Amazon

Friday, April 13, 2012

घर कौलारू

आज अचानक एकाएकी
मानस लागे तेथे विहरू
खेड्यामधले घर कौलारू ll धृ ll

पूर्व दिशेला नदी वाहते
त्यात बालपण वाहत येते
उंबरठ्याशी येऊन मिळते
यौवन लागे उगा बावरू ll १ ll

माहेराची प्रेमळ माती
त्या मातीतुन पिकते प्रीती
कणसावरची माणिकमोती
तिथे भिरभिरे स्मृती-पाखरू ll २ ll

आयुष्याच्या पाउलवाटा
किती तुडविल्या येता-जाता
परि आईची अठवण येता
मनी वादळे होती सुरू ll ३ ll



- अनिल भारती

आवाहन

ज्यांची बाग फुलून आली,
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले,
त्यांनी दोन गाणी द्यावीत ll१ ll

सूर्यकुलाशी ज्यांचे नाते,
त्यांनी थोडा उजेड द्यावा
युगायुगांचा अंधार जेथे,
पहाटेचा गाव न्यावा ll २ll

ज्यांच्या अंगणी ढग झुकले,
त्यांनी ओंजळपाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी,
रिते करुन भरुन घ्यावे ll ३ll

आभाळाएवढी ज्यांची उंची,
त्यांनी थोडेसे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना थोडे उचलून घ्यावे ll ४ ll



- गणेश (दत्ता) तात्याराव हलसगीकर

समतेचे हे तुफान उठले

ऊठ ऊठ सह्याद्रे, घुमवित बोल मराठी खडे;
समतेचे हे तुफान उठले; उठले सागराकडे ll धृ ll

हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी;
शिवबाने तलवार घासली याच मराठीवरी;
हिच्या स्वागतासाठी झडले तोफांचे चौघडे ll १ ll

टिळक, गोखले, फुले, रानडे, आगरकर वैखरी -
स्वातंत्र्याच्या पाच मशाली जळती वेदीवरी;
ह्या ज्योतीवर दीप पेटवा चला भविष्याकडे ll २ ll

स्वतंत्रतेचा मंत्र जयांना गर्भामध्ये मिळे,
तेच मराठे आम्ही, आम्ही सह्याद्रीचे सुळे;
स्वराज्यांतुनी पुढे चला रे, चला सुराज्याकडे ll ३ ll

दर्याच्या भरतीच्या लाटा महाराष्ट्रअंगना;
कंकणनादा भिऊनि तयांच्या शत्रु सोडिती रणा;
वीज माळुनी वेणीवरती त्याही घुसल्या पुढे ll ४ ll

ऊठ खेडुता, पुन्हा एकदा झाडुनिया घोंगडी;
ऊठ मजुरा, पुन्हा मारण्या आघाडीवर उडी;
एकजूट ही पाहुन पडतिल अन्यायाला तडे ll ५ ll


- विंदा करंदीकर

आपणच आपल्याला

आपणच आपल्याला लिहलेली
पत्रं वाचता वाचता
ओले होणारे डोळे पुसून
फडफडू द्यावित वा~यावर पानं....

थोडसं हसून आपणच आपल्याला
सांगावी कधीतरी एखादी गोष्ट
आपणच गावं आपल्यासाठी
रिमझिमत्या स्वरांच एखादं गाणं.......

आपणच जपावेत मनात;
वा~यावर झुलणारे गवताचे तुरे
एखादी धावणारी पायवाट, अन्
जपावेत काही नसलेले भास......

जिथं आपल्यासाठी फुलं उमलतील
अशी जागा सगळ्यांनाच सापडत नाही
मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना
आपणच द्यावेत थोडेसे श्वास........


- अनुराधा पाटील

देव अजब गारोडी

धरीत्रीच्या कुशीमधीं
बीयबियानं निजलीं,
वर्‍हे पसरली माटी
जशी शाल पांघरली.

बीय टरारे भुईत
सर्वे कोंब आले वर्‍हे,
गह्यरलं शेत जसं
अंगावरतीं शहारे.

ऊन वार्‍या‍शीं खेयतां
एका एका कोंबांतून,
पर्गटले दोन पानं
जसे हात जोडीसन.

टाया वाजवती पानं
दंग देवाच्या भजनीं,
जसे करती कारोन्या
होऊं दे रे आबादानी.

दिसामासा व्हये वाढ
रोपं झाली आतां मोठी,
आला पिकाले बहार
झाली शेतामधी दाटी.

कसे वार्‍यानं डोलती
दाने आले गाडी गाडी,
दैव गेलं रे उघडी
देव अजब गारोडी !



- बहिणाबाई चौधरी

माणूसपण गारठलंय

पूर्वी कसा पाऊसकाळ
चार महिने असायचा,
हिरवंगार रान पाहून
माणूस खुशीत हसायचा.

प्रत्येकाची कणगी भरून
धान्य मोप असायचं,
दुधदुभतं, तूप, लोणी
याला माप नसायचं.

पासाभरून धान्य तर
चिमणीच दारात टिपायची,
पै-पाहुण्यांसाठी माय
दिवसरात्र खपायची.

सणवार जत्रांमधून
किती जल्लोष असायचा,
भजन कीर्तन करीत गांव
आख्खी रात्र बसायचा.

एवढ्या तेवढ्या पावसावाचून
सारं चित्र पालटलंय,
गांवपण हरवल्यानं
माणूसपण गारठलंय.


- शशिकांत शिंदे

बिनभिंतीची शाळा

बिनभिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरु,
झाडे, वेली, पशु, पाखरे
यांशी गोष्टी करू.

बघू बंगला या मुंग्यांचा,
सूर ऐकुया त्या भुंग्यांचा.
फुलाफुलांचे रंग दाखवित
फिरते फुलपाखरू...

हिंडू ओढे, धुंडू ओहळ,
झाडावरचे काढू मोहळ
चिडत्या, डसत्या मधमाश्यांशी
जरा सामना करू...

भल्या सकाळी उन्हात न्हाऊ,
ऐन दुपारी पर्‍ह्यात पोहू.
सायंकाळी मोजु चांदण्या
गणती त्यांची करू.



- ग. दी. माडगुळकर

विझता विझता स्वत:ला

झूठ बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते
अशी आमंत्रणे आम्हालाही आली; नाहीच असेही नाही

असे किती हंगाम शीळ घालीत गेले घरावरून
शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही, असेही नाही

शास्त्र्याने दडवावा अर्थ आम्ही फक्त टाळच कुटावे
आयुष्याचा अनुवाद करा सांगणारे खूप; नाहीत असेही नाही

असे इमान विकत घेणारी दुकाने पाड्यापाड्यावर
डोकी गहाण ठेवणारे महाभाग नाहीत असेही नाही

अशा बेइमान उजेडात एक वात जपून नेताना
विझता विझता स्वत:ला सावरलेच नाही, असेही नाही


- नारायण सुर्वे

कुणकुण


वाळली सारी फुले, उरला तरी पण वास हा
लोपली वनदेवता, पण राहिला वनवास हा

पालवी झडली, तरी उरले जुने पण पान हे
गाव ते उठले, तरी उरले अजून वसाण हे

अग्नि तो विझला जरी, निघतो तरी पण धूर हा
वेदना सरली जरी, सुकतो तरी पण नूर हा

घोर वादळ संपले, पण राहिली हूरहूर ही
चंद्रिका विझली, तरी उरलीच रात्र निसूर ही

वाद ते मिटले, तरी पण राहिलेत विषाद हे
साद ओसरले तरी पण राहिले पडसाद हे

घाव तो बुजला जरी, उरली तरी पण खूण ही
ते रहस्यच लोपले, पण राहिली कुणकुण ही


- ना. घ. देशपांडे

भोंवरा

भोंवरा, फिरे गरगरा, पहा हा जरा
विसावा नाही, विसावा नाही,
त्या कितीहि फिरवा, थकवा येइ न काहीं ll १ ll

खिळ्याचे टोंक, तयावर झोंक, पाहुनी रोख
कसा सांभाळी, कसा सांभाळी
शाबास भोंवर्‍या ! कमाल केलिस वेळी ll २ ll

नाचतो, उभा राहतो, अहा डोलतो !
स्तब्ध कधि राही, स्तब्ध कधि राही
मग असे वाटते, मुळि तो फिरतच नाही ll ३ ll

गुंगणे, कोण पण जाणे ! तयाचे गाणे,
जसा की भुंगा, जसा की भुंगा,
करि गुड्गुड् अपुल्याशीच, घालितां पिंगा ll ४ ll

आकार, मनोहर फार, कशी ही आर
रंग किति नामी, रंग किति नामी !
तो खिशात घालुन शाळेतहि नेतो मी ll ५ ll

किति तरी, लोभ त्यावरी ! पहा तर करी,
असा फिरवीतो, तसा फिरवीतो,
वरच्यावर फिरवुन, हातावर तो घेतो ll ६ ll


- के. ना. डांगे

Monday, April 9, 2012

किती दिवस मी

किती दिवस मी मानित होतें
ह्या दगडापरी व्हावे जीवन;
पडो उन वा पाउस त्यावर
थिजलेलें अवधें संवेदन…
किळवुन ज्याच्या वरती डोळे
मनात यावे असले कांही
तोच एकदा हसुन म्हणाला-
दगडालाही चुकले नाही.
चुकले नाही… चढते त्यावर
शेवाळाचे जलमी गोंदण;
चुकले नाही .. केविलवाणें
दगडफुलाचे त्यास प्रसाधन…
थिजलेल्याचे असले कांही
त्याहुन वाते, हवे तुझे मन
सळसळणारे अन जळणारे
पशापशाने जाया भडकुन
– इंदिरा संत

निळा पारवा.

वसुंधरेच्या माथ्यावरती
घुमतो आहे
आभाळाचा निळा पारवा.
डोळ्यावरती राखी ढापण,
लक्ष सदाचें धनिणीपाशी
अन धनिणीच्या पायामधल्या
रुणझुणणाऱ्या नादापाशी.
-अवचित काही घडलें
आणि दचकला निळा पारवा;
टपोरल्या डोळ्याच्या गुंजा.
जाती त्याच्या अगदी जवळून
किलबिलणारे कुणी मुशाफिर
रंगित पक्षी…
कुणी घासली चोच तयावर;
कुणी घातली शिळ तयाला;
ऐकवैली…पंखाची फडफड;
दाखविले चित्रांकित वैभव
पंखावरचे.
गिरकी घालुन त्याच्या भवती
निघुन गेले.. धुंद मुशाफिर;
झुलवित अपुले पंखे,
झुलवित त्याला.
पुन्हा दचकला निळा पारवा’
मनात भरले वारे–\
पिसा पिसातुन थरथरणारे;
फुगली पंखे;
उचलुन धरला पोटापाशी
पाउ एकुटा;
मान ताठली जरा खालती
झेंप भाराया…
तोच वरी ये वसुंधरेचा
तांबुस गोरा कोमलसा कर.
भरवई त्याच्या टोची मध्ये
एकच मोती
शुभ्र टपोरा,
एकच माणिक , झगमगणारे.
पुन्हा टेकले पाउल खाली;
नितळाई ये पुन्हा पिसांवर
-आणि लागला पुन्हा घुमाया
आभाळाचा……. निळा पारवा.
- इंदिरा संत