ओल्या ओल्या दिशा, पावसाळले आभाळ
चिंब चिंब ओली ओली रम्य सायंकाळ
कोवळे कौळे ऊन ऊन रेंगाळत आले
हिरवे हिरवे पानंपान सोनेरी झाले
पातन् पात गवताची चैतन्याने सजली
माळ रान डोंगर दरी आनंदाने भरली
ओढ्याच्या ओघातला घनगंभीर निनाद
धवलशुभ्र उसळलेला स्वच्छंदी आल्हाद
उधळलेल्या थेंबांचा वार्यातला प्रवास
लुसलुसीत हिरवाळीचा गवतपाती वास
तुषारांच्या अंगकांती चिकटलेले सोने
प्रपाती कल्लोळाने भारावलेली मने
काळ्याकुट्ट कातळाचे पाझरते हृदय
जगा सांगे जीवनाचा आनंदी आशय
गडगडणारे काळे ढग जरी दाटले नभी
कडेकपारी रानकेळी अंग झोकुन उभी !
वठलेल्या फांदीवरती शेवाळी चादर
नव जीवन जणू करते वार्धक्याचा आदर !
नाजुकनार वेलींना आभाळाचा ध्यास
फांदी फांदी डहाळीतून त्यांचा प्रवास
लुसलुशीत वेली घेती कमनीय हिंदोळा
पारदर्शी तुकतुकीत रंग हिरवा कोवळा
ऊन ऊन धाग्यातुन थेंब थेंब ओवलेले
वार्याचे अंतरंग सोन पिवळे झालेले
पानांच्या कांतीवर पिवळी पिवळी कल्हई
धबाबाच्या फेसावर सोन्याची नवलाई
इवल्या इवल्या थेंबांवर उतरले ऊन
सप्तरंगी इंद्रधनुष्य आले साकारुन
सात रंगी कमानीची टोके डोंगरात
हिरव्या निळसर ऊंच ऊंच झाडाझुडपात
आकाशी कागदावर थेंब थेंब रंगारी
मावळतीच्या ऊन्हातुन सप्तरंग चितारी
काळ्या ढगाला रेललेली ऊन्हाची शिडी
दिव्यतेची दिमाखदार दैदिप्यमान उडी
ओघळत्या सुवर्णाची पाहून पागोळी
मनातल्या कुबेराची अळी मिळी गुपचिळी !
आश्चर्याने आ वासुन रंग रंग टिपावे
निसर्गाचे अंतरंग स्तब्धतेने पहावे
हिरव्या हिरव्या रंगांच्या किती किती छटा
झाड, झुडुप, गवत, पान, वेलींच्या बटा
वाट संपल्या वेलींचा खुंटला प्रवास
ऊन ऊन धाग्यांवर चढायचा प्रयास
पावसाच्या चादरीवरती वार्याची उडी
नवीन तलम कापडाची विस्कटलेली घडी
काळ्या काळ्या ढगाच्या थेंब थेंब हृदयात
ऊन स्पर्श फुलवतो चैतन्याची रुजवात
गवतमाथी सांडलेले ऊन्हाचे शिंपण
भिरभिरत्या चतुरांचे तयावरती रिंगण
भरकटलेल्या थेंबांची वार्यावर उधळण
मावळत्या प्रकाशाचे भरडलेले दळण !
सोनेरी प्रकाशाचा आनंदी आल्हाद
देखण्या दैदिप्याने साधला संवाद
मित्रांच्या सोबतीमधली स्वछंदी रंगत
कोकणातल्या पावसाची झकास संगत
No comments:
Post a Comment