Amazon

Saturday, November 24, 2012

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता
स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर,
– मला वाटते क्षणभर फुटतो
दगडाला इच्छेचा अंकुर.

ऊन हिवाळ्यांतिल हळदीचे
किरिट घालते वृद्ध वडावर !
– मला वाटते तळ्यांत पाहुन
हात फिरवितो तो दाढीवर!

ऊन हिवाळ्यांतिल कुडकुडते,
कुशीत शिरते दिसतां डोंगर;
– मला वाटते त्यालाही मग
गरम झऱ्याचा फुटतो पाझर.

ऊन हिवाळ्यांतिल भुळभुळते
आजीच्या उघड्या पाठीवर;
– तिच्या भ्रमाला गमते आपण
पुन्हा जरीचा ल्यालो परकर.

ऊन हिवाळ्यांतिल हिरमुसते;
रुसते; अन माळावर बसते;
– मला वाटते त्यालाही पण
असेच भलते वाटत असते


विंदा करंदीकर

No comments:

Post a Comment