Amazon

Saturday, July 30, 2011

आई


आई एक नाव असत
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही

जत्रा पांगते पाल उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
आई मनामनात तशीच ठेउन जाते काही
जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही

आई असतो एक धागा
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा
घर उजळते तेव्हा तीच नसत भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पड़त रान

आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ?
आई खरच काय असते,
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते
दुधावरची साय असते, लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही.


- फ. मु. शिंदे

Friday, July 29, 2011

गवाताच पातं


गवाताच पातं वार्‍यावर डोलतं
डोलतान म्हणतं खेळायला चला ||ध्रु||

झर्‍यातलं पाणी खळ खळा हसतं
हसताना म्हणतं खेळायला चला
निळं निळं पाखरू आंब्यावर गातं
गाताना म्हणतं नाचायला चला ||१||

झिम्मड पावसात गारांची बरसात
बरसात म्हणते वेचायला चला
छोटासा मोती लपाछपी खेळतो
धावताना म्हणतो शिवायाला चला ||२||

मनिच पिल्लू पायाशी लोळतं
लोळतान म्हणतं जेवायला चला
अहो,जेवायला चला
तुम्ही जेवायला चला ||३||


- कुसुमाग्रज

घननिळ(किनारा)


घननिळ सागराचा घननाद येतो कानी,
घुमती दिशा दिशांत लहरीमधील गाणी,

चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत,
कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत,

आकाश तेज भारे माडावरी स्थिरावे,
भटकी चुकार होडी लाडात संथ धावे,

वाळूत स्तब्द झाला रेखाकृती किनारा,
जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा,

जलधी बरोबरीचे आभासमान नाते,
त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे,

सानिध्य सागराचे आकाश पांघराया,
परी साथ ना कोणाची अस्तीत्व सावराया

- विद्याधर सीताराम करंदीकर

ऋणाईत...........................................


स्वत:वरचा जगावरचा विश्वास जेव्हा उडून जातो..
माउलीची कूस बनून शब्दच मला जवळ घेतात ...
लाजिरवाणे असे जीणे अपमानाचे जगत जातो..
प्राण चुंबुन घुसमटलेले शब्दसखेच धीर देतात...

अंधारून येतात दिशा..चार भिंती एक छप्पर..
काळोखात बुडून जाते..झाडे खातात मुकाट मार..
चिक चिक माती रप रप पाय..ठणकणारी जखम जशी..
असे होते मन आणि शब्दच होतात सहप्रवासी..

प्रवासाच्या सुरुवातीला वळणवेड्या मार्गावरून मरण येते
कवेत घेउन माझ्या आधी शब्दच त्याचे स्वागत करतात
ऋणाईत मी शब्दांना सर्वस्वाने ओलीस जातो..
प्रारब्धाच्या प्रकाशधारात ऋणाईत गाणे गातो...

कवी - केशव तानाजी मेश्राम

माझ्या गोव्याच्या भूमीत.


माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे,
कड्या-कपाऱ्यां मधुन
घट फ़ुटती दुधाचे||

माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्या-फ़णसाची रास,
फ़ुली फळान्चे पाझर
कळी फ़ुलांचे सुवास||

माझ्या गोव्याच्या भूमीत
वनश्रीची कारागिरी,
पाना-फ़ुलांची कुसर
पशु-पक्ष्यांच्या किनारी||

माझ्या गोव्याच्या भूमीत
उन्हाळ्यात खारा वारा,
पावसात दारापुढे
सोन्याचांदीच्या रे धारा||

माझ्या गोव्याच्या भूमीत
येते चांदणे माहेरा,
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा||

माझ्या गोव्याच्या भूमीत
चाफ़ा पानाविण फ़ुले,
भोळा भाबडा शालीन
भाव शब्दाविण बोले||

माझ्या गोव्याच्या भूमीत
गडे साळीचा रे भात,
वाढी आईच्या मायेने
सोन-केवड्याचा हात||

माझ्या गोव्याच्या भूमीत
सागरात खेळे चांदी,
आतिथ्याची, अगत्याची
साऱ्या षडरसांची नांदी||

- बा. भ. बोरकर

Tuesday, July 26, 2011

कुठे शोधिसी रामेश्वर...................

कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी,
हृदयातील भगवंत राहीला, हृदयातून उपाशी.


झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहीले डोळे उघडून, 
वर्षाकाठी पाऊस धारा, तुला न दिसला त्यात इशारा, 
काय तुला उपयोग आंधळ्या, दीप असून उशासी.


रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा, 
कधी न घेऊन नांगर हाती, पिकविलेस मातीतून मोती, 
हाय अभाग्या भगवे नेसून घर सन्यासून जाशी,


देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून,
कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी,
अवती भवती असून दिसेना, शोधितोस आकाशी.