२०१६
हे वर्ष आता शेवटच्या टप्प्यात येत आहे, आणि सहज विचार आला की आपण ह्या
वर्षात काय नवीन मिळवलं. तसं हे वर्ष ठरवलेल्या गोष्टींपेक्षा जास्त देऊन
जात आहे आणि अजुन ३ महीने उरले आहेत. पुण्यात आल्यानंतर ह्या वर्षाच्या
सुरवातील पूर्ण स्थिरावलो होतो. तस डोक्यात विचार होते की पुण्यात आल्यावर
आपण काहीतरी करू, दररोज मशीन सारखे ऑफिस मधे काम करणे आणि विकेंडला घरी
आराम करणे आवडत नव्हतं, वयही तसंच होत म्हणून वाटायच ह्या वयात नाही तर मग
नंतर कधी करणार काम?
आय. टी. मधे आहे त्यामुळे विकेंडला सुट्टीचे २
दिवस मिळतात. म्हणून ठरवलं की हे दोन दिवस आपण वेगळ्या कामासाठी द्यायचे,
लोकसत्ताच्या एक लेख वाचला होता काही लोक स्वतः व मित्रांचा समूह मिळून इतर
लोकांसाठी, समाजासाठी किंवा संस्थेसाठी काम करतात. तसाच विचार माझ्याही
मनात आला आणि ठरवलं की आपणही तसाच समूह बनुन काम करावे. पण सर्वांनाच आपला
वेळ देणं अवघड होत म्हणून विचार केला की एखाद्या चैरिटी शो करणाऱ्या
समूहामधे सामील व्हावं. एका समुहाची तशी माहिती मला गेल्या वर्षी ह्याच
दिवसात फेसबुक वरुन झाली.
तो शो होता " निमित्त कोजागरीचे "-
'स्नेहांकुर ' या अहमदनगर येथील संस्थेतील लहान अनाथ बाळाच्या दुधासाठी
आर्थिक मदत व्हावी याकरीता आयोजीत केला होता. दिनांक २७ ऑक्टोबर २०१५ रोजी
बालशिक्षण, कोथरूड पुणे येथील प्रेक्षागृहात गायिका सायली पानसे आणि सानिका
गोरेगांवकर यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. ह्या कार्यक्रमाचे आयोजन '
धागा समुहाने' केलेे. ही माहीती फेसबुकच्या माध्यमाने मला मिळाली आणि ठरवलं
की आपणही ह्या समुहामधे सामिल होऊन कामाला हातभार लावायचा.
ओळख
नसल्याने संपर्क होत नव्हता पण धागा समुहामध्ये काम करायची इच्छा होती. आणि
विचार केला पुढील कार्यक्रमास भेट द्यायची. कार्यक्रमाचा आस्वाद घेतल्याचा
आनंद मिळेल व पैसे चांगल्या कामासाठी जात आहेत याचं समाधान म्हणून.
धागाचा पुढ़चा कार्यक्रम झाला तो बाबा आमटे यांच्या 'महारोगी सेवासमिती
वरोरा' (आनंदवन) या संस्थेसाठी, तो दिवस होता २७ फेब्रुवारी २०१६. अगोदर
फेसबूकवर माहिती मिळाल्याने कार्यक्रमासाठी वेळ काढला. हा कार्यक्रम
बालशिक्षण, कोथरूड पुणे येथील प्रेक्षागृहात होता यामध्ये'गुरुदत्त'वर
चित्रित झालेल्या आणि गीता दत्तने गायलेल्या गाण्यांचा मनस्वी प्रवास सादर
झाला आणि कार्यक्रम उत्तमरित्या पार पड़ला व प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही
दिसला. तस मी कॉलेज मधे असताना गुरुदत्त यांचा ' प्यासा ' हा चित्रपट
पाहिला होता त्यामुळे त्यांच्यावरील चित्रित गाण्यांची थोड़ी माहिती होती
तसेच त्या सिनेमावर व त्यांच्या आयुष्यावर भारतात नव्हे तर भारताबाहेरही
काही लोकांनी डॉक्यूमेंट्रीज केल्या. ' गुरु -गीता' हा कार्यक्रम
पाहिल्यावर न ऐकलेली गाणी ऐकायला मिळाली व माझी आवड़त्या गाण्याची लिस्ट
वाढत गेली. त्यांच्या जीवनामधला प्रवास कसा होता याचीही माहिती ह्या
कार्यक्रमामुळे झाली. ह्या कार्यक्रमामुळे मला पहिल्यांदा 'धागा समुहा 'शी
ओळख झाली.




मे- २०१६ मध्ये 'महारोगी सेवा समिती वरोरा' आयोजीत सोमनाथ
श्रमसंस्कार शिबिरामध्ये सामिल झालो ह्याविषयी मी ब्लॉगवर लिहिले आहे.
त्या एका आठवड्याच्या शिबिरामध्ये खुप काही शिकलो व नवीन माणसांशी जोडला
गेलो व धागा समूह सदस्यांची चांगली ओळखही झाली. शिबिरानंतर पुण्यात आल्यावर
धागा समुहाचा एक धागा झालो
धागा समूह मधे यायच्या अगोदर कोणाचीही
ओळख नव्हती फक्त शेखर सराना फेसबुकमुळे ओळखायचो. तोच धागा पकडून मी धागा
मधे सामील झालो. त्यानंतर धागाचे विविध कार्यक्रम झाले त्यामध्ये,
गायक
प्रथमेश लघाटे यांचा ' बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ' हा अभंगाचा कार्यक्रम
आषाडी एकादशीनिमित्त संतोष गर्जे यांच्या सहारा अनाथालय या संस्थेच्या
आर्थिक मदतीसाठी आयोजीत केला. या कार्यक्रमाचा दूसरा शो धागा समुहाने
साधनाताई आमटे स्मृतीदिनानिमित्त त्यानी सुरु केलेल्या 'गोकुळ' या
अनाथालयाच्या आर्थिक मदतीसाठी आयोजीत केला.
यानंतर संगीतकार ' कौशल
इनामदार' आणि अभिनेत्री 'स्पृहा जोशी' यांचा ' मैफल ' हा मनोरंजनात्मक
कार्यक्रम केला, यामध्ये स्पृहा जोशी यांचे कविता वाचन व काही गाणी व संगीत
निर्मीती करताना आलेले गमतीशीर अनुभव कौशल यांनी सांगितले. हा कार्यक्रम संतोष गर्जे यांच्या सहारा अनाथालय या संस्थेच्या आर्थिक मदतीसाठी आयोजीत केला होता.
कार्यक्रमाचे आयोजन कसे करावे? आणि पूर्ण व्यवस्थापन कसे असावे ? याची
काहीही माहिती नव्हती अगदी शुन्यापासून सुरवात. तरीही आम्ही सर्वानी आपापली
कामे विभागुन घेतली. मी नवीन होतो पण इतर सदस्याना कार्यक्रम आयोजनाची
माहिती होती. त्यामुळे यांच्याकडून सर्व कामे हळू हळू शिकत गेलो. कधी कधी
विचार यायचा की आपल्याला जमेल का हे सर्व, पण नंतर विचार यायचा की आपला
प्रयत्न प्रामाणिक असेल तर सोबत देणारे हात साथ द्यायला येतीलच. कुठलंही
काम एकट्याने होत नाही त्याला टीमची आवश्यकता असतेच, आणि ती टीम म्हणजे
'धागा समूह'!
ह्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाबरोबर आम्ही स्वच्छता आणि
वृक्षारोपणाचे काम केले. धागा समुहामध्ये सामील होण्या अगोदर धागा समुहाने
तळजाई येथील स्वच्छता केली होती. त्यानंतर वृक्षारोपणासाठी आम्ही पेठकर
साम्राज्य कोथरूड जवळील ' जिज्ञासा शाळा ' निवडली. जून महिना चालू झाला
होता पाऊस पड़ायला सुरवात अजुन झाली नव्हती. वृक्षारोपणा अगोदर स्वच्छता
करायची गरज होती त्यामुळे एक दिवस देउन धागा समुहाने स्वच्छता केली आणि
त्यानंतरच्या भेटीमधे आम्ही अजुन एकदा स्वच्छता करुन झाडे लावण्यासाठी
खड्डे खाणुन ठेवले. व जुलैच्या पहिल्या पावसानंतर आम्ही वृक्षारोपण केले
यामध्ये आम्ही जवळपास ५३ रोपे लावली. ह्या कामाचा आनंदच वेगळा होता कारण,
ज्या दिवशी वृक्षारोपणाचा दिवस उजाड़ला होता त्या दिवशी खुप पाऊस होता.
पावसात बाहेर कसं पडावं हा विचार होता पण शेखर सर म्हणायचे एकदा काम करायच
ठरवलं की फिक्स करायच मग काहीही होवो. आणि बाबा आमटे यांचं एक वाक्य आठवले,
" असे तरुण श्रमस्वी हवे आहेत की जे वाऱ्या वादळात, पावसात, गारठ्यात, रखरखाटात व टोळधाडीत धरीत्रीचा पान्हा बेफाम भोगु शकतील"
- बाबा आमटे
आणि त्या पावसात भिजण्याचा आनंद घेत वृक्षारोपण झाले. आणि ठरल्याप्रमाणे कामही झाले.
धागा समूहामधे आल्यापासून खुप काही शिकायला मिळाले खुप मोठमोठ्या
व्यक्तीशी जवळून संबंध आला. नंतर वाटले आपण कुठल्या जगात वावरत होतो, इथे
समाजात कितीतरी लोक अविश्रांतपणे चांगली कामे करत आहेत. धागाची कामे
करताना २ वेळा नगर येथील स्नेहालय संस्थेला भेट देण्याचा योग आला.
त्यांच्या कामाची माहिती मिळाली. त्यांनी केलेली कामे ही खुप थक्क करणारी
आहेत.
नसिमादिदी
यांच्या प्रकल्पासाठी "साद माणुसकीची" उपक्रमाचे आयोजन, नगरकरांशी दिदींचा थेट संवाद आणि सानिकाची "जाणीवांची गाणी".
कोल्हापुर येथील द हेल्पर्स ऑफ हॅंडीकॅप्ड या संस्थेच्या सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील स्वप्ननगरी या अपंगांच्या रोजगार आणि पुनर्वसन प्रकल्पासाठी
संस्थापिका श्रीमती नसिमादिदी हुरजूक यांना आर्थिक सहयोगाची आवश्यकता आहे.
त्यामुळे समविचारी संस्था व कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे "साद माणुसकीची" या
उपक्रमाचे आयोजन केले होते. ३ ऑक्टोबर २०१६ रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत
माऊली सभागृह (सावेडी, अहमदनगर) येथे या कार्यक्रमात नसिमादिदी स्वतः
उपस्थित होत्या. तसेच सामाजिक जाणीवा सखोल आणि प्रगल्भ करणाऱ्या गाणी आणि
भजनांचे सादरीकरण यावेळी प्रख्यात गायिका सानिका गोरेगांवकर यांनी केले.
यावेळी "धागा" या समुहामार्फ़त या उपक्रमासाठी विशेष सहयोग दिला. धागा समूह
अशा उपक्रमात सांस्कृतिक व संगीतमय कार्यक्रमाचे योगदान देत असतो.
नसिमादिदींचे जीवनकार्य संपूर्ण देशाला आणि विश्वाला परिचित आहे. मागील ४५
वर्षापासून नसिमादिदी यांनी अपंगाना रोजगार शिक्षण, औपचारिक शिक्षण,
आत्मसन्मान आणि आत्मभान दिले. स्वतः अपंग असतांनाही त्यांनी इतर अपंग आणि
विशेष गरजयुक्त व्यक्तींसाठी केलेले कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायक बनले.
जगातील अनेक मान्यवर पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.
समाजात बहुविध स्वरूपाच्या सेवाकार्यांची आवश्यकता असते. त्यामुळे अशा
विश्वासार्ह कामांसाठी स्नेहालय, अनामप्रेम, डॉ. शंकर केशव आडकर ट्रस्ट,
बाबा आमटे विद्यार्थी सहायक समिती (श्रीगोंदे), जय माता दी बालगृह(टाकळी
खंडेश्वरी, ता. कर्जत), सार्थक सेवा संघ आणि मानव्य (पुणे), प्रेरणा
(मुंबई) या वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी कार्यरत संस्था सहयोग करीत असतात,
अशा सर्व संस्थांनी नसिमादिदींच्या कार्याला समाजातून सहयोग मिळवून
देण्यासाठी एकत्रितपणे या उपक्रमाचे आयोजन केले होतेे.
विविध समविचारी
व्यक्ती आणि संस्थांनी मिळून नसिमादिदी यांच्या द हेल्पर्स ऑफ हॅंडीकॅप्ड
या संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वप्ननगरी (काजू उत्पादन)
प्रकल्पासाठी सहयोग निधी देण्याचे नियोजन केले.
मी धागा मधे नसतो तर मला ह्या गोष्टी समजल्याच नसत्या. आणि जगावेगळा आनंद घेता आला नसता. आणि मी माणसं जोडायला शिकलो ते इथेच.
"निमित्त कोजागरीचे"या कार्यक्रमाने धागा टीमच्या कामाची सुरवात झाली, या
कार्यक्रमातून 'स्नेहांकुर' या संस्थेला १,५०,०००/- ची आर्थिक मदत तसेच १३५
दूध पावडरचे डबे देण्यात आले. त्यामुळे धागा टीमच्या कामाला आता एक वर्ष
पूर्ण होतील आणि तसाच कार्यक्रम या वर्षीदेखील शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी
आहे. या वर्षी सोफोश संचालित 'श्रीवत्स' या संस्थेतील अनाथ बाळांसाठी
कोजागरी साजरी करत आहोत.
आपली उपस्थिती हि अनाथ बाळांच्या दुधाचा प्रश्न सोडवू शकेल ! आपण येऊन इथला आनंद द्विगुणीत कराल ही आशा आहे.
आपला कृपाभिलाषी
धागा कार्यकर्ता ( प्रमोद )