उडाया पांखरांसाठी, जरा आभाळ ठेवावे II१II
घराला उंबरा राहो, पेटती राहू दे चूल
कुण्याही मायपदराशी खेळते राहू दे मूल II२II
फुलांचा भार ना व्हावा, कधीहि कोणत्या देठा
चालत्या पावलांसाठी, असू दे मोकळ्या वाटा II३II
तान्हुल्या बाळओठांचा, तुटो ना दे कधी पान्हा
असू दे माय कोणाची, असू दे कोणता तान्हा II४II
चालता तिमिरवाटेने, सोबती चांदणे यावे
घणांचे घाव होताना, फुलांनी सांत्वना द्यावे II५II
कितीही पेटू दे ज्वाळा, जळाचा जाळ न व्हावा
बरसत्या थेंबथेंबांचा, भुईतून कोंब उगवावा II६II
अनंता येवढे द्यावे, भुईचे अंग मी व्हावे
शेवटी श्वास जाताना, फुलांचे रंग मी व्हावे II७II
- लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी
No comments:
Post a Comment