Amazon

Monday, May 21, 2012

मी वाचवतोय

हाकेतून हद्दपार होतेय आई
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई
शाळांतून बाद होतेय बाराखडी आणि अंकलिपी
औटकीसहित सगळे पाढे जातायत विस्मरणात
समोर येत नाहीत आता आधीसारखे
खाटीक, कसाई आणि पालखीचे भोई

हरवत चाललाय किराणा आणि भुसारा
सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर
लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा
निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट

कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली
मागच्या धगीवर रटरटणारी आमटी
राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर
पखालीने मान टाकली कसायासमोर
उभे होण्याआधीच
कावड आणि श्रावणबाळ
इतिहासाच्या अडगळीत

बोलाचालीतून निघून चाललीय माझ्या आईची बोली
सुटीत आता खेळत नाहीत मुलं
विटीदांडू आणि लगोर्‍या
थांबून गेलाय त्यांचा दंगा,
आट्यापाट्या आणि पिंगा
परकर्‍या मुली खेळत नाहीत आता
आधीचे मातीतले खेळ

पोरं आता दंग असतात
दूरदर्शनच्या चॅनेलवर
बघत क्रिकेटची मॅच
आणि उलगडत क्राइम थ्रिलर
आणि दंगा करतात वडीलधारी माणसं
गॅस सिलिंडर आणि त्रिशूलाच्या
नवशिक्षित तालावर


लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते
शब्द बापुडे केवळ वारा
तसे विरून जातायत
एक-एक इंद्रिय निकामी होत
गळून जाईल शेपटीसोबत
मी वाचवतोय माझी कविता
आणि माझी आई
आणि माझी बोली
आणि माझी भूमी
कवितेसोबत



- सतीश काळसेकर

No comments:

Post a Comment