Amazon

Wednesday, February 14, 2018

खयालोंका आबाद शहर ....



आठवण यावी अस जास्त काही घडलं नाही,
पण ज्यावेळी मनासारखे रंग कैनव्हासवर उतरायचे तेंव्हा वाटायचे लगेच तुला दाखवावं.
तर कधी रानातल्या चिंचेच्या झाडावर चिंचा काढुन देणारं कोणी नसतं आणि बोराच्या झाडाखाली बोरंही तशीच पडलेला असतात, त्यावेळी वाटायचं आपल्या पिशव्या भरल्या असत्या चिंचा आणि बोरानी.
कधी सकाळी सकाळीच सायकलची रपेट करताना घामाने भरलेल्या चेहऱ्यावर अचानक वाटेतील एखाद्या नदी- तलावामुळे थंड झुळुक यायची, वाटायचं हा आनंद सोबत अनुभवावा.
कधी एखाद्या नामवंत लेखकाचे एखादे टाळी मिळवणारं  वाक्य किंवा वाचकाला आपुसकच"वा" म्हणायला लावणारं वाक्य वाचलं की वाटायचं तुला ऐकवावं आणि लगेच टाळी घ्यावी.
तर कधी सकाळी 6 वाजता बाइक वरून जाताना तो सतत पडणारा पाऊस काटे बोचल्यासारखा वाटायचा त्यावेळीही वाटायचं तुलाही हे काटे आवडले असते.
तर कधी भंडारा डोंगरावर सुर्य बुडत असताना दिसायचा त्यावेळी आकाशाचा झालेला जांभळा रंग...वाटायचा हाही तुझ्यासारखाच सर्वांच्या आनंदात रंग भरतोय.
तर कधी पोर्णिमेच्या रात्री मोकळया आकाशात शरीर आराम करायचं त्यावेळी समोर डोळे दीपवून टाकणारं आणि शहराच्या झगमगाटात हरवलेलं पांढरशुभ्र तारांगण दिसायचं आणि वाटायचं तुला दिसत असेल का हे सर्व.
तर कधी एखादे सात्विक नाटक पाहताना जेव्हा नायकाचे एक एक वाक्य हृदयाला भिडायचं आणि मनात साचलेल्या कचऱ्याला मोकळी वाट करून द्यायचं त्यावेळी वाटायचं की तुला सांगावं 'अस नाटक असतं.. अस नाटक असतं !!'
तर कधी बालगंधर्व नाट्यगृहाबाहेर नाटक पाहायला आलेली, ज्यानी त्यांच्या आयुष्यात चांगले वाईट अनुभवलेली आणि उतारवयातही त्याच जोमाने प्रेमाला नवीन आकार देणारी उत्साही चेहऱ्याची वृद्ध जोडपी पाहिली की वाटायचं तुलाही जगण्यातला खरा आनंद पाहायला मिळाला असतां.
- स्वगत  लिहिण्याचा प्रयत्न