर्वांचा चेहऱ्यावरचा उत्साह आणि चिकाटी वाखाणण्याजोगी होती. सकाळी १० वाजता केलेली सुरवात ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच पर्यंत सलग १९ तास या भिंतीचे रंगवण्याचे काम चालले, मुलेही रात्री १० पर्यंत चित्रांमध्ये रंग भरण्यात व्यस्त होते,  सर्व मुले-मुली रंगवताना चित्रांमध्ये गुंतली होती अगदी स्वतःच्याच  जगात, फोटो मधे दिसेल तुम्हाला. 


आकाश, नम्रता, वैभव, सिमरन, राधा अशा कमीत कमी ३० जणांचा यात सहभाग होता.एकूणच खूप मित्र-मैत्रिणी झाल्या या भिंतीमुळे, निर्मितीचा आनंद निराळाच त्यामुळे त्यांचे या भिंतीशी एक वेगळंच नातं निर्माण झालं आहे. त्यांच्याकडे त्यांच्यासाठी आयुष्यभर पुरणारी एक प्रेरणा किंवा आठवण मिळाली, का कुणास ठाऊक पुढे चालून माझ्यासारख्याला जगणं शिकवतील. 

वॉल पैंटिंगसाठी संधी दिल्या बद्दल अनिकेत दादा आणि  समीक्षा ताई यांचे खूप खूप आभार. 

आमचे वॉल पैंटिंगचे काम संपल्यावर सकाळी ६: ३० च्या बस ने परतीच्या प्रवासाला जायचे ठरले होते. पहाटे  ५ वाजता काम संपल्यावर आम्हाला विलास मनोहर यांनी बनवलेला चहा प्यायला मिळाला. हो तेच विलास मनोहर ज्यांचे " मला न कळलेले बाबा" हे बाबा आमटे यांच्या वर लिहिलेले पुस्तक   "नेगल" ,"नेगल (भाग २) : हेमलकशाचे सांगाती" , "एका नक्षल वाद्याचा जन्म"  या पुस्तकाचे लेखक. बाबा आमटे याच्याविषयीची खूप माहिती व त्याच्या काही कवितांची ओळख  मला "मला न कळलेले बाबा" या पुस्तकातून झाली, अगदी बाबा आमटे-आनंदवन यांच्याशी जोडला गेलो तो या पुस्तकामुळेच . खूपच प्रेणदायी पुस्तक आहे हे. माझा स्वतः बद्दलचा दृष्टिकोन खूपच बदलत  गेला. त्यामुळे एक वेगळाच आदर त्यांच्याबद्दल आहे. अतिशय गोड माणूस, तस त्यांना मी हेमलकसा वरील माहितीपटात पहिले होते आणि त्यांची पुस्तके वाचली होती म्हणून त्यांचं बोलणं ऐकताना असं कधीच वाटले नाही कि या व्यक्तीला आपण आज भेटतोय, पुस्तकामधून संवादाला सुरवात झाल्यामुळे असे झाले असावे. बोलताना अगदी लगेच कनेक्ट झालो. आकाशापर्यंत पोचलेली आणि जमिनी वर पाय ठेवून वावरणारी माणसं, यांच्याविषयी काय लिहिणार. रोज आपण २ पायाच्या प्राण्यांमधे आणि सिमेंटच्या जंगलात वावरतो आणि अचानक एखाद्यादिवशी अशी माणसं भेटतात. जगायला एक वेगळीच दिशा देतात. म्हणजेच दुसऱ्यासाठी आनंद शोधता शोधता स्वतः मधे आनंद शोधण्याची किंवा जगण्याची कला नकळत शिकवून जातात.
तो पहाटे ५;३० वाजता त्यांनी बनवलेला चहा आयुष्यभर कामामधे  उत्साह आणणारा आणि इतरांसाठी काहीतरी करण्यासाठी एक  प्रेरणादायी आठवण म्हणून राहणार आहे. 
 - प्रमोद ( धागा कार्यकर्ता  )

Wednesday, October 12, 2016

धागा समुह


२०१६ हे वर्ष आता शेवटच्या टप्प्यात येत आहे, आणि सहज विचार आला की आपण ह्या वर्षात काय नवीन मिळवलं. तसं हे वर्ष ठरवलेल्या गोष्टींपेक्षा जास्त देऊन जात आहे आणि अजुन ३ महीने उरले आहेत. पुण्यात आल्यानंतर ह्या वर्षाच्या सुरवातील पूर्ण स्थिरावलो होतो. तस डोक्यात विचार होते की पुण्यात आल्यावर आपण काहीतरी करू, दररोज मशीन सारखे ऑफिस मधे काम करणे आणि विकेंडला घरी आराम करणे आवडत नव्हतं, वयही तसंच होत म्हणून वाटायच ह्या वयात नाही तर मग नंतर कधी करणार काम?
आय. टी. मधे आहे त्यामुळे विकेंडला सुट्टीचे २ दिवस मिळतात. म्हणून ठरवलं की हे दोन दिवस आपण वेगळ्या कामासाठी द्यायचे, लोकसत्ताच्या एक लेख वाचला होता काही लोक स्वतः व मित्रांचा समूह मिळून इतर लोकांसाठी, समाजासाठी किंवा संस्थेसाठी काम करतात. तसाच विचार माझ्याही मनात आला आणि ठरवलं की आपणही तसाच समूह बनुन काम करावे. पण सर्वांनाच आपला वेळ देणं अवघड होत म्हणून विचार केला की एखाद्या चैरिटी शो करणाऱ्या समूहामधे सामील व्हावं. एका समुहाची तशी माहिती मला गेल्या वर्षी ह्याच दिवसात फेसबुक वरुन झाली.
तो शो होता " निमित्त कोजागरीचे "- 'स्नेहांकुर ' या अहमदनगर येथील संस्थेतील लहान अनाथ बाळाच्या दुधासाठी आर्थिक मदत व्हावी याकरीता आयोजीत केला होता. दिनांक २७ ऑक्टोबर २०१५ रोजी बालशिक्षण, कोथरूड पुणे येथील प्रेक्षागृहात गायिका सायली पानसे आणि सानिका गोरेगांवकर यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. ह्या कार्यक्रमाचे आयोजन ' धागा समुहाने' केलेे. ही माहीती फेसबुकच्या माध्यमाने मला मिळाली आणि ठरवलं की आपणही ह्या समुहामधे सामिल होऊन कामाला हातभार लावायचा.













ओळख नसल्याने संपर्क होत नव्हता पण धागा समुहामध्ये काम करायची इच्छा होती. आणि विचार केला पुढील कार्यक्रमास भेट द्यायची. कार्यक्रमाचा आस्वाद घेतल्याचा आनंद मिळेल व पैसे चांगल्या कामासाठी जात आहेत याचं समाधान म्हणून.
धागाचा पुढ़चा कार्यक्रम झाला तो बाबा आमटे यांच्या 'महारोगी सेवासमिती वरोरा' (आनंदवन) या संस्थेसाठी, तो दिवस होता २७ फेब्रुवारी २०१६. अगोदर फेसबूकवर माहिती मिळाल्याने कार्यक्रमासाठी वेळ काढला. हा कार्यक्रम बालशिक्षण, कोथरूड पुणे येथील प्रेक्षागृहात होता यामध्ये'गुरुदत्त'वर चित्रित झालेल्या आणि गीता दत्तने गायलेल्या गाण्यांचा मनस्वी प्रवास सादर झाला आणि कार्यक्रम उत्तमरित्या पार पड़ला व प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही दिसला. तस मी कॉलेज मधे असताना गुरुदत्त यांचा ' प्यासा ' हा चित्रपट पाहिला होता त्यामुळे त्यांच्यावरील चित्रित गाण्यांची थोड़ी माहिती होती तसेच त्या सिनेमावर व त्यांच्या आयुष्यावर भारतात नव्हे तर भारताबाहेरही काही लोकांनी डॉक्यूमेंट्रीज केल्या. ' गुरु -गीता' हा कार्यक्रम पाहिल्यावर न ऐकलेली गाणी ऐकायला मिळाली व माझी आवड़त्या गाण्याची लिस्ट वाढत गेली. त्यांच्या जीवनामधला प्रवास कसा होता याचीही माहिती ह्या कार्यक्रमामुळे झाली. ह्या कार्यक्रमामुळे मला पहिल्यांदा 'धागा समुहा 'शी ओळख झाली.




मे- २०१६ मध्ये 'महारोगी सेवा समिती वरोरा' आयोजीत सोमनाथ श्रमसंस्कार शिबिरामध्ये सामिल झालो ह्याविषयी मी ब्लॉगवर लिहिले आहे. त्या एका आठवड्याच्या शिबिरामध्ये खुप काही शिकलो व नवीन माणसांशी जोडला गेलो व धागा समूह सदस्यांची चांगली ओळखही झाली. शिबिरानंतर पुण्यात आल्यावर धागा समुहाचा एक धागा झालो
धागा समूह मधे यायच्या अगोदर कोणाचीही ओळख नव्हती फक्त शेखर सराना फेसबुकमुळे ओळखायचो. तोच धागा पकडून मी धागा मधे सामील झालो. त्यानंतर धागाचे विविध कार्यक्रम झाले त्यामध्ये,
गायक प्रथमेश लघाटे यांचा ' बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ' हा अभंगाचा कार्यक्रम आषाडी एकादशीनिमित्त संतोष गर्जे यांच्या सहारा अनाथालय या संस्थेच्या आर्थिक मदतीसाठी आयोजीत केला. या कार्यक्रमाचा दूसरा शो धागा समुहाने साधनाताई आमटे स्मृतीदिनानिमित्त त्यानी सुरु केलेल्या 'गोकुळ' या अनाथालयाच्या आर्थिक मदतीसाठी आयोजीत केला.





यानंतर संगीतकार ' कौशल इनामदार' आणि अभिनेत्री 'स्पृहा जोशी' यांचा ' मैफल ' हा मनोरंजनात्मक कार्यक्रम केला, यामध्ये स्पृहा जोशी यांचे कविता वाचन व काही गाणी व संगीत निर्मीती करताना आलेले गमतीशीर अनुभव कौशल यांनी सांगितले. हा कार्यक्रम संतोष गर्जे यांच्या सहारा अनाथालय या संस्थेच्या आर्थिक मदतीसाठी आयोजीत केला होता.









कार्यक्रमाचे आयोजन कसे करावे? आणि पूर्ण व्यवस्थापन कसे असावे ? याची काहीही माहिती नव्हती अगदी शुन्यापासून सुरवात. तरीही आम्ही सर्वानी आपापली कामे विभागुन घेतली. मी नवीन होतो पण इतर सदस्याना कार्यक्रम आयोजनाची माहिती होती. त्यामुळे यांच्याकडून सर्व कामे हळू हळू शिकत गेलो. कधी कधी विचार यायचा की आपल्याला जमेल का हे सर्व, पण नंतर विचार यायचा की आपला प्रयत्न प्रामाणिक असेल तर सोबत देणारे हात साथ द्यायला येतीलच. कुठलंही काम एकट्याने होत नाही त्याला टीमची आवश्यकता असतेच, आणि ती टीम म्हणजे 'धागा समूह'!
ह्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाबरोबर आम्ही स्वच्छता आणि वृक्षारोपणाचे काम केले. धागा समुहामध्ये सामील होण्या अगोदर धागा समुहाने तळजाई येथील स्वच्छता केली होती. त्यानंतर वृक्षारोपणासाठी आम्ही पेठकर साम्राज्य कोथरूड जवळील ' जिज्ञासा शाळा ' निवडली. जून महिना चालू झाला होता पाऊस पड़ायला सुरवात अजुन झाली नव्हती. वृक्षारोपणा अगोदर स्वच्छता करायची गरज होती त्यामुळे एक दिवस देउन धागा समुहाने स्वच्छता केली आणि त्यानंतरच्या भेटीमधे आम्ही अजुन एकदा स्वच्छता करुन झाडे लावण्यासाठी खड्डे खाणुन ठेवले. व जुलैच्या पहिल्या पावसानंतर आम्ही वृक्षारोपण केले यामध्ये आम्ही जवळपास ५३ रोपे लावली. ह्या कामाचा आनंदच वेगळा होता कारण, ज्या दिवशी वृक्षारोपणाचा दिवस उजाड़ला होता त्या दिवशी खुप पाऊस होता. पावसात बाहेर कसं पडावं हा विचार होता पण शेखर सर म्हणायचे एकदा काम करायच ठरवलं की फिक्स करायच मग काहीही होवो. आणि बाबा आमटे यांचं एक वाक्य आठवले,
" असे तरुण श्रमस्वी हवे आहेत की जे वाऱ्या वादळात, पावसात, गारठ्यात, रखरखाटात व टोळधाडीत धरीत्रीचा पान्हा बेफाम भोगु शकतील"
- बाबा आमटे
आणि त्या पावसात भिजण्याचा आनंद घेत वृक्षारोपण झाले. आणि ठरल्याप्रमाणे कामही झाले.








धागा समूहामधे आल्यापासून खुप काही शिकायला मिळाले खुप मोठमोठ्या व्यक्तीशी जवळून संबंध आला. नंतर वाटले आपण कुठल्या जगात वावरत होतो, इथे समाजात कितीतरी लोक अविश्रांतपणे चांगली कामे करत आहेत. धागाची कामे करताना २ वेळा नगर येथील स्नेहालय संस्थेला भेट देण्याचा योग आला. त्यांच्या कामाची माहिती मिळाली. त्यांनी केलेली कामे ही खुप थक्क करणारी आहेत.
नसिमादिदी यांच्या प्रकल्पासाठी "साद माणुसकीची" उपक्रमाचे आयोजन, नगरकरांशी दिदींचा थेट संवाद आणि सानिकाची "जाणीवांची गाणी".
कोल्हापुर येथील द हेल्पर्स ऑफ हॅंडीकॅप्ड या संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वप्ननगरी या अपंगांच्या रोजगार आणि पुनर्वसन प्रकल्पासाठी संस्थापिका श्रीमती नसिमादिदी हुरजूक यांना आर्थिक सहयोगाची आवश्यकता आहे. त्यामुळे समविचारी संस्था व कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे "साद माणुसकीची" या उपक्रमाचे आयोजन केले होते. ३ ऑक्टोबर २०१६ रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत माऊली सभागृह (सावेडी, अहमदनगर) येथे या कार्यक्रमात नसिमादिदी स्वतः उपस्थित होत्या. तसेच सामाजिक जाणीवा सखोल आणि प्रगल्भ करणाऱ्या गाणी आणि भजनांचे सादरीकरण यावेळी प्रख्यात गायिका सानिका गोरेगांवकर यांनी केले. यावेळी "धागा" या समुहामार्फ़त या उपक्रमासाठी विशेष सहयोग दिला. धागा समूह अशा उपक्रमात सांस्कृतिक व संगीतमय कार्यक्रमाचे योगदान देत असतो.
नसिमादिदींचे जीवनकार्य संपूर्ण देशाला आणि विश्वाला परिचित आहे. मागील ४५ वर्षापासून नसिमादिदी यांनी अपंगाना रोजगार शिक्षण, औपचारिक शिक्षण, आत्मसन्मान आणि आत्मभान दिले. स्वतः अपंग असतांनाही त्यांनी इतर अपंग आणि विशेष गरजयुक्त व्यक्तींसाठी केलेले कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायक बनले. जगातील अनेक मान्यवर पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.
समाजात बहुविध स्वरूपाच्या सेवाकार्यांची आवश्यकता असते. त्यामुळे अशा विश्वासार्ह कामांसाठी स्नेहालय, अनामप्रेम, डॉ. शंकर केशव आडकर ट्रस्ट, बाबा आमटे विद्यार्थी सहायक समिती (श्रीगोंदे), जय माता दी बालगृह(टाकळी खंडेश्वरी, ता. कर्जत), सार्थक सेवा संघ आणि मानव्य (पुणे), प्रेरणा (मुंबई) या वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी कार्यरत संस्था सहयोग करीत असतात, अशा सर्व संस्थांनी नसिमादिदींच्या कार्याला समाजातून सहयोग मिळवून देण्यासाठी एकत्रितपणे या उपक्रमाचे आयोजन केले होतेे.
विविध समविचारी व्यक्ती आणि संस्थांनी मिळून नसिमादिदी यांच्या द हेल्पर्स ऑफ हॅंडीकॅप्ड या संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वप्ननगरी (काजू उत्पादन) प्रकल्पासाठी सहयोग निधी देण्याचे नियोजन केले.
मी धागा मधे नसतो तर मला ह्या गोष्टी समजल्याच नसत्या. आणि जगावेगळा आनंद घेता आला नसता. आणि मी माणसं जोडायला शिकलो ते इथेच.











"निमित्त कोजागरीचे"या कार्यक्रमाने धागा टीमच्या कामाची सुरवात झाली, या कार्यक्रमातून 'स्नेहांकुर' या संस्थेला १,५०,०००/- ची आर्थिक मदत तसेच १३५ दूध पावडरचे डबे देण्यात आले. त्यामुळे धागा टीमच्या कामाला आता एक वर्ष पूर्ण होतील आणि तसाच कार्यक्रम या वर्षीदेखील शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी आहे. या वर्षी सोफोश संचालित 'श्रीवत्स' या संस्थेतील अनाथ बाळांसाठी कोजागरी साजरी करत आहोत.
आपली उपस्थिती हि अनाथ बाळांच्या दुधाचा प्रश्न सोडवू शकेल ! आपण येऊन इथला आनंद द्विगुणीत कराल ही आशा आहे.

आपला कृपाभिलाषी
धागा कार्यकर्ता ( प्रमोद )