Amazon

Sunday, August 5, 2018

नाटक - अनन्या

नाटक - अनन्या

नावाप्रमाणेच अनन्यसाधारण अस नाटक आहे.
नाटकाबद्दल काय बोलणार, अशी नाटकं पहायचे योगायोग फार दुर्मिळ, दुर्मिळ या कारणाने की अशी नाटकं येतात त्यावेळी त्या बद्दल जास्त माहिती नसते ( आपलीच चुक , कारण चांगल्या गोष्टी आपल्याला खुप उशीरा कळतात). आता पर्यन्त या नाटकाचे 100 च्या वर प्रयोग झाले, नेहमीप्रमाणे जाहिरातही दिसायची (weekend ला नाट्यग्रह visit करायची जुनी सवय असल्याने) हे नाटक एकदा पहावे असा विचार काही येत नव्हता, एखाद्या वेळी मित्राचा ग्रुप येईल भेट होईल, त्यावेळी पाहु वगेरे.. वगेरे. असा विचार झाला असावा.
अशीच चर्चा चालू होती नाटकाबद्दल त्यावेळी समजलं आनंदवन मधे याचा शो झाला होता, म्हणजे नाटक उत्तम असणार म्हणून त्यावेळीच ठरवलं की हे नाटक पुण्यात आल्यावर पहायच.
पुन्हा weekend ला मोकळा वेळ असेल का याचही गणित चालूच असायच. असच योग आला आणि सर्व फ्रेंड्स मिळुन नाटक पहायच ठरलं तरीही माझ फिक्स होत नव्हतं आणि may be I was lucky, नाटक पाहायला वेळ मिळाला.
नाट्काच्या तांत्रिक बाबी, अभिनय, नेपथ्य , संगीत, लाइट्स  याविषयी नेहमीप्रमाणे मी बोलणार नाही त्या बेसिक गोष्टी आहेत, नाटकच अप्रतिम असल्याने या गोष्टींवर शंका उपस्थीत करणे शक्यच नाही. एखाद्या प्रेक्षकाला बाहेर पडल्यावर जो आनंद मिळतो त्याविषयीच फक्त बोलतो आहे. तुम्हाला आठवते भूतकाळात कधी इतका आनंद झाला का की ज्यामुळे आनंदाश्रु आले असतील, आणि अश्याच आनंदाचे साक्षीदार पुन्हा व्हायचे असेल तर नक्कीच हे नाटक पहा. मुख्य भूमिका ज्यानी केली त्या 'ऋतुजा बागवे', त्यांच्या बद्दल मला जास्त माहिती नव्हती, फक्त मराठी मालिकांमधे आहे एवढीच माहिती. पण नाटक पाहिल्यावर यांच्याबद्दल आदर वाढला आहे, कारण अतिशय चैलेंजिंग भूमिका त्यानी केलेली आहे, अभिनयाबरोबर वेगळी मेहनत आणि अभ्यासही का गरजेचा आहे ते समजते. असे गुणी कालवंत मराठी मधे आहेत याचा अभिमान वाटतो. नाटकाबद्दल लिहिण्याच कारणं ख़ूप आहेत, नाटक पाहिल्या बरोबर वाटलं याबद्दल लिहावच लागेल, मिळालेल्या आनंदाला शब्द रूप मिळालेच पाहिजे. जसे नाटका मधे एका घटनेमुळे अनन्याचे ( मुख्य भूमिका) आयुष्य बदलले त्या प्रमाणेच पाहण्याऱ्या एखाद्या प्रेक्षकाचेही आयुष्य बदलू शकते. माझ्यासाठी एक आठवण झाले आहे हे नाटक. काही काही क्षणाला अरे 'किती भारी' असेच शब्द बाहेर पडतात heart melting moment काय असते याचा अनुभव येतो.
आयुष्याचे रहाटगाडगे चालूच असते पण नाटक पाहिल्यावर एक वेगळीच ऊर्जा मिळते. म्हणजे तुम्ही सोमवारी ऑफिसला जाताना एक वेगळीच ऊर्जा घेऊन,  प्रसन्न आणि आनंदी चेहरा घेऊन जाल. नाटकातले प्रत्येक पात्र हे काही महापुरुष वगेरे नाहीत, तेही आपल्या सारखेच आहेत त्यामुळे ते आपलेसे वाटतात, स्वभाव वैशिष्ट्य पाहुन लक्षात येईलच. मुख्य भूमिकाच फक्त नाही तर बाकी पात्रही तितकिच महत्वाची आणि त्यांचे चांगले काम झाले आहे. ते सहायक कलाकार जरी समोर ठेवून नाटक पाहिले तरी तेही खुप काही सांगून जातात.

नाटक सुरु होण्या अगोदर एक आश्चर्यकारक गोष्ट घडली, तांत्रिक कारणाने नाटकाचा प्रयोग सुरु होण्यासाठी 20 मिनिट उशीर झाला होता. आणि ते लक्षात आणून देण्यासाठी प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायला सुरवात केली. 'आता नाटक सुरु करा अस रागवत न सांगता एक पुणेकर प्रेक्षकांनी एक विनम्र बाजू दाखवून दिली. साधी गोष्ट आहे पण चांगली वाटली म्हणून इथे मांडली. नाटक संपल्यावर प्रमोद पवार धन्यवाद देण्यासाठी बोलत होते, त्यावेळी त्यानी उशीरा नाटक सुरु झाल्याने संपूर्ण टीम कडुन दिलगिरी व्यक्त केली आणि म्हटले नाटकाच्या शेवटी ज्या टाळ्या मिळाल्या त्या खऱ्या टाळ्या आहेत'. प्रेक्षक आणि कलावंत दोन्ही प्रगल्भ असले की असे योगायोग येतात याचा अनुभव आला.

माझ्या सारख्या एखाद्या नाटकवेड्या रसिकाला ह्या नाटकाची माहिती व्हावी म्हणून हा आपला साधा प्रयत्न.
 - प्रमोद डमरे.

Friday, July 6, 2018

शाळेतील आठवणी क्रमांक: #N+1

शाळेतील आठवणी क्रमांक : #N+1



खूप दिवस झाले काही लिहिले नाही. आज थोडी एनर्जी आहे आणि आठवणी मनातून  कीबोर्ड वर यायला थोड्या उडया मारत आहेत. तसं आयटीवाल्यांची शुक्रवारी संध्याकाळी एनर्जी किती जास्त असते किंवा का असते हे वेगळं सांगायची गरज नाही .शीर्षक थोडे वेगळे टाकले कारण ह्या टॉपिक वर लिहिण्याची हि पहिली वेळ आहे पण हि आठवण पहिली नाही, या आठवणी अगोदर 'N' आठवणी आहेत, सुरवात कुठून तरी करायची म्हणून 'N+1'. कुणीतरी म्हटले ना, चांगल्या गोष्टींना सुरवात असते शेवट कधीच नसतो.

फार फार वर्षापुर्वीची गोष्ट आहे, आटपाट नगरासाखेच पण थोडे छोटे घारीपुरी नावाचे गाव , तिथली हि गोष्ट आहे. त्यावेळी आमच्या शाळेत आसपासच्या गावचे विद्यार्थी  शिकायला यायचे, त्यातील पिंपळगावच्या मित्रांबरोबर आमचा एक ग्रुप झाला होता, तसे ते पण छोटेसेच गाव, आम्ही सर्वच गावाकडचे असल्याने रानावनात ,शेतात फिरताना काही वाटायचं नाही, रानातल्या भीतीपेक्षा घरी कोणी सांगितले कि मग चांगलीच खरडपट्टी याचीच जास्त भीती , ओला फोक आणि आपण यांचं द्वंद्व युद्ध, म्हणजे एकूणच पोट भरून मार मिळे, कारण आमच्या कडे एक डायलॉग आहे, "का ? त्या दिवशीचा मार कमी पडला का ?" म्हणून म्हटले पोट भरून मार मिळे. त्यावेळी शाळेत मी ८ वी ला असेल, असच एका मधल्या सुट्टीत लवकर जेवण आटपून मी शाळेत आलो. तर आमच्या ग्रुपचे पण जेवण झालेले, असच एकाला वाटले कि मधली सुट्टी संपायला अजून पाऊण तास आहे, आपण तोपर्यन्त परत येऊ, अस म्हणून पिंपळगावकडील शेतात मोहळ ( मधमाशाचे पोळे ) झाडायला जायचे  ठरले. त्यावेळी सर्वांकडे सायकल होत्या. झाला मग आमचा सायकल प्रवास सुरु.

तस पहिल्या पासून फिरायची खूप सवय. रानावनात, डोंगरदऱ्यात, निसर्गात एक प्रकारचं कुतूहल वाटायच. तसा त्यावेळी आसपासचा परिसर सायकल ने पूर्ण पालथा घातला होता.( पुढे  जाऊन आपण पूर्ण पुणे पालथे घालणार आहोत  असं कधी वाटलंच नव्हते )  ते म्हणतात ना ,
"अपनी मर्जी से कहाँ अपने सफ़र के हम,
 है रुख हवाओ का जिधर का है उधर के हम"
असच काहीस होते.  तर ठरल्या प्रमाणे आम्ही सर्व पोहोचलो. घड्याळ, वेळेचा अंदाज याचा आणि आमचा काडीचाही संबंध नव्हता. त्यामुळे शाळेत काय चालू असेल याचा काही कोणाला सुगावा नाही किंवा कोणाला आठवण नाही. तस आम्हाला एक मधमाशाच मोहळ सापडले. प्रश्न होता झाडावर चढायच कस ?  एका मित्राने माझ्याबद्दल वर्गात एक अफवा पसरवली होती, कि मी कोणत्याही झाडावर चढू शकतो. त्यामुळे मला पाचारण करण्यात आले, वडाच्या झाडावर पारंब्या वरून चढायची सवय होती, त्यामुळे कोणत्याही झाडावर चढताना, खोडावरून न चढता  खाली आलेल्या फांद्यांवरूनच चढायचो, ते थोडे सोपे वाटायचे. तर कसेबसे मी चढलो, आणि इतर मित्रांना वर घेतले.  जो मुख्य कार्यकर्ता होता ( ज्याने आम्हाला त्याचे खूप मोहळ झाडण्याविषयीचे पराक्रम सांगितले होते , त्यातले किती खरे ते त्यालाच माहीत ) त्याने गोवरी पेटवून त्याचा धूर करून मोहळ झाडायला सुरवात केली.

धुराने मधमाश्या आंधळ्या होतात असा अजब शोध कोणीतरी लावला होता, त्या शोधाच्या जोरावर आम्ही आमचे काम सुरु केले. कडू निंबाच्या फाट्यानेही माश्या जवळ येत नाहीत, असाही शोध कोणीतरी लावला होता, त्यामुळे त्याचे पण फाटे घेऊन आम्ही तयार होतो, आलीच एखादी माशी तर युद्धास तयार म्हणून आमची सर्व शस्त्र घेऊन आम्ही तयार होतो. ह्या अगोदर आम्ही मध माशाशी खूप वेळेस भिडलो होतो, त्या आठवणीने थोडी भीतीही वाटायची. खूप वेळेस मधमाशी चावल्यामुळे शरीर सुजून आमचा हनुमान झाला होता.  ज्यांच्याजवळ टॉवेल वगैरे होते त्यांनी चेहरा झाकून फक्त डोळे उघडे ठेवले, ज्यांच्या कडे नाहीत त्यांनी शर्ट काढून चेहऱ्याला गुंडाळले. बाकी शरीर हनुमान झाले तरी चालेल पण चेहरा सुजला नाही पाहिजे. नाहीतर पूर्ण कथा घरी सांगावी लागणार. 

धूर होऊन गोवरी पूर्ण जळून जाणार होती, मध्ये एकजण म्हणाला अरे आता माश्या आंधळ्या झाल्या असणार तू टाक फांदी तोडून, तर आमचा मुख्य कार्यकर्ता म्हणाला, तुला बोलायला काय होतंय, चावायला सुरु केलं कि पळायचं कळणार नाही, थांब थोडे अजून. हि अशी प्रोसेस तास भर चालू होती, नंतर माश्या काढायला त्याने सुरवात केली, त्याबरोबर त्याला २-३ माश्या चावल्या आणि लगेच त्याने माघार घेतली. आमचा आणि वर घोंगावणाऱ्या मध माश्यांचा एकच गोधळ सुरु झाला. आमची सर्व शस्त्र निकामी होऊ लागली. सर्वजण खाली उडया मारून दिसेल तिकडे पळत सुटले. शेवटी सर्व भेटलो, कोणाला किती आणि कुठे कुठे माश्या चावल्या याच्या गप्पा सुरु झाल्या. आणि ठरलं कि या गडावर आपण नंतर हल्ला करू. दुपारच्या वेळी जेव्हा माश्या पाण्यावर जातात त्यावेळी त्यांचे सैन्य कमी असते त्यावेळी हल्ला करायचे एकाने ठरवून टाकले आणि सायकलला टांग मारून शाळेचा रस्ता धरला.

दुपारची सुट्टी होऊन किती वेळ झाला याचा कोणालाच अंदाज नव्हता. जेंव्हा पोचलो त्यावेळी शाळेत प्रश्न मंजुषा ( सामान्य ज्ञान  ) स्पर्धा सुरु होऊन खूप वेळ झाला होता. नंतर लक्षात आले, अरे सरानी आपले नाव सुचवले होते आणि आपण या स्पर्धेत आपल्या वर्गातून सहभागी होणार होतो. आणि ती स्पर्धा आज होती. नेहमीचा मित्र नेहमी प्रमाणे स्पर्धेत हजर होता, मीच उशीर केला होता त्यामुळे वर्गातील दुसऱ्या मित्राला बळेच सहभाग घ्यायला लावला  आणि त्या दोघांनी मिळून कशीबशी स्पर्धा सुरु ठेवली होती. मी नसल्याने खूप लोक नाराज होते, आख्खा वर्ग माझ्याकडे कुतूहलाने पाहत होता. कुतूहल याच कि हा कस काय स्पर्धा मिस करू शकतो. आम्ही मग प्रेक्षकांची भूमिका घेऊन सर्व कार्यक्रम पाहू लागलो. त्या नंतर मला जास्त आठवत नाही, पण स्पर्धेमधे सहभागी न झाल्यामुळे मला कायमची रुख रुख वाटत होती. 

मग दोन वर्षांनी तो दिवस उजाडला, आणि प्रश्न मंजुषा ( सामान्य ज्ञान) स्पर्धा यावर्षी होणार आहे याची सूचना मिळाली. आम्ही तेंव्हा दहावीत होतो. आठवी,नववी, दहावी आणि मुले , मुली मिळून सहा ग्रुप सहभागी होणार होते. तशी स्पर्धा सुरु झाली, माझा नेह्मीचा मित्र आणि मी सहभागी झालो, जेव्हा जेव्हा आम्ही सोबत असु त्यावेळी आमच्या मध्ये खूप आत्मविश्वास यायचा, तो मग कुठल्याही बाबतीत असेल. तसाच त्यावेळी कुणास ठाऊक पण खूप आत्मविश्वास होता. आमचे प्रतिस्पर्धी जरी जूनियर असले तरी एक ग्रुप शाळेचा टॉपर होता, आणि एक ग्रुप स्कॉलरशिप परीक्षा टॉपर होता, त्यामुळे स्पर्धेत मजा येणार हे ठरलेच होते. सुरवातीच्या प्रश्नापासूनच आम्ही गुण मिळवायला सुरवात केली. 

शेवटचा राऊंड होता  - 'एक प्रसंग आणि पात्र ठरवून इंग्रजी संभाषण', संभाषणाचा विषय कोणताही असायचा, त्याप्रमाणे एक विषय आणि प्रसंग मिळाला. त्याप्रमाणे आम्ही सुरवात केली.  आत्मविश्वास वाढल्याने आम्ही लगेच ओव्हर अभिनय करत संभाषण सुरु केले , त्यामुळे प्रेक्षकांमधे एकच हशा पिकला. इतक्या मोठ्या आवाजात कोणीच बोलले नव्हते तसे आमचे संभाषण झाले. शेवटी निकाल लागला आणि आमचा ग्रुप जिंकला आणि आमच्या वर्गाने एकच गोंधळ आणि गलका सुरु केला.

हे यश पराक्रम खूप काही मोठे नव्हते, पण यशाची चव काय असते त्याची सुरवात होती म्हणून ही एक न विसरता येणारी आणि नेहमी प्रेरणा देणारी आठवण सोबत आहे.
 - शाळेचा एक विद्यार्थी

Wednesday, February 14, 2018

खयालोंका आबाद शहर ....



आठवण यावी अस जास्त काही घडलं नाही,
पण ज्यावेळी मनासारखे रंग कैनव्हासवर उतरायचे तेंव्हा वाटायचे लगेच तुला दाखवावं.
तर कधी रानातल्या चिंचेच्या झाडावर चिंचा काढुन देणारं कोणी नसतं आणि बोराच्या झाडाखाली बोरंही तशीच पडलेला असतात, त्यावेळी वाटायचं आपल्या पिशव्या भरल्या असत्या चिंचा आणि बोरानी.
कधी सकाळी सकाळीच सायकलची रपेट करताना घामाने भरलेल्या चेहऱ्यावर अचानक वाटेतील एखाद्या नदी- तलावामुळे थंड झुळुक यायची, वाटायचं हा आनंद सोबत अनुभवावा.
कधी एखाद्या नामवंत लेखकाचे एखादे टाळी मिळवणारं  वाक्य किंवा वाचकाला आपुसकच"वा" म्हणायला लावणारं वाक्य वाचलं की वाटायचं तुला ऐकवावं आणि लगेच टाळी घ्यावी.
तर कधी सकाळी 6 वाजता बाइक वरून जाताना तो सतत पडणारा पाऊस काटे बोचल्यासारखा वाटायचा त्यावेळीही वाटायचं तुलाही हे काटे आवडले असते.
तर कधी भंडारा डोंगरावर सुर्य बुडत असताना दिसायचा त्यावेळी आकाशाचा झालेला जांभळा रंग...वाटायचा हाही तुझ्यासारखाच सर्वांच्या आनंदात रंग भरतोय.
तर कधी पोर्णिमेच्या रात्री मोकळया आकाशात शरीर आराम करायचं त्यावेळी समोर डोळे दीपवून टाकणारं आणि शहराच्या झगमगाटात हरवलेलं पांढरशुभ्र तारांगण दिसायचं आणि वाटायचं तुला दिसत असेल का हे सर्व.
तर कधी एखादे सात्विक नाटक पाहताना जेव्हा नायकाचे एक एक वाक्य हृदयाला भिडायचं आणि मनात साचलेल्या कचऱ्याला मोकळी वाट करून द्यायचं त्यावेळी वाटायचं की तुला सांगावं 'अस नाटक असतं.. अस नाटक असतं !!'
तर कधी बालगंधर्व नाट्यगृहाबाहेर नाटक पाहायला आलेली, ज्यानी त्यांच्या आयुष्यात चांगले वाईट अनुभवलेली आणि उतारवयातही त्याच जोमाने प्रेमाला नवीन आकार देणारी उत्साही चेहऱ्याची वृद्ध जोडपी पाहिली की वाटायचं तुलाही जगण्यातला खरा आनंद पाहायला मिळाला असतां.
- स्वगत  लिहिण्याचा प्रयत्न 

Sunday, January 7, 2018

संगीत देवबाभळी - मस्त नाटक !

संगीत देवबाभळी - मस्त नाटक.


 समीक्षा वगेरे लिहिणे हा आपला प्रांत नाही पण तरीही एक
सच्चा रसिक, साहित्यप्रेमी आणि नाट्यप्रेमी असल्यामुळे नाटकाबद्दल ख़ूप काही लिहावसं वाटतंय म्हणून ही उठाठेव.

नाटक, साहित्य आणि संत तुकाराम यांचे काव्य हे माझे weak पॉइंट आहेत. ज्यांचे कनेक्शन डायरेक्ट हृदयाशी आहे, त्यामुळे नाटक पाहताना आज रुमाल भिजणार आहे हे पहिल्या प्रवेशामधेच ओळखलं. पूर्ण नाटकात आपण वेदनेच्या आनंदात न्हाऊन निघतो. डोळे आणि कान तृप्त होतात, अगदी नाटकाच्या पाहिल्या वाक्यापासुन ते शेवटच्या वाक्यापर्यन्त खिळुन राहतो. काही कलाकृतींना डोळ्यानी दाद मिळते हे ऐकून होतो त्याचा आज प्रत्यय आला. कलावंत फक्त दोनच आहेत पण त्यांची  अभिनय आणि संगीत नाटकामुळे गायन खुपच सुंदर. संपूर्ण नाट्यग्रह हेलावून टाकण्याची क्षमता आहे त्यांच्या मधे. एखाद्या वक्त्याने टाळी मिळवण्यासाठी आपल्या भाषणात ज्ञानेश्वरीची एखादी ओवी सांगावी तसे पहिल्या वाक्यापासुन ते शेवटच्या वाक्यापर्यंत संवाद, कधी टाळ्या तर कधी आपोआप  'वाह' येऊन जातं आणि त्यासोबतच साचलेल्या कित्येक भावनांची वाट मोकळी होते आणि आपण मोकळे होतो. देवबाभळीचा काटा कधी आपल्यात घुसतो कळत नाही आणि ती वेदना कायम हवीहवीशी वाटत राहते, वाटतं नाटक संपुच नये.
संत तुकाराम आणि विठ्ठल यामधे भक्त कोण आणि देव कोण असा प्रश्न पडावा इतकी दोघांमधली एकरूपता  दाखवण्यात नाटक यशस्वी झालेलं आहे.
नाट्यप्रेमी असल्याने खुप नाटकं पाहतो पण महाराष्ट्रात जन्मल्याचा अभिमान आणि पुण्यात राहतो याचा आनंद खुप दिवसांनी झाला तो आजच्या या नाटकामुळे. कारण अशी सुंदर कलाकृती पाहायला मिळणं म्हणजे दुर्मिळ योगायोग म्हणावा लागेल. आता हे नाटक परत एकदा पहावाच लागेल, तोपर्यंत मन स्वस्थ बसणार नाही.

नाटक संपल्यावर नटसम्राट मधलं शेवटच वाक्य आपण स्वतःशीच बोलतो,

" अस नाटक असतं राजा, अस नाटक असतं !!! "

- नाट्यप्रेमी मी.