Amazon

Saturday, March 17, 2012

मला वाटते.....Remembered poem of 2nd standard

मला वाटते बसुनी विमानी 
अफाट गगनी हिंडावे,
किंवा सुंदर नौके मधुनी 

समुद्रातुनी भटकावे.

निळा निळा तो समोर डोंगर, 

चढुनी त्यावर पाहावे,
राज्य पऱ्यांचे जाऊनी तेथे, 

राज्य पदाते मिळवावे.

परी भूमीवर संध्याकाळी, 

छाया काळी जो धावे,
तेव्हा वाटे सोडूनी सकला

नीज मातेला बिलगावे.

आतां उजाडेल !

खिन्न आंधळा अंधार
आता ओसरेल पार
लहरींत किरणांची कलाबूत मोहरेल
आतां उजाडेल !

शुभ्र आनंदाच्या लाटा
गात फुटतील आतां
मृदु गळ्यांत खगांच्या किलबिल पालवेल
आतां उजाडेल !

वारा हसेल पर्णांत
मुग्ध हिरवेपणांत
गहिंवरल्या प्रकाशी दहिंवर मिसळेल
आतां उजाडेल !

आनंदात पारिजात
उधळील बरसात
गोड कोवळा गारवा सुगंधांत थरालेल
आतां उजाडेल !

फुलतील नकळत
कळ्यांतले देवदूत
निळा-सोनेरी गौरव दिशांतून उमलेल
आतां उजाडेल !

निळें आकाश भरून
दाही दिशा उजाळून
प्रकाशाचें महादान कणाकणांत स्फ़ुरेल
आतां उजाडेल !

आज सारें भय सरे
उरीं जोतिर्मय झरे
पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल
आतां उजाडेल !


- मंगेश पाडगांवकर (१९५०)

पाकोळी



हिरवी झाडी, पिवळा डोंगर,
निळी-सावळी दरी,
बेट बांबुचे त्यातुन वाजे
वार्‍याची पावरी.

कभिन्न काळ्या खडकांमधुनी
फुटति दुधाचे झरे,
संथपणाने गिरक्या घेती
शुभ्र शुभ्र पाखरे !

सोनावळिच्या सोनफुलांचा
बाजुस ताफा उभा,
तलम धुक्याची निळसर मखमल
उडते, भिडते नभा.

हिरवी ओली मखमल पायी
तशी दाट हिरवळ,
अंग झाडतो भिजला वारा
त्यात नवा दरवळ.

डूल घालुनी जळथेंबांचे
तृणपाते डोलते,
शीळ घालुनी रानपाखरु
माझ्याशी बोलते !

गोजिरवाणे करडू होउन
काय इथे बागडू ?
पाकोळी का पिवळी होऊन
फुलांफुलांतुन उडू ?


- शांता शेळके

नदीमाय.

नदीबाई माय माझी
डोंगरात घर,
लेकरांच्या मायेपोटी
येते भूमीवर II १ II

नदीबाई आई माझी
निळे निळे पाणी,
मंद लहरीत गाते
ममतेची गाणी II २ II

नदीमाय जल सा-‍या
तान्हेल्यांना देई,
कोणी असो, कसा असो
भेदभाव नाही II ३ II

शेतमळे मायेमुळे
येती बहरास,
थाळीमध्ये माझ्या
भाजी-भाकरीचा घास II ४ II

श्रावणात, आषाढात
येतो तिला पूर,
पुढच्यांच्या भल्यासाठी
जाई दूर दूर II ५ II

माय सांगे, थांबू नका
पुढे पुढे चला,
थांबत्याला पराजय
जय चालत्याला II ६ II



- कुसुमाग्रज

तर मग गट्टी कोणाशी ?

"तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा"
"ताई, आणखि कोणाला ?
चल रे दादा चहाटळा !"

"तुज कंठी, मज अंगठी !
आणखि गोफ कोणाला ?"
"वेड लागले दादाला !
मला कुणाचे ? ताईला !"

"तुज पगडी, मज चिरडी !
आणखि शेला कोणाला ?"
"दादा, सांगू बाबांला ?
सांग तिकडच्या स्वारीला !"

"खुसू खुसू, गालि हसू
वरवर अपुले रुसू रुसू !"
"चल निघ, येथे नको बसू
घर तर माझे तसू तसू"

"कशी कशी, आज अशी
गंमत ताईची खाशी !"
"अता कट्टी फू दादाशी
तर मग गट्टी कोणाशी ?"


- भा. रा. तांबे

हिम्मत द्या थोड़ी

नका नका मला 
देऊ नका खाऊ 
वैरी पावसानं 
नेला माझा भाऊ


महापुरामधे 
घरदार गेलं 
जुल्मी  पावसानं 
दप्तरही नेलं 


भांडी कुंडी माझी 
खेळणी  वाहिली 
लाडकी बाहुली
जाताना पाहिली  


हिम्मत द्या  थोड़ी 
उसळू द्या रक्त 
पैसाबिसा नको 
दप्तर द्या फ़क्त 
                                           ---------- अशोक कौतिक कोळी

Saturday, March 3, 2012

बालगीत - सांग ना आई............

दिवसभर पावसात असून , सांग ना आई ,
झाडाला खोकला कसा होत नाही?

दिवसभर पावसात खेळून , सांग ना आई ,
वारा कसा दमत नाही ?

रात्रभर पाढे म्हणून, सांग ना आई ,
बेडकाचा आवाज कसा बसत नाही ?

रात्रभर जगुन सुद्धा , सांग ना आई ,
चांदोबा झोपी कसा जात नाही ?

दिवसभर काम करून , सांग ना आई ,
तुला मुळी थकवा कसा येत नाही ?

--------------- मंगेश पाडगावकर