Amazon

Saturday, October 27, 2012

शाळेचा रस्ता

शाळेस रोज जातांना l मज विघ्नें येती नाना ! llध्रुoll

किति पक्षी गाती गाणी
झाडावरि म्हणती बसुनी,
'ये मुला, खेळुं या मिळुनी !'
परि उशीर टाळायाला l मी निघें तडक शाळेला ! ll १ll
टोळ कसे गवतावरती
आनंदें टुण टुण उडती !
खेळाया बोलावीती
परि उशीर टाळायाला l मी निघें तडक शाळेला ! ll२ll
गारुडी वाजवुनि पुंगी
बोलावी झणिं मजलागीं !
बहु जमती जन त्या जागीं,
परि उशीर टाळायाला l मी निघें तडक शाळेला ! ll३ll
बाजूस खेळणींवाला
वाखाणुनि अपुल्या माला
वेधितसे नकळत बाळां
परि उशीर टाळायाला l मी निघें तडक शाळेला ! ll४ll
वाटेंतिल झाडें वेली,
हालविती पानें अपुलीं;
बोलाविति मजला जवळी !
परि उशीर टाळायाला l मी निघें तडक शाळेला ! ll५ll


- ना. गं. लिमये

No comments:

Post a Comment