Amazon

Thursday, February 2, 2017

धागा समूह आणि आनंदवन - हेमलकसा भेट

धागा समूह व आमचे वेगवेगळे  उपक्रम याबद्दल मी अगोदर लिहिले आहे. धागा समूहाशी मी कसा जोडला गेलो, वगैरे वगैरे..  सांगण्याच्या उद्देश हा कि हे खर तर  गेल्या वर्षी झालेल्या सोमनाथ श्रम संस्कार शिबीर २०१६  यामुळे धागा मधील कार्यकर्त्यांची ओळख झाली. हळू हळू जस जस एक एक उपक्रम राबवत होतो तस तशी मैत्री घट्ट होत गेली. त्यावेळी शिबिराला जाण्यासाठी मला फक्त ७ दिवसच सुट्टी मिळाली आणि शिबीर झाल्यावर आनंदवन संस्था तेथील उद्योग, लोक बिरादरी प्रकल्प -हेमलकसा पाहायची इच्छा होती पण सुट्टी नव्हती म्हणून शिबिरानंतर लगेच पुण्याला परतावे लागले. तेंव्हा पासून मनात होत कि,बाबा आमटे व त्यांचे कार्यकर्ते यांनी सुरु केलेले सर्व प्रकल्प पाहायचे आहेत. एका नंतर एक धागाचे उपक्रम चालू होते आणि अचानक जानेवारी मधे  लॉन्ग वीकएंड मिळाला, म्हणजे ४ दिवसाची सलग सुट्टी. आणि जानेवारीच्या सुरवातीपासूनच ठरले होते कि ह्या ४ दिवसात आनंदवन - हेमलकसा येथे भेट द्यायला जायचे आहे. शेवटी जायचा दिवस आला आणि ठरल्याप्रमाणे पाहिल्यादिवशी आनंदवन मधे पोचलो. फक्त भेट द्यायच्या उद्देशाने गेलो नव्हतो . हेमलकसा येथे वॉल पेंटिंग करण्यासाठी आम्हाला परवानगी मिळाली होती. मुख्य उपक्रम वॉल पैंटिंग हा होता आणि या निमित्ताने आम्हाला संस्थेलाही भेट देण्यासाठी वेगळा वेळ काढावा लागला नाही. 

आनंदवन ते हेमलकसा हे जवळपास ५ तासाचे अंतर आहे त्यामुळे, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून  ६ वाजता हेमलकसा कडे जायचे ठरले. सकाळी हेमल कसा साठी निघताना विकासभाऊंची ( डॉ विकास आमटे ) भेट झाली. त्यावेळी मनात विचार आला कि हे तेच आहेत ज्यांचे लोकसत्ता - लोकरंग मधे  ' संचिताचे कवडसे ' नावाचे आनंदवन याविषयी लेख येतात. मी ते दर वेळी वाचतो तशी मी बाबा आमटे आनंदवन विषयीची बरीचशी  पुस्तके वाचलेली आहेत. परंतु वाचनात नसलेले आणि विकास भाऊंनी अनुभवलेल्या जुन्या आठवणी किंवा प्रेरणा देणाऱ्या काही घटना त्या वाचायला मिळतात. आणि आयुष्य सरत असताना एक वेगळी दिशा मिळते किंवा असं होत कि कितीही मोठ्या आनंदाने डोक्यात हवा जात नाही, पाय जमिनीवरच राहतात आणि खूप असं दुःखही आले तरी मोडून पडत नाही, त्याचा सामना करण्यासाठी एक वेगळीच प्रेरणा आपल्या अंगात नकळत रुजली जाते. आणि गोष्टी साध्या सोप्या होऊन जातात. माझं त्यांच्याशी जास्त बोलणे नाही झाले. बोलण्यापेक्षा ऐकत राहण्यामधे मी विश्वास ठेवतो. शिबीरमधे  असतानाही एक भेट झाली होती, त्यावेळी काहीजण त्याच्या बरोबर फोटो काढण्यासाठी विचारणा करत होते. त्यावेळी त्यांचे ते वाक्य खूप आवडले, ते म्हणाले होते, - 'अरे माझा फोटो काय काढता.. सोमनाथ मधे जी घर बांधली आहेत, त्यांचे फोटो काढा, ती बांधलेली घरांची रचना कशी आहे ? ती का वेगळी आहेत ? ह्याची माहिती सर्वाना कळू द्या. त्यांच्या सहज बोलण्यातून अशा किती तरी गोष्टी समजून जातात. 

पहिल्या दिवशी आनंदवन पाहत असताना बाबा आमटे यांचा सहवास लाभलेले एक जुने गृहस्थ भेटले,  जुन्या लोकांना भेटायला,बोलायला खूप आवडतं कारण त्यांच्या कडे तसा अनुभवाचा खजिना असतो. त्यामुळे त्याचे अनुभव ऐकायला खूप आवडते. ते भेटलेले गृहस्थही थोड्या मिश्किल स्वभावाचे होते. तस मी नवीन कॅमेरा घेऊन पक्ष्याचे फोटो काढताना पाहिल्यावर त्यांनी मला सांगितले, कि आनंदवन मधे कुठले पक्षी कोणत्या वेळी कुठे येतात, म्हणून wildlife फोटोग्राफी साठी मार्गदर्शनही केले. त्यांनी बाबाचे , पु ल देशपांडे यांचे खूप अनुभव सांगितले. जाता जाता त्यांना म्हटले तुमचा पण एक फोटो द्या, तर त्यांनी मिश्किल पणे फोटोसाठी पोज दिली. आणि सांगितले फोटो खाली कॅपेंशन लिही -" कॉम्म्नाडर्स ऑफ बाबा आमटे" . 
    असे अनुभव किंवा एक दोन दिवसासाठी का होईना थोडेसे वेगळं जगणं,जगण्यात एक वेगळीच गोडी निर्माण करतं. अगदी दोन पायांच्या प्राण्यामधून बाहेर येऊन माणसात आल्यासारख वाटणं अस म्हणतात ते हेच.

आम्ही सर्वजण ( धागा समूह)  दुसऱ्या दिवशी दुपारी १२ पर्यंत हेमलकसा येथे पोचलो, फ्रेश झाल्या बरोबर  थोडा वेळ आराम करून पूर्ण प्रकल्प पहिला , Amte Animal Ark ( प्राण्यांचे अनाथालय) पाहायला मिळाले. त्याच्या विषयी सर्वाना माहिती आहे म्हणून मी जास्त लिहीणार नाही. प्रकल्प पाहत असताना आम्ही तेथील  निवासी शाळेकडे पोचलो बहुतेक मधली सुट्टी झालेली असावी, सर्व मुले वर्गातून मैदानातून बाहेर पडत असताना दिसत होती, त्यातील एकाने कुतूहलाने आणि निरागस पणे विचारले तुम्ही कुठून आला आहात? त्यांच्या त्या बोलण्यात खूप नम्रता होती.  नाहीतर कुठे कुणाला भेटलो तर खोडकर आणि हट्टीच मुले भेटायची. पण इथे चित्रच वेगळं होतं, आणि नंतर लक्षात आले कि यांचा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध नसल्याने त्यांच्या मधे निरागसकता टिकून राहिली आहे. हि सर्व मुले म्हणजे माडिया गोंड आदिवासी समाजातील विद्यार्थी. यांच्या विषयी पुस्तकामधे वाचले असेल किंवा हेमलकसा वरच्या माहितीपटा मधे तुम्ही पाहिलं असेलच. 
याना असं मैदानावर पाहताना त्याच्या चेहऱ्यावरची निरागसता कॅमेरा मधे टिपायचा मोह मला आवरला नाही.

हेमलकसा मधला पहिला दिवस प्रकल्प पाहण्यात आणि इथल्या कार्यकर्त्याच्या भेटीमधे आणि गप्पांमधे गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता वॉल पैंटिंगच्या कामाला सुरवात केली, त्यादिवशी शनिवार असल्याने तेथील विद्यार्थ्यांना दुपारनंतर सुट्टी होती. म्हणून विद्यार्थ्यांना घेऊन वॉल पैंटिंग आम्ही करणार होतो. आम्ही चित्रे काढत असताना काही विदयार्थी तेथे आले, त्यांनीही आमच्या बरोबर चित्रे काढायला सुरवात केली. सर्वांचा चेहऱ्यावरचा उत्साह आणि चिकाटी वाखाणण्याजोगी होती. सकाळी १० वाजता केलेली सुरवात ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच पर्यंत सलग १९ तास या भिंतीचे रंगवण्याचे काम चालले, मुलेही रात्री १० पर्यंत चित्रांमध्ये रंग भरण्यात व्यस्त होते,  सर्व मुले-मुली रंगवताना चित्रांमध्ये गुंतली होती अगदी स्वतःच्याच  जगात, फोटो मधे दिसेल तुम्हाला. 


आकाश, नम्रता, वैभव, सिमरन, राधा अशा कमीत कमी ३० जणांचा यात सहभाग होता.एकूणच खूप मित्र-मैत्रिणी झाल्या या भिंतीमुळे, निर्मितीचा आनंद निराळाच त्यामुळे त्यांचे या भिंतीशी एक वेगळंच नातं निर्माण झालं आहे. त्यांच्याकडे त्यांच्यासाठी आयुष्यभर पुरणारी एक प्रेरणा किंवा आठवण मिळाली, का कुणास ठाऊक पुढे चालून माझ्यासारख्याला जगणं शिकवतील. 

वॉल पैंटिंगसाठी संधी दिल्या बद्दल अनिकेत दादा आणि  समीक्षा ताई यांचे खूप खूप आभार. 

आमचे वॉल पैंटिंगचे काम संपल्यावर सकाळी ६: ३० च्या बस ने परतीच्या प्रवासाला जायचे ठरले होते. पहाटे  ५ वाजता काम संपल्यावर आम्हाला विलास मनोहर यांनी बनवलेला चहा प्यायला मिळाला. हो तेच विलास मनोहर ज्यांचे " मला न कळलेले बाबा" हे बाबा आमटे यांच्या वर लिहिलेले पुस्तक   "नेगल" ,"नेगल (भाग २) : हेमलकशाचे सांगाती" , "एका नक्षल वाद्याचा जन्म"  या पुस्तकाचे लेखक. बाबा आमटे याच्याविषयीची खूप माहिती व त्याच्या काही कवितांची ओळख  मला "मला न कळलेले बाबा" या पुस्तकातून झाली, अगदी बाबा आमटे-आनंदवन यांच्याशी जोडला गेलो तो या पुस्तकामुळेच . खूपच प्रेणदायी पुस्तक आहे हे. माझा स्वतः बद्दलचा दृष्टिकोन खूपच बदलत  गेला. त्यामुळे एक वेगळाच आदर त्यांच्याबद्दल आहे. अतिशय गोड माणूस, तस त्यांना मी हेमलकसा वरील माहितीपटात पहिले होते आणि त्यांची पुस्तके वाचली होती म्हणून त्यांचं बोलणं ऐकताना असं कधीच वाटले नाही कि या व्यक्तीला आपण आज भेटतोय, पुस्तकामधून संवादाला सुरवात झाल्यामुळे असे झाले असावे. बोलताना अगदी लगेच कनेक्ट झालो. आकाशापर्यंत पोचलेली आणि जमिनी वर पाय ठेवून वावरणारी माणसं, यांच्याविषयी काय लिहिणार. रोज आपण २ पायाच्या प्राण्यांमधे आणि सिमेंटच्या जंगलात वावरतो आणि अचानक एखाद्यादिवशी अशी माणसं भेटतात. जगायला एक वेगळीच दिशा देतात. म्हणजेच दुसऱ्यासाठी आनंद शोधता शोधता स्वतः मधे आनंद शोधण्याची किंवा जगण्याची कला नकळत शिकवून जातात.
तो पहाटे ५;३० वाजता त्यांनी बनवलेला चहा आयुष्यभर कामामधे  उत्साह आणणारा आणि इतरांसाठी काहीतरी करण्यासाठी एक  प्रेरणादायी आठवण म्हणून राहणार आहे. 
 - प्रमोद ( धागा कार्यकर्ता  )

Wednesday, February 1, 2017

जेव्हा आपण प्रेम करतो

जेव्हा आपण प्रेम करतो,
तेव्हा आपल्या शर्टाला खिसा नसतो.
आपण असतो कोणी अनोखे
 जादूगार, कंडम बरगडय़ांत,
गंध उतू जाणारी फुलबाग फुलविणारे.

मग पुढे जीभ भाजते, ओठ करपतात.
तोंडात दाटून येते कडू द्वेषाची थुंकी,
पण तो थुंकत नाही जगावर.
एकदा तरी गिळून टाकतो समजुतीने.
कारण तिने शिवले असतात तिच्या
 राजाचे दोनच फाटलेले शर्ट पुन:पुन्हा
 आणि तिच्या ठिगळ लावलेल्या पदराने
 त्याने सांधले असते एक आभाळ
 - मंगेश पाडगांवकर