Amazon

Wednesday, August 29, 2012

मरणांत खरोखर जग जगतें

मरणांत खरोखर जग जगतें;

अधि मरण, अमरपण ये मग तें. llध्रु०ll

अनंत मरणें अधीं मरावीं,
स्वातंत्र्याची आस धरावी,
मारिल मरणचि मरणा भावी,
मग चिरंजीवपण ये बघ तें. ll १ll

सर्वस्वाचें दान अधीं करिं,
सर्वस्वच ये स्वयें तुझ्या घरिं,
सर्वस्वाचा यज्ञ करीं तरि,
रे ! स्वयें सैल बंधन पडतें. ll२ll

स्वातंत्र्याचा एकचि ठावा
केवळ यज्ञचि मजला ठावा;
यज्ञ मार्ग ! हो यज्ञ विसावा !
का यज्ञाविण कांहीं मिळतें ? ll३ll

सीता सति यज्ञीं दे निज बळि,
उजळुनि ये सोन्याची पुतळी,
बळी देउनी बळी हो बळी,
यज्ञेंच पुढें पाउल बढतें. ll४ll

यज्ञिं अहर्निश रवि धगधगतो,
स्वसत्त्वदानें पाश छेदितो,
ज्योतिर्गण नव जन्मुनि जगतो,
रे स्वभाव हा ! उलटें भलतें. ll५ll

प्रकृति-गती ही मनिं उमजुनियां
उठा वीर, कार्पण्य त्यजुनियां;
'जय हर !' गर्जा मातेस्तव या !
बडबडुनी कांहीं का मिळतें ? ll६ll


- भा. रा. तांबे

No comments:

Post a Comment