Amazon

Tuesday, December 25, 2012

पाऊस खुळा

पाऊस खुळा, किति पाऊस खुळा !
शिंपडून पाणी, आई ! भिजवि फुला ll धृ.ll

नाचे किती वेड्यापरी,
बडबडे कांहींतरी
झोडपतो उगाच हा वेलीच्या मुला ll १ll

दीनवाणी वेलीबाई,
पांघराया नाहीं कांहीं
काय करू, उघडा हा राहे छकुला ! ll २ll

उचलून आणूं काय,
पुसूं डोकें, अंग, पाय ?
काकडून गेला किती माझा माकुला ! ll ३ll

निजवूं या गादिवर,
पांघरुण घालूं वर,
देऊं काय, सांग आई, आणुन तुला ? ll ४ll

काय– "नको तोडूं फूल,
वेल– पावसाचें मूल ?
ऊन येतां चमकेल त्याचा डोळुला ?" ll ५ll

आणि, येऊं मी घरांत ?
भिजूं नको अंगणांत ?"
नको आई– ! चमकेल मीही आपुला ! ll ६ll

मज वेडा म्हणतील ?
फूल शहाणें होईल ?
मग वेडी म्हणतील सगळे तुला ! ll ७ll


गिरीश

No comments:

Post a Comment