निळ्या खाडीच्या काठाला
माझा हिरवाच गाव.
जगात मी मिरवितो
त्याचे लावुनिया नाव !
पूल ओलांडिता पुढे
रस्ता येईल तांबडा.
घरी आणील सरळ
जरी दिसला वाकडा.
माणसांच्या जागीसाठी
दाटी करितात माड.
गर्द मधेच एखादे
आंब्या फणसाचे झाड.
असो झाडी किंवा वाडी
सुने नाही वाटायचे.
नादी आपुल्याच कोणी
तेथे गात असायचे.
थोडया पायवाटा हिंडा
लालतांबडया वाकडया.
होडया उपडया झालेल्या
तशा बघाल टेकडया.
जेथे होईल माध्यान्ह
तेथे पान वाढलेले.
काळोखात कुणीतरी
ज्योत घेउन आलेले.
गोव्यतला माझा गाव
असा ओव्यांतच गावा.
तेथे जावून राहून
डोळे भरून पाहावा.
No comments:
Post a Comment