शीर्षक पाहिल्यावर वाटले असेल हा चिंत्तन वगैरे कधीपासून करायला लागला. त्याच कारण असा आहे की मी दिलीप कुलकर्णी यांच " निसर्गायण" नावाचे शिबीर मार्च २०२४ मध्ये केलं. शिबीर करण्याचा योग्य कसा आला? ते मी नंतर सांगेन कधींतरी.
ते शिबीर म्हणजे एक युरेका मोमेन्ट आहे की काय असं वाटू लागले आहे. आनंद नाडकर्णी यांनी दिलीप कुलकर्णी यांची मुलाखत घेतलेली आहे , ती तुम्ही युट्युब वर पाहू शकता. म्हणजे त्त्यांचे शिबीर केले त्यानंतर मी युट्युब वर त्यांच्या मुलाखती पहिल्या. लोक म्हणतात की वेळ नाही मिळत कशालाच, इतके आपण व्यस्त झालेलो असतो. पण जस जसे पर्यावरण/ निसर्ग याविषयी वाचन वाढले तस तसे कळून चुकले की आपल्या दररोजच्या सवयी मध्ये खूप बदल करण्याची गरज आहे . आपण सोशल मीडियाचा खूप वापर करतोय आणि ते हि काही ध्येय न ठेवता ( Mindless Scrolling ) आणि ह्यामध्ये आपण ऊर्जा किती खर्च करतोय त्याविषयी न बोललेलच बरं आता तरी , त्यासाठी वेगळ लिहायचं आहे, ते मी नंतर लिहीन. तर तशी ती सवय कमी केली की आपोआप रिकामा वेळ मिळू लागला. रात्री चांगली ११:०० ते सकाळी ७ ( किंवा १० ते ६ ) या वेळेत झोप मिळू लागली. वाचन करण्यासाठी चांगला वेळ मिळू लागला. आणि त्यातून चिंतन करायला वेळ मिळाला. आय टी एम्लपोयी असल्यामुळे आपल्याला वर्षभरात काय काय केलं? कुठल्या चांगल्या गोष्टी शिकलो ? कुठले काम चांगले झाले ? यासाठी वर्षाच्या शेवटी एक मीटिंग असतेच की, त्याला आपण वार्षिक कामगिरी आढावा (Yearly performance review) म्हणतो. तस आपण स्वतःबद्दल कधी केलं आहे का? म्हणजे आपल्या सवयी , त्यात काय बदल हवेत म्हणजे स्वतः ला आणि समाजाला त्याचा काही उपयोग होईल? यातूनच माझे चिंतन वाढले आणि त्याच्यावर लिहायला सुरवात करावी म्हटले. याविषयी मी चिंतन करत होतो आणि आपल्या सवयी मध्ये किंवा जगण्यामध्ये शाश्वतता आणता येईल का असा विचार करत असताना काही बाबी मला खटकल्या. आपण खरंच स्वतंत्र आहोत का ? किंवा आपण खरंच स्वयंपूर्ण आहोत का ?
आपण जे अन्न खातो त्याबाबती स्वयंपूर्ण आहोत का ?
पूर्वी म्हणजे हरितक्रांतीच्या अगोदर जे देशी बियाणे शेतकरी पुढील वर्षीच्या पेरणीसाठी ठेवायचे तस आता होत आहे का ? आजूबाजूला सध्या शेती कशी होत आहे आणि ती खरंच शाश्वत आहे का ? याचा प्रश्न पडतो. जे आपले आजोबा पणजोबा शेती करायचे किंवा त्याच्या अगोदरच्या पिढ्या ज्यांनी १० हजार वर्ष सातत्याने शाश्वत शेती केली. १० हजार वर्षांपासून शेती अस्तित्वात आहे, याचे पुरावे मिळतात. आणि १० हजार वर्षे शेती केली होती म्हणजे ती शाश्वत आहे याचाच हा पूरावा. हरितक्रांती झाली ती त्यावेळेची गरज होती पण नंतर ज्यावेळी परिस्थिती चांगली झाली त्यावेळी आपण परत शाश्वत शेती कडे का आलो नाही , जी परंपरागत १० हजार वर्ष चालू होती. सध्या सहज पहिले तर नवीन शेती पद्धती मुळे आपण कितीतरी देशी वाण गमावले आहे. जे आपल्या वातावरणाशी जुळवून घेऊन म्हणजे कमी पाण्यात वाढणारे असेल किंवा थंडीच्या दिवसात फक्त दवबिंदूंच्या पाण्यावर वाढणारे पीक असेल( पर्यावरणाचा नाश आणि त्यामुळे थंडी कशी कमी झाली आणि त्याचे शेतीवर होणारे परिणाम हे वेगळ सांगायला नको ). चांगली प्रतिकार शक्ती असणारे बियाणे असायचे. आपण सर्वच गमावून बसलो आहोत. आपण सध्या रासायनिक खते , कीटकनाशके , हायब्रीड बियाणे हे घेण्यासाठी सर्वस्वी दुसऱ्या कंपन्यांवर अवलंबून आहोत. दरवर्षी आपल्याला नवीन बियाणे का खरेदी करावे लागते. जे पीक उगावल्यावर त्याचे बी फक्त खाण्यासाठी वापरू शकतो आणि परत नवीन रोप उगवण्याची क्षमता पिकवलेल्या बियाणांमध्ये नसते, असच संशोधन का बर झाले असेल? आणि याच कारणामुळे मनुष्य प्राणी पण नवीन पिढी जन्माला घालण्यापासून वंचित होत आहे असं काही विचारवंत सांगताना आढळतात. कारण जस अन्न तुम्ही खाणार तसेच परिणाम तुमच्या आरोग्यावर होणार. बाजारामध्ये आजकाल बी नसलेली फळ मिळू लागलीत. त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतील हे वेगळे सांगायची गरज नाही.
मी काही दिवसापूर्वी "आहारातला औद्योगिक ‘अन्ना’चार " असं शीर्षक असलेला लेख लोकसत्ता मधे वाचला, तो लेख एका पुस्तकाच परीक्षण होते - ‘अल्ट्रा प्रोसेस्ड पीपल’. त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. ते वाचल्यावर मला खरंच प्रश्न पडला, आपण खरंच काय खातो त्यावर आपले नियंत्रण आहे का ? की आपले स्वातंत्र्य हिसकावून घेतले आहे. खालचे वाक्य वाचून तर मी शॉक झालो. " आज सर्रास वापरला जाणारा सॅक्करीन हा कृत्रिम गोड पदार्थ कोळसा आणि डांबरापासून औषधनिर्मिती करताना अनवधानाने निर्माण झाला." म्हणजे आपल्या ताटात भविष्यात पेट्रोकेमिकल येत कि काय ? अशी भीती वाटू लागली आहे.
चला आपण उद्या ठरवलं कि प्लास्टिक वापरायचं नाही तर आपण कितपत प्रयत्न करु ? खरंच आपल्याला प्लास्टिक मुक्त जगण्याच स्वातंत्र्य आहे का ? सहज सुपर मार्केट मध्ये गेले तर कळेल की हे व्यावसायिक लोक स्वतःच्या नफेखोरी साठी किती कचरा विकत आहेत. तुम्ही म्हणाल नव्या वस्तूंना कचरा काय म्हणतोय ? कारण प्लास्टिक च्या वस्तू ह्या काही काळासाठी उपयोगी आणि अनंत काळासाठी ( अनंत काळ अतिशयोक्ती झाली , तरी ५०० वर्ष तरी ते कचरा बनून पृथ्वी वरती राहते ) कचरा होऊन बसतात. एका मोठया शास्त्रज्ञ / विचारवंत याने म्हटले आहे कि मनुष्य प्राणी कचरा( वेस्ट) निर्माण करतो आणि त्यातुन थोडाफार उपयोग स्वतः साठी / वापरण्यासाठी करतो. म्हणजे पहा, तुम्ही एका समारंभात गेला आहात आणि तिथे पाणी पिण्यासाठी वन टाइम युज प्लास्टिक ग्लास ( एकदा वापरण्याचा प्लास्टिक
ग्लास) वापरला , तर लक्षात येईल की फक्त एकदा पाणी पिण्यासाठी तो आपण वापरला म्हणजे ५ मिनिट त्याचा वापर झाला , पण पुढचे ५०० वर्ष तो या पृथ्वीवर म्हणजे तुमच्या पुढच्या २० ते २५ पिढ्या त्याच्यासोबत असणार आहे. तुम्ही सहज बघा कि एखादी स्टील ची पाण्याची बाटली घ्यावी आणि प्लास्टिकचा वापर टाळावा , पण नंतर तुम्हाला दिसेल की त्या बाटलीच्या टोपणासाठी परत प्लास्टिक वापरले आहे. म्हणजे तुमची प्लास्टिक पासून सुटका नाही. महानगरपालिका सांगून सांगून थकली कि प्लास्टिक पिशव्या वापरू नका , तरी आपण बाजाराला जाताना कापडी पिशवी घेऊन जायचं विसरतो किंवा सवय लावून घेत नाही. या साध्या कारणामुळे आपण प्लास्टिक पिशवी घेतो आणि पुढची ५०० वर्ष तिच्या सोबत पृथ्वीवर राहायला तयार असतो.
प्लास्टिक बद्दल आक्रमक आपणच व्हायला हव आहे. कारण ते तुमच्या आरोग्याशी निगडित आहे. काही दिवसापूर्वी मी "डाउन टू अर्थ " (सेंटर फॉर सायन्स अँड डेव्हलोपमेंट हे पर्यावरण विषयक पत्रकारिता करते )वर एक लेख वाचला होता,की मनुष्याच्या रक्तामध्ये प्लास्टिक कण (Micro-plastic) आढळले. त्याची लिंक मी खाली दिली आहे. म्हणजे हे प्लास्टिक आता आपल्या रक्ता पर्यंत पोहचले आहे. त्यावेळी वाटत आपण खरंच प्लास्टिक मुक्त/ स्वतंत्र आहोत का ? किंवा होऊ शकतो का ?
पुढचा मुद्दा आहे की इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीजेचा प्रचंड वापर. आपण आसपास पाहिले तर दिसेल की सुशोभीकरणासाठी किंवा करमणूक म्हणून असेल,आपण विजेचा वापर खूप करतो. ही गोष्ट तुम्हाला शहरात जास्त जाणवेल. सहज तुम्ही एखादी दुकान किंवा रेस्टॉरंट पाहिले तर तुम्हाला दिसेल की विजेच्या रंगीत फुलांच्या माळा लखलखत आहेत. आणि त्या रात्रभर चालू असतात. मी एका मेडिकल च्या बाहेर असलेली लाईट पहिली . मेडिकल चालू असेल तर ठीक आहे , पण रात्री अकरा नंतर ते सकाळी ६ पर्यंत लाईट चालू ठेवायचं काही कारण दिसत नाही. नैसर्गिक अधिवासात असलेल्या प्राण्यांना रात्री अंधार हवा असतो, उदा. घुबड. असे भरपूर प्राणी आहेत. या अश्या जास्त प्रकाशामुळे त्यांचा अधिवास धोक्यात येतो. बर आपण फक्त माणसाचा विचार करूया, ठीक आहे आपल्याला त्रास होत नाही प्रकाशाचा, पण ज्याठिकाणी वीज तयार होते , तिथल्या पर्यावरणाच काय ? आजही भारतात सर्वात जास्त विजेची निर्मिती ही दगडी कोळश्या मार्फत होते. ( तुम्ही इंटरनेटवर डेटा पाहू शकता ) दगडी कोळसा म्हटले की खाणी आल्या त्यामुळे मानवाला होणारे दुष्परिणाम. तुम्ही एखादी खाण पाहा आणि तेथील नैसर्गिक साधन संपत्तीचा झालेला ऱ्हास पहा. आपण आपली जीवनशैलीच अशी बनवली आहे की विजेचा वापर न करणे शक्य नाही. विजेचा वापर न करता जगणं शक्य नाही तर मग फक्त मूलभूत गरजा ज्या आहेत त्यासाठी फक्त वापर करता येईल का ? कि तेवढही स्वतंत्र्य नाही ? दिवसेंदिवस तापमान वाढत आहेत आणि त्यामुळे "वातानुकूलक" किंवा "एअर कंडिशनिंग" चा वापर वाढला आहे. म्हणजे आपले घर थंड राहावे म्हणून आपण पृथ्वीचं तापमान वाढवत आहोत. हा शाश्वत मार्ग नाही. एसीचा वापर वाढेल आणि त्यामुळे विजेचा वापर वाढत राहील आणि हरितगृह वायू वाढत राहतील आणि त्यामुळे भविष्यात तापमान अजून वाढेल. दुसरा कुठला शाश्वत मार्ग आहे का ? मानवाला दिलेल्या बुद्धीचा वापर करून आपण ते शोधू शकत नाही का ?
अजून एक मुद्दा आहे की विजेचा वापर करून होणारे ध्वनिप्रदूषण. तुम्ही कुठला उत्सव पहा किंवा लग्न समारंभ अजून कुठले समारंभ असतील. तिथे वाजणारे डीजे. वर्षाचे ३६५ दिवस कुठे ना कुठे लग्न किंवा समारंभ हे चालूच असतात आणि तिथे डीजेच्या प्रचंड आवाजामुळे होणारे ध्वनिप्रदूषण. लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिक सोडा, पण तरुण पिढी आहे त्यांनाही सार्वजनिक बहिरेपणा येत आहे. खरंच आपल्याला शांत वातावरणात जगण्याचा अधिकार आहे ? खरंच आपण त्या बाबतीत स्वतंत्र आहोत.
माणसाच्या मूलभूत गरज काय आहेत ?
शुद्ध हवा
वातावरणात वाढलेलं प्रदूषण लक्षात घेता शुद्ध हवा मिळणे दुरापास्त झाले आहे. निसर्गामध्ये वायू प्रदूषण कमी करण्याची नैसर्गिक क्षमता असते पण त्याला काही मर्यादा आहेत. ती मर्यादा आपण केंव्हाच ओलांडली आहे . त्यामुळे शुद्ध हवा घेण्याचा मूलभूत अधिकार आपण केंव्हाच गमावला आहे.
शुद्ध पाणी
जस निसर्गामध्ये वायू प्रदूषण कमी करण्याची नैसर्गिक क्षमता असते तशीच क्षमता वाहणाऱ्या नद्यांमध्ये पाणी शुद्ध करण्याची नैसर्गिक क्षमता असते. तुम्ही पूर्वी नद्या पाहिल्या असतील तर नक्की लक्षात येईल वाहणारे पाणी पुढे जाऊन स्वच्छ होते. पण साचलेले डबके अस्वच्छ पाण्याने भरलेले असते. वाहणाऱ्या नद्यांमध्ये पाणी शुद्ध करण्याची नैसर्गिक क्षमता आहे तिची मर्यादा पण आपण केंव्हाच ओलांडली आहे. सांडपाणी प्रक्रिया ना करता आपण नदीमध्ये सोडतो. त्याचे प्रमाण इतके वाढलेले आहे कि नदी ते पाणी नैसर्गिक रित्या स्वच्छ करू शकत नाही. दुसरा मुद्दा हा की स्वच्छ पाणी शुद्ध करण्यासाठी आपण क्लोरीनचा वापर करतो जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्याचे लगेच नाही पण दिर्घकाळानंतर आपल्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम दिसतील. बर ते फक्त पिण्याच्या पाण्यासाठी क्लोरीनचा वापर केला तरी ठीक म्हणू , पण इतर वापरासाठी असलेल पाणी गरज नसताना त्यामधेही क्लोरीनचा वापर होतो. जो सरते शेवटी नदीत मिसळून नद्या प्रदूषित करतं. तुम्ही म्हणाल प्लास्टिकबंद बाटली चे पाणी वापरू. पण मायक्रोप्लास्टिक मुळे होणार दुष्परिणाम वरती नमूद केलेले आहेत. मूर्त ऊर्जा (embodied energy), वॉटर फूटप्रिंट आणि कार्बन फूटप्रिंट चा विचार केला तर खूप परिमाण पुढे येतील. म्हणजे शुद्ध पाणी पिण्याचे मूलभूत अधिकार आपण गमावला आहे.
पौष्टिक आहार
माणसाला जगण्यासाठी पौष्टिक आहार लागतो . आजच्या काळात रासायनिक खतांचा प्रचंड वाढलेला वापर लक्षात घेता आपला आहार हा पौष्टिक राहिलेला नाही. शेतीचे उत्पन्न वाढावे म्हणून झालेला हायब्रीड धान्याचा वापर हे हि एक कारण आहे माणसाचे आरोग्य ढासळण्यामागे. आजकाल वाढलेल्या वंध्यत्वाच्या समस्याचे मूळ कारण हेच हायब्रीड धान्य आहे. असे वाचनात आले. पौष्टिक आहार न मिळण्याचं अजून एक कारण म्हणजे फास्ट फूड. आजकाल कुठेही जा जवळच्या स्टॉल वर तुम्हाला फास्ट फूड ( जंक फूड ) पॅकेट विकायला दिसतील. आपले नकळत त्याच्यावरील अवलंबत्व वाढत आहे. आपण परावलंबी होत आहोत. इथेही पौष्टिक आहार मिळवण्याचे स्वतंत्र्य आपण गमावून बसलो आहोत
कपडे
फास्ट फॅशन चे दुष्परिणाम खूप लोकांच्या लक्षात आलेले नाहीत. पूर्वी कपडे दिवाळी / पाडवा या सणामध्ये घेतले जायचे किंवा एखाद्या जवळच्या लग्न समारंभामध्ये घेतले जायचे. पण सध्या लोक दर दोन ते तीन महिन्यात नवीन कपडे घेतात , जुनी फॅशन बाद होते. कुठल्याही क्षुल्लक कारणासाठी शॉपिंग होते. त्यामुळेच शॉपिंग मॉल मध्ये नेहमी भरगच्च गर्दी असते. या अश्या फास्ट फॅशन मुळे प्रचंड कचरा तयार होतो आणि पुढचे कित्येक वर्ष तो आपल्यासोबत पृथ्वीवर राहतो. पूर्वी सुती कपडे वापरायचो जे कचऱ्यात गेले तरी निसर्ग त्याला कुजवत असे. तसे आता आलेले टेरेलिन सारखे कपडे निसर्गात कुजत नाहीत , पुढची ५०० वर्ष ती पृथ्वीतलावर आपल्यासोबत राहतील. म्हणजे आपल्या २/३ महिन्याच्या गरजेसाठी आपण त्यांना ५०० वर्ष पृथ्वीवर कचरा म्हणून ठेवतो. घन कचरा ही पण एक गंभीर समस्या होऊन बसली आहे
राहायला घर असणे ही एक माणसाची मूलभूत गरज आहे.
पूर्वी मातीची घरं असायची. काही जुने वाडे असतील जे चुना आणि दगड वापरून बांधलेले असायचे जे जवळपास १०० वर्ष टिकायचे. आजकाल माणसाला नवीन घर बांधायचं किंवा घ्यायचं म्हंटले तर आयुष्यभराची कमाई घालवावी लागते. तेंव्हा कुठे घर तयार होते. पण सध्या सिमेंट काँक्रीट चा वापर करून घरं बांधली जात आहेत. आणि ती उन्हाळ्यामध्ये तापतात. पण जुनी घर जी दगड , माती आणि लाकूड हे वापरून बांधली जात. जी उन्हाळ्यात थंड आणि थंडीत गरम राहत असत. पण सिमेंट काँक्रीटचा वापर सुरु झाल्यापासून घराचे तापमान हे वाढलेले दिसते. आजकाल आपण फर्निचर करतो आणि त्याच्या गुणवत्ते बद्दल विचारले असता ते व्यावसायिक स्वतः सांगतात की लोक आजकाल दर ४/५ वर्षात नवीन फर्निचर बनवतात आणि जुने टाकून देतात. त्यामुळे मटेरियल ची गुणवत्ता पण त्याप्रमाणे असते ( ४/५ वर्ष टिकणारी ) त्यामुळे तिथेही आपल्याला तडजोड करावी लागते. म्हणजे दर ४/५ वर्षांनी तो खर्च करावा लागतो. जरी तुम्हाला वाटले घनकचरा कमी करावा आणि जास्त पैसे देऊन चांगली गुणवत्ता असलेले मटेरियल शोधावे. जेणेकरून पुढचे २० वर्ष तरी दुरुस्ती करावी लागणार नाही. किंवा जुना कचरा तयार होणार नाही. पण ते बाजारामध्ये शोधले तरी मिळणार नाही. म्हणजे व्यावसायिकानी नफेखोरी साठी ते बनवलेच नाही.
अजून एक दुसरा मुद्दा असा की या सिमेंटची घरं ज्याचे आयुष्य हे जास्तीत जास्त २५ ते ३० वर्ष असते . तुम्ही पाहता २५ ते ३० वर्ष जुन्या इमारती धोकादायक होतात आणि पडून नवीन बांधाव्या लागतात. म्हणजे जे तुम्ही तुमच्या कर्तृत्वाच्या काळात कमावलेले सर्व घर घेण्यासाठी घालता आणि परत २० ते ३० वर्षांनी पुन्हा नवीन बांधायची पाळी येते त्यावेळी तुम्ही निवृत्त झालेले असता. त्यामुळे हि सिमेंटची घरं कितपत शाश्वत आहेत सांगता येणार नाही. राहायला घर असणे हे पण एक चैनीची वस्तू होऊन बसली आहे. जी फक्त धनाडग्या लोकांनाच परवडते. या मूलभूत गरजेपासूनही आपण पारतंत्र्यात आहोत असं वाटत ?
- प्रमोद डमरे
No comments:
Post a Comment