Amazon

Friday, February 22, 2013

या झोपडीत माझ्या


राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली।
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥धृ॥

महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने ।
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥१॥

भुमीवर पडावे , ता-यांकडे पहावे ।
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥

स्वामीत्व तेथ त्याचे, तैसेचि येथ माझे ।
माझा हुकुम गाजे, या झोपडीत माझ्या॥३॥

महालापुढे शिपाई , शस्त्री सुसज्ज राही।
दरकार तिही नाही, या झोपडीत माझ्या ॥४॥

जाता तया महाला, ' मत जाव' शब्द आला।
भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥५॥

महालात चोर गेले,चोरुनी द्रव्य नेले ।
ऐसे कधी न झाले, या झोपडीत माझ्या ॥६॥

पहारे आणि तिजो-या, त्यातुनी होति चो-या ।
दारास नाही दो-या, या झोपडीत माझ्या॥७॥

महालि सुखे कुणा ही ? चिंता सदैव राही ।
झोपेत रात्र जाई , या झोपडीत माझ्या ॥८॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा।
कोणावरी न बोझा,या झोपडीत माझ्या॥९॥

चित्तास अन्य रामा, शब्दी उदंड प्रेमा ।
येती कधी न कामा, या झोपडीत माझ्या ॥१०॥
पाहोनि सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे ।
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥११॥

वाडे, महाल, राणे केले अनंत ज्याने ।
तो राहतो सुखाने, या झोपडीत माझ्या ॥१२॥ '
तुकड्या ' मती स्फ़ुरावी, पायी तुझ्या रमावी।मुर्ती तुज़ी रहावी, या झोपडीत माझ्या||

No comments:

Post a Comment