Amazon

Thursday, June 13, 2013

बाप


शेतामधी माझी खोप,
 तिला बोराटिची झाप.
 तेथे राबतो कष्टतो ,
माझा शेतकरी बाप.

लेतो अंगावर चिंध्या
खातो मिरची भाकर
काडी उसाची पाचट
जगा मिळाया साखर

काटा त्याचाच का पायी
त्यानं काय केलं पाप
शेतामधी माझी खोप,
 तिला बोराटिची झाप.

माझा बाप शेतकरी
उभ्या जगाचा पोशिंदा
त्याच्या भाळी लिहिलेला
रात दिसं काम धंदा

कष्ट  सारे त्याच्या हाती
दुसरयाच्या हाती  माप
 शेतामधी माझी खोप,
 तिला बोराटिची झाप

बाप  फोडितो लाकडं
माय पेटाविते चूल्हा
घामा मागल्या पिठाची
काय चव सांगू तुला

आम्ही कष्टाचच  खातो
जग करी हापाहाप
शेतामधी माझी खोप,
 तिला बोराटिची झाप

 ---  इंद्रजीत भालेराव

No comments:

Post a Comment