Amazon

Friday, July 6, 2018

शाळेतील आठवणी क्रमांक: #N+1

शाळेतील आठवणी क्रमांक : #N+1



खूप दिवस झाले काही लिहिले नाही. आज थोडी एनर्जी आहे आणि आठवणी मनातून  कीबोर्ड वर यायला थोड्या उडया मारत आहेत. तसं आयटीवाल्यांची शुक्रवारी संध्याकाळी एनर्जी किती जास्त असते किंवा का असते हे वेगळं सांगायची गरज नाही .शीर्षक थोडे वेगळे टाकले कारण ह्या टॉपिक वर लिहिण्याची हि पहिली वेळ आहे पण हि आठवण पहिली नाही, या आठवणी अगोदर 'N' आठवणी आहेत, सुरवात कुठून तरी करायची म्हणून 'N+1'. कुणीतरी म्हटले ना, चांगल्या गोष्टींना सुरवात असते शेवट कधीच नसतो.

फार फार वर्षापुर्वीची गोष्ट आहे, आटपाट नगरासाखेच पण थोडे छोटे घारीपुरी नावाचे गाव , तिथली हि गोष्ट आहे. त्यावेळी आमच्या शाळेत आसपासच्या गावचे विद्यार्थी  शिकायला यायचे, त्यातील पिंपळगावच्या मित्रांबरोबर आमचा एक ग्रुप झाला होता, तसे ते पण छोटेसेच गाव, आम्ही सर्वच गावाकडचे असल्याने रानावनात ,शेतात फिरताना काही वाटायचं नाही, रानातल्या भीतीपेक्षा घरी कोणी सांगितले कि मग चांगलीच खरडपट्टी याचीच जास्त भीती , ओला फोक आणि आपण यांचं द्वंद्व युद्ध, म्हणजे एकूणच पोट भरून मार मिळे, कारण आमच्या कडे एक डायलॉग आहे, "का ? त्या दिवशीचा मार कमी पडला का ?" म्हणून म्हटले पोट भरून मार मिळे. त्यावेळी शाळेत मी ८ वी ला असेल, असच एका मधल्या सुट्टीत लवकर जेवण आटपून मी शाळेत आलो. तर आमच्या ग्रुपचे पण जेवण झालेले, असच एकाला वाटले कि मधली सुट्टी संपायला अजून पाऊण तास आहे, आपण तोपर्यन्त परत येऊ, अस म्हणून पिंपळगावकडील शेतात मोहळ ( मधमाशाचे पोळे ) झाडायला जायचे  ठरले. त्यावेळी सर्वांकडे सायकल होत्या. झाला मग आमचा सायकल प्रवास सुरु.

तस पहिल्या पासून फिरायची खूप सवय. रानावनात, डोंगरदऱ्यात, निसर्गात एक प्रकारचं कुतूहल वाटायच. तसा त्यावेळी आसपासचा परिसर सायकल ने पूर्ण पालथा घातला होता.( पुढे  जाऊन आपण पूर्ण पुणे पालथे घालणार आहोत  असं कधी वाटलंच नव्हते )  ते म्हणतात ना ,
"अपनी मर्जी से कहाँ अपने सफ़र के हम,
 है रुख हवाओ का जिधर का है उधर के हम"
असच काहीस होते.  तर ठरल्या प्रमाणे आम्ही सर्व पोहोचलो. घड्याळ, वेळेचा अंदाज याचा आणि आमचा काडीचाही संबंध नव्हता. त्यामुळे शाळेत काय चालू असेल याचा काही कोणाला सुगावा नाही किंवा कोणाला आठवण नाही. तस आम्हाला एक मधमाशाच मोहळ सापडले. प्रश्न होता झाडावर चढायच कस ?  एका मित्राने माझ्याबद्दल वर्गात एक अफवा पसरवली होती, कि मी कोणत्याही झाडावर चढू शकतो. त्यामुळे मला पाचारण करण्यात आले, वडाच्या झाडावर पारंब्या वरून चढायची सवय होती, त्यामुळे कोणत्याही झाडावर चढताना, खोडावरून न चढता  खाली आलेल्या फांद्यांवरूनच चढायचो, ते थोडे सोपे वाटायचे. तर कसेबसे मी चढलो, आणि इतर मित्रांना वर घेतले.  जो मुख्य कार्यकर्ता होता ( ज्याने आम्हाला त्याचे खूप मोहळ झाडण्याविषयीचे पराक्रम सांगितले होते , त्यातले किती खरे ते त्यालाच माहीत ) त्याने गोवरी पेटवून त्याचा धूर करून मोहळ झाडायला सुरवात केली.

धुराने मधमाश्या आंधळ्या होतात असा अजब शोध कोणीतरी लावला होता, त्या शोधाच्या जोरावर आम्ही आमचे काम सुरु केले. कडू निंबाच्या फाट्यानेही माश्या जवळ येत नाहीत, असाही शोध कोणीतरी लावला होता, त्यामुळे त्याचे पण फाटे घेऊन आम्ही तयार होतो, आलीच एखादी माशी तर युद्धास तयार म्हणून आमची सर्व शस्त्र घेऊन आम्ही तयार होतो. ह्या अगोदर आम्ही मध माशाशी खूप वेळेस भिडलो होतो, त्या आठवणीने थोडी भीतीही वाटायची. खूप वेळेस मधमाशी चावल्यामुळे शरीर सुजून आमचा हनुमान झाला होता.  ज्यांच्याजवळ टॉवेल वगैरे होते त्यांनी चेहरा झाकून फक्त डोळे उघडे ठेवले, ज्यांच्या कडे नाहीत त्यांनी शर्ट काढून चेहऱ्याला गुंडाळले. बाकी शरीर हनुमान झाले तरी चालेल पण चेहरा सुजला नाही पाहिजे. नाहीतर पूर्ण कथा घरी सांगावी लागणार. 

धूर होऊन गोवरी पूर्ण जळून जाणार होती, मध्ये एकजण म्हणाला अरे आता माश्या आंधळ्या झाल्या असणार तू टाक फांदी तोडून, तर आमचा मुख्य कार्यकर्ता म्हणाला, तुला बोलायला काय होतंय, चावायला सुरु केलं कि पळायचं कळणार नाही, थांब थोडे अजून. हि अशी प्रोसेस तास भर चालू होती, नंतर माश्या काढायला त्याने सुरवात केली, त्याबरोबर त्याला २-३ माश्या चावल्या आणि लगेच त्याने माघार घेतली. आमचा आणि वर घोंगावणाऱ्या मध माश्यांचा एकच गोधळ सुरु झाला. आमची सर्व शस्त्र निकामी होऊ लागली. सर्वजण खाली उडया मारून दिसेल तिकडे पळत सुटले. शेवटी सर्व भेटलो, कोणाला किती आणि कुठे कुठे माश्या चावल्या याच्या गप्पा सुरु झाल्या. आणि ठरलं कि या गडावर आपण नंतर हल्ला करू. दुपारच्या वेळी जेव्हा माश्या पाण्यावर जातात त्यावेळी त्यांचे सैन्य कमी असते त्यावेळी हल्ला करायचे एकाने ठरवून टाकले आणि सायकलला टांग मारून शाळेचा रस्ता धरला.

दुपारची सुट्टी होऊन किती वेळ झाला याचा कोणालाच अंदाज नव्हता. जेंव्हा पोचलो त्यावेळी शाळेत प्रश्न मंजुषा ( सामान्य ज्ञान  ) स्पर्धा सुरु होऊन खूप वेळ झाला होता. नंतर लक्षात आले, अरे सरानी आपले नाव सुचवले होते आणि आपण या स्पर्धेत आपल्या वर्गातून सहभागी होणार होतो. आणि ती स्पर्धा आज होती. नेहमीचा मित्र नेहमी प्रमाणे स्पर्धेत हजर होता, मीच उशीर केला होता त्यामुळे वर्गातील दुसऱ्या मित्राला बळेच सहभाग घ्यायला लावला  आणि त्या दोघांनी मिळून कशीबशी स्पर्धा सुरु ठेवली होती. मी नसल्याने खूप लोक नाराज होते, आख्खा वर्ग माझ्याकडे कुतूहलाने पाहत होता. कुतूहल याच कि हा कस काय स्पर्धा मिस करू शकतो. आम्ही मग प्रेक्षकांची भूमिका घेऊन सर्व कार्यक्रम पाहू लागलो. त्या नंतर मला जास्त आठवत नाही, पण स्पर्धेमधे सहभागी न झाल्यामुळे मला कायमची रुख रुख वाटत होती. 

मग दोन वर्षांनी तो दिवस उजाडला, आणि प्रश्न मंजुषा ( सामान्य ज्ञान) स्पर्धा यावर्षी होणार आहे याची सूचना मिळाली. आम्ही तेंव्हा दहावीत होतो. आठवी,नववी, दहावी आणि मुले , मुली मिळून सहा ग्रुप सहभागी होणार होते. तशी स्पर्धा सुरु झाली, माझा नेह्मीचा मित्र आणि मी सहभागी झालो, जेव्हा जेव्हा आम्ही सोबत असु त्यावेळी आमच्या मध्ये खूप आत्मविश्वास यायचा, तो मग कुठल्याही बाबतीत असेल. तसाच त्यावेळी कुणास ठाऊक पण खूप आत्मविश्वास होता. आमचे प्रतिस्पर्धी जरी जूनियर असले तरी एक ग्रुप शाळेचा टॉपर होता, आणि एक ग्रुप स्कॉलरशिप परीक्षा टॉपर होता, त्यामुळे स्पर्धेत मजा येणार हे ठरलेच होते. सुरवातीच्या प्रश्नापासूनच आम्ही गुण मिळवायला सुरवात केली. 

शेवटचा राऊंड होता  - 'एक प्रसंग आणि पात्र ठरवून इंग्रजी संभाषण', संभाषणाचा विषय कोणताही असायचा, त्याप्रमाणे एक विषय आणि प्रसंग मिळाला. त्याप्रमाणे आम्ही सुरवात केली.  आत्मविश्वास वाढल्याने आम्ही लगेच ओव्हर अभिनय करत संभाषण सुरु केले , त्यामुळे प्रेक्षकांमधे एकच हशा पिकला. इतक्या मोठ्या आवाजात कोणीच बोलले नव्हते तसे आमचे संभाषण झाले. शेवटी निकाल लागला आणि आमचा ग्रुप जिंकला आणि आमच्या वर्गाने एकच गोंधळ आणि गलका सुरु केला.

हे यश पराक्रम खूप काही मोठे नव्हते, पण यशाची चव काय असते त्याची सुरवात होती म्हणून ही एक न विसरता येणारी आणि नेहमी प्रेरणा देणारी आठवण सोबत आहे.
 - शाळेचा एक विद्यार्थी

No comments:

Post a Comment