दिनूचे बिल
दिनूचे
वडील डॉक्टर होते. दिनू कधीकधी त्यांच्याबरोबर दवाखान्यात जात असे. तेथे
पुष्कळसे लोक येत. कोणीतपासून घेण्यासाठी येत. कोणी औषधे घेण्यासाठी येत.
कोणी म्हणे, "डॉक्टर, माझं पोट दुखतंय. मला तपासा."तर कोणी म्हणे,
"डॉक्टर, माझं बिल किती झालं ते सांगा."
दिनू एका लहानश्या खुर्चीवर बसून ते सारं पाहत असे व ऐकत असे. दवाखान्यातल्या ...बऱ्याचशा गोष्टी त्याला आताकळू लागल्या होत्या, पण "बिल" म्हणजे काय, हे त्याला अजून कळले नव्हते.
दिनूने एकदा वडिलांना विचारले, "बाबा, बिल म्हणजे काय हो?"
डॉक्टरांनी टेबलावरचा एक कागद घेतला आणि दिनूला दाखवला. "हे बघ. याला म्हणतात बिल. वाच!"
दिनू तो कागद वाचू लागला. त्यावर लिहिलं होतं -
रोग्याला तपासण्याबद्दल ... १० रुपये
दोनदा घरी येण्याबद्दल ... २० रुपये
आठ वेळा औषधांबद्दल ... ८ रुपये
_________________________
एकूण ... ३८ रुपये
दिनू ते बिल कितीतरी वेळ वाचत होता. तो एकदम मध्येच हसला. त्याला काय
वाटले कोणास ठाऊक? काहीतरीविचार त्याच्या डोक्यात आला. घरी गेल्यावर दिनू
आपल्या खोलीत गेला आणि एका कागदावर त्याने आपल्याआईच्या नावावर एक बिल
तयार केले. त्याच्यावर लिहिलं होतं -
आज बागेतून फुले आणल्याबद्दल ... ५० पैसे
बाळाला दोन तास सांभाळल्याबद्दल ... २ रुपये
शेजारच्या काकूंकडे निरोप दिल्याबद्दल ... १ रुपया
दुकानातून साखर आणल्याबद्दल ... ५० पैसे
__________________________________
एकूण ... ४ रुपये
ते बिल त्याने आपल्या आईच्या खोलीत नेऊन ठेवले. दुसऱ्या दिवशी दिनू सकाळी
लवकर उठला. त्याच्या उशाशी४ रुपये ठेवलेले होते. दिनूने ते उचलले.
तेवढ्यात तेथे ठेवलेला एक कागद त्याला दिसला. त्यावर काहीतरीलिहिलेले
होते. त्याने कागद उचलला व चटकन वाचला. आईने दिनूच्या नावावर एक बिल तयार
केले होते.
लहानपणापासून आतापर्यंत वाढवल्याबद्दल ... काही नाही
चारदा आजारपणात दिवसरात्र जागून काळजी घेतल्याबद्दल ... काही नाही
गोष्ट सांगून करमणूक केल्याबद्दल ... काही नाही
वाचायला शिकवल्याबद्दल ... काही नाही
_________________________________________________
एकूण ... काही नाही.
दिनूच्या डोळ्यात एकदम पाणी आले. त्याचा गळा भरून आला. त्याच्या हातातला
कागद गळून पडला. ते पैसेघेऊन तो तसाच आईकडे धावत गेला. काही न बोलता
त्याने आईला पैसे परत केले, व तो आईच्या मांडीवर डोकेठेवून रडू लागला.
आईने दिनूला कुरवाळले. आणि त्याचा मुका घेत ती म्हणाली,
"तुझ्या बिलाचे पैसे पावले बरं, दिनू!"
----- आचार्य अत्रे
No comments:
Post a Comment