Amazon

Wednesday, October 24, 2012

मावळत्या सूर्याप्रत

मावळत्या दिनकरा, अर्घ्य तुज
जोडुनि दोन्ही करां || ध्रु ० ||

जो तो वंदन करी उगवत्या,
जो तो पाठ फिरवि मावळत्या,
रीत जगाची ही रे सवित्या !
स्वार्थपरायणपरा || १ ||

उपकाराची कुणा आठवण ?
‘शिते तोंवरी भूतें’ अशी म्हण;
जगांत भरलें तोंडपुजेपण,
धरी पाठिवर शरा || २ ||

आसक्त परि तू केलीस वणवण,
दिलेस जीवन, हे नारायण,
मनी न धरिले सानथोरपण,
समदर्शी तूं खरा || ३ ||

प्रभु-सचिवा विरही मुखधूसर
होति दयामृदु नयनिष्ठुर कर
टाकुनि कारभार चंद्रावर
चाललास तूं खरा || ४ ||


भा. रा. तांबे (ऑक्टोबर, १९३५)

No comments:

Post a Comment