Amazon

Saturday, March 17, 2012

आतां उजाडेल !

खिन्न आंधळा अंधार
आता ओसरेल पार
लहरींत किरणांची कलाबूत मोहरेल
आतां उजाडेल !

शुभ्र आनंदाच्या लाटा
गात फुटतील आतां
मृदु गळ्यांत खगांच्या किलबिल पालवेल
आतां उजाडेल !

वारा हसेल पर्णांत
मुग्ध हिरवेपणांत
गहिंवरल्या प्रकाशी दहिंवर मिसळेल
आतां उजाडेल !

आनंदात पारिजात
उधळील बरसात
गोड कोवळा गारवा सुगंधांत थरालेल
आतां उजाडेल !

फुलतील नकळत
कळ्यांतले देवदूत
निळा-सोनेरी गौरव दिशांतून उमलेल
आतां उजाडेल !

निळें आकाश भरून
दाही दिशा उजाळून
प्रकाशाचें महादान कणाकणांत स्फ़ुरेल
आतां उजाडेल !

आज सारें भय सरे
उरीं जोतिर्मय झरे
पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल
आतां उजाडेल !


- मंगेश पाडगांवकर (१९५०)

No comments:

Post a Comment