Amazon

Monday, December 22, 2014

मानवतेचा अभय साधक

सामान्यत्वातून साधक होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नाही. यासाठी कुठल्याही साधकाच्या अंगी साधना असावी लागते अन् या साधनेसाठी आवश्यक असते कठोर उपासना. या दोन्हीचा आधार लाभला, की मग साधकाची वाटचाल सुरू होते नवसर्जनाच्या दिशेने. या संपूर्ण प्रवासात काय गमवायचे आहे आणि काही कमवायचे आहे, ही भावनाच गळून पडते अन् एका विशिष्ट निर्धाराने निघालेल्या या साधकाला एक अशी स्थिती प्राप्त होते, जेथे त्याला बघून इतरांचे हात जुळतात, हृदये एक होतात, लाखो स्वप्नधुंद ज्वालांचे हितगुज तेथे चालते अन् अतिथी म्हणून आलेला प्रत्येक आनंदी किरण तेथील रहिवासीच होऊन जातो. मानवतेचा अभय साधक म्हणून ओळखल्या जाणार्‍या बाबा आमटेंचे वर्णन याहून वेगळे ते काय करता येईल. 
सहा कुष्ठरोगी, १४ रुपये रोख, १ आजारी गाय व सरकारकडून मिळालेली ५0 एकर नापीक जमीन या एवढय़ा ‘मालमत्ते’च्या बळावर कुष्ठरुग्णाच्या अंगावरील दृश्य स्वरूपातील व समाजाला लागलेल्या अदृश्य स्वरूपातील आजारावर उपचार शोधण्यासाठी निघालेला हा अवलिया खरंच या शतकातला रिअल हीरो. आज बाबा आमटेंचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत असताना त्यांच्या कर्तृत्वाने उजळलेल्या साहसकथा या नव्या पिढीलाही कळल्या पाहिजेत.
बाबांना एक नवा, निरोगी व सशक्त समाज घडवायचा होता व त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायची तयारी होती; परंतु बाबा या विचारापर्यंत कसे पोहोचले, हे जाणून घ्यायचे असेल, तर आधी त्यांच्या बालपणात डोकवावे लागेल. 
मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटेंचा जन्म वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील ब्राह्मण जमीनदार कुटुंबात डिसेंबर २६ डिसेंबर १९१४ रोजी झाला. वरोड्यापासून पाच-एक मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले. बाबांनी नागपूर विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेऊन १९३४मध्ये बी. ए. व १९३६मध्ये एल. एल. बी. ही पदवी संपादन केली. डॉक्टर होऊन समाजाची सेवा करावी, असे बाबांचे विचार होते; परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली; पण असाध्य गोष्टींना स्वत:हून सामोरे जाण्याच्या आव्हानात्मक वृत्तीमुळे या विलासी आयुष्यात मन काही लागत नव्हते. अखेर मनाचा निर्णय पक्का झाला व एक दिवस मोहाचे हे सर्व पाश तोडून त्यांनी थेट गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमाची वाट धरली. यापुढचे आयुष्य कोणत्या दिशेने जाईल, याचा काहीच थांग लागत नसताना एका पावसाळी संध्याकाळी अचानक त्यांना त्यांच्या जीवनाची दिशा गवसली.  बाबा कुठून तरी परतत असताना एका गटाराशेजारी कुष्ठरोगाने पीडित असलेलं एक जणू जिवंत प्रेतच बाबांना दिसलं आणि अनामिक भीतीने ते चक्क पळून जायला लागले; परंतु काही वेळ प्रचंड अस्वस्थतेत घालविल्यानंतर माघारी फिरले अन् त्या कुष्ठरोग्याला उचलून घरी आणून त्याची जमेल तशी सेवा केली. हीच घटना बाबांच्या आयुष्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. पुढे त्या कुष्ठरुग्णाचा मृत्यू झाला; पण या मृत्यूनेच जणू बाबांच्या आयुष्यात एक चैतन्याचं गुपित उलगडल.ं. जिथे भीती आहे, तिथे प्रीती नाही; जिथे प्रीती नाही, तिथे परमेश्‍वर असूच शकत नाही, या निष्कर्षाप्रत बाबा पोहोचले व त्यांनी यापुढचे संपूर्ण आयुष्य कुष्ठरोग्यांसाठी झोकून द्यायचे ठरवले. 
जीवनात कुठलीच आशा शिल्लक नसलेल्या कुष्ठरोग्यांसमवेत बाबांनी अर्मयाद श्रमांतून पडीक माळरानावर ‘आनंदवन’ फुलवले तत्कालीन समाजात कुष्ठरोग हे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जाई. यामुळे कुष्ठरोग्यांस वाळीत टाकले जाई. हे चित्र तर बाबांच्या प्रयत्नांनी बदलायला लागले होते; परंतु अवघ्या समाजाला कवेत घेऊ पाहणारा वर्ण व वर्गातील दुजाभाव, श्रीमंत व गरिबांत विस्तारणारी दरी त्यांना अस्वस्थ करीत होती. या सामाजिक आजाराचाही बंदोबस्त करावाच लागेल, असा एक नवा निर्धार बाबांनी केला व राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी १९८५मध्ये ‘भारत जोडो’ अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. या अभियानाच्या निमित्ताने त्यांनी भारतभ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवले आहे.
नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल १२ वर्षे नर्मदेकाठी मुक्काम करून बाबांनी या आंदोलनाला सामाजिक चळवळीचे रूप प्राप्त करून दिले. ‘देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे’ या कवितेच्या ओळींना वास्तवात उतरवत केवळ कुष्ठरोग्यांसाठीच नव्हे, तर अंधांसाठी, मूकबधिरांसाठी विशेष शाळा उभारल्या. कुष्ठरोग्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी महाविद्यालयाचीही स्थापना केली. प्रौढ व अपंगांसाठी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम असे व्यवसाय प्रशिक्षण सुरू करून त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. शेती व त्या अनुषंगाने येणारे दुग्धशाला, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन आदी कुटीरोद्योगही सुरू करून दिले. अशोकवन (नागपूर), सोमनाथ (मूल) या ठिकाणीही उपचार व पुनर्वसन केंद्रे स्थापन केली.  बाबा प्रत्यक्ष समाजकार्यात नसते, तर मोठे साहित्यिक म्हणून समाजासमोर आले असते, इतके त्यांचे साहित्य दज्रेदार आहे. सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले असतानाही त्यांनी ‘ज्वाला आणि फुले’ आणि ‘उज्‍जवल उद्यासाठी’ हे काव्यसंग्रह लिहिले. यांतून त्यांच्या साहित्यिक गुणांसह समाजकार्यावरची निष्ठाही दिसून येते. मनस्वी संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमता, धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवले ते साध्य करण्याची निश्‍चयी वृत्ती या बळावर बाबांनी देशाच्या सामाजिक इतिहासात आपला एक वेगळा ठसा उमटवला.  
९ फेब्रुवारी  २00८ रोजी वरोडा येथील निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने बाबांचा हा दिव्य प्रवास लौकिकार्थाने थांबला असला, तरी कृतीतून मात्र तो अजूनही सुरूच आहे. आज बाबांच्या पुढच्या पिढीतील (डॉ. प्रकाश आमटे, विकास आमटे व त्यांचे कुटुंबीय) विविध प्रकल्पांच्या माध्यमातून बाबांनी शिकवलेल्या निष्ठेनेच समाजकार्याचा हा वसा सांभाळत आहेत. बाबा आपल्या कवितेतून म्हणायचे..
‘मला ठाऊक आहे,
हे सामान्य माणसाचे शतक आहे.
न्यायोचित माणसाला, अन्याय्य व्यवस्थेत
जागा एकच : तुरुंग किंवा मृत्यू
तुरुंगाबद्दल मला प्रेम आहे
आणि मृत्यूचे मला भय नाही.’
जीवनाचे सार्थक करणारे असे साधे व सोपे तत्त्वज्ञान सांगणार्‍या बाबा आमटे नावाच्या मानवतेच्या अभय साधकाने दाखवलेल्या या विधायक मार्गावर आपला समाज दोन पावले जरी पुढे चालला, तर हीच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोपानिमित्त बाबांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.
 

No comments:

Post a Comment