Amazon

Thursday, May 26, 2016

सोमनाथ श्रमसंस्कार शिबीर - २०१६

                    मी जेंव्हा  बी.टेक मधे होतो  त्यावेळी बाबा आमटे यांच्यावर लिहलेल अनेक लेख वाचले होते, तेव्हापासून मला त्यांनी कुष्ठ रोग्यांसाठी केलेले काम हे नेहमी खुपच प्रेरणादायी वाटते , त्यावेळी सोमनाथ श्रमसंस्कार शिबिराबद्दल पूर्ण माहीती नव्हती पण लोकबिरादरी प्रकल्पाची थोडीशी माहिती झाली होती आणि विलास मनोहर यांचे  नेगल पुस्तकाबद्दल  खुप ऐकले होते. म्हणून एक दिवस पुण्यात असताना असेच पुस्तकें शोधत होतो  आणि सहज  विलास मनोहर यांचे  "मला न कळलेले बाबा" हे पुस्तक दृष्टिस पडले. ते पुस्तक वाचल्यावर मला बाबांच्या कार्याची माहिती मिळाली. हे पुस्तक माझ्यासाठी खुपच प्रेरणादायी ठरले, त्यानंतर मी जिथे जिथे बाबां बद्दल माहित मिळत गेली ती मी गोळा केली,  "मला न कळलेले बाबा" ह्या पुस्तकात बाबांच्या कविता संग्रहतील काही कविता होत्या व त्यांचे संदर्भही विलास मनोहर यांनी खुप चांगल्या रीतीने दिले होते. अशा पद्धतीने माहिती मिळवत गेलो तशीच सोमनाथ श्रमसंस्कार शिबिराबद्दलही  माहिती मिळाली, सुरवातीला नवीन जॉब असल्यामुळे सुट्टी मिळत नव्हती आणि त्यावेळी मी हैदराबादला  असल्यामुळे महाराष्ट्रातील घडामोडी बद्दल संपर्कही तुटला होता आणि त्यातच २ वर्ष गेली, मे २०१४, मधे  पुण्यात आल्याबरोबर थोडासा संपर्क वाढला, तसही स्थिर होण्यासाठी सहा महीने गेलेच. आणि तशातच रजिस्ट्रेशन तारीख लवकर निघून गेल्यामुळे 'मे २०१५' चे  शिबिर हुकले. त्यानंतर  पूर्ण वर्ष वाट पहावी लागली, आणि ह्यावेळी फेसबूकमुळे संपर्कही चांगले झाले, आणि ऑफिस मधुन  रजा ही मिळाली आणि शिबिरामधे सहभागी होण्याचे सर्व अडथळे दूर झाले.

               शेवटी पुणे ते सोमनाथ (चंद्रपुर) प्रवासाचा दिवस उजाडला. ऑफिसमधे लवकर काम आटोपले आणि शुक्रवारी संध्याकाळी प्रवासाला सुरवात केली. शनिवारी संध्याकाळी ५ पर्यन्त पोहोचायचे होते, आमची बस लेट झाल्यामुळे  आम्ही ५:३० पर्यन्त मूल बस स्थानकाजवळ पोचलो. तिथे  शिबिरार्थीच्या स्वागतासाठी  जलपानाची व्यवस्था केलेली होती. ते झाल्यावर मूल वरुन सोमनाथला जाण्यासाठी संयोजकानी बसची व्यवस्था केली होती. सोमनाथला पोचल्या पोचल्या बांबूच्या वस्तुनी सुशोभित केलेली कमान स्वागतासाठी तयार होती.


तिथे पोचल्यावर पाहिले तर सर्व अनोळखी चेहरे दिसत होते, काही नोंदणी कक्षा मधे होते, काही जण संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीत होते. काही शिबिरार्थी लवकर आल्यामुळे त्यांना कामाची संधी मिळाली होती. ते सर्व काम स्वच्छेने करत होते.

दिवस  पहिला :-
                        आदल्या रात्रीच दुसऱ्या दिवशीचं वेळापत्रक दिले होते, त्यात ठरल्याप्रमाणे पहाटे ४ वाजता उठायचे होते, पहिला दिवस असल्यामुळे उठताना थोड़ा आऴस होता. उठलो कसेतरी पण बाहेर येताच पहाटेचा गार वारा सुटला होता ( तशी गार हवा नंतर दिवसभर मिळणे अवघड म्हणून त्यावेळची मजा  वेगळीच ) आणि कानावर मंद कर्णमधुर आवाजात पहाटेची गाणी,प्रार्थना , बाबा आमटे यांची काव्ये ऐकू येत होती.  "ऋणानु बंधाच्या गाठी", "शृंखला पायी असू दे" ही गीते कानावर पडत होती आणि आम्ही आळस झटकत होतो. नंतर ताजेतवाने झाल्यावर ,ठरल्याप्रमाणे चहाची वेळ झाली. चहा आटोपला की लगेच ध्वजवंदन झाले, प्रेरणागीते झाली व सोमनाथ कैंप च्या पहिल्याच दिवशी आदरणीय विकास भाऊंचे आणि भारती ताईंचे मार्गदर्शन झाले, तो क्षण म्हणजे विचारांची पर्वणीच, आणि नंतर श्रमदानासाठी आळस झटकून पूर्ण तयारीनिशी निघालो. दिवस पहिला होता म्हणून कामाबद्दल थोड़ी उत्सुकता होती, आणि त्यामुळे काम करताना लवकर थकायला झाले. त्यावेळी मनात विचार आले की शेतकरी हेच काम पूर्ण दिवसभर भर उन्हात कसे करत असतील ? त्याना तर आमच्यासारखे वीकेंड्स पण नसतात आराम करायला. खरच त्यांच्या कामाची तुलना कुठेच करता येत नाही. दूसरी प्रेरित करणारी गोष्ट म्हणजे ह्याच सोमनाथच्या जमिनीवर आदरणीय  बाबानी कुष्ठरोग्याना  सोबत घेऊन घाम गाळला होता. त्यांचे वाक्य आहे - " Give them chance not charity" - त्यांना (पीडितांना) संधी द्या, दान नको’. असे  म्हणून त्यांनी आनंदवनात बरे झालेले कुष्ठरोगीना  स्वाभिमानी आयुष्य दिले. आज जो सोमनाथचा हिरवा गर्द फुललेला स्वर्ग दिसतो तो फ़क्त यांच्यामुळेच. इथे आनंदाला पारावार उरत  नाही कारण इथे अश्रु, घाम आणि रक्त याचा त्रिवेणी संगम आहे.
बाबा श्रमा बद्दल बोलताना म्हणतात,

                                   " वेदना जाणवली नाही, तीच साधना झाली होती,
                                     श्रमाने कधी शिणलो नाही, तोच श्रीराम झाला होता .
                                     

                       श्रमदान करून आल्याबरोबर सर्वांनी स्नान उरकले, आणि नंतर जेवणाची वेळ झाली होती. तसे १० गट पाडले होते,  दररोज एका गटाला भोजन व्यवस्थेच काम होत आणि इतराना श्रमदानाचे. म्हणून एका गटाकडे पहिल्या दिवशी भोजन व्यवस्थेच काम आले होते. इथे भोजना व्यवस्थेचे काही नियम घालून दिले होते, स्वतः ताट घेउन  शिस्तीत - नवीन  रांगेत बसावे, जेवढी भूक तेवढेच घ्यावे, ताटात काही शिल्लक राहता कामा नये व स्वतः ताट स्वच्छ करावे. यामुळे भोजन व्यवस्था पाहणाऱ्याना खुप मदत झाली आणि अन्नही वाया गेले नाही. संस्काराची सुरवात ही इथूनच होते. जेवण झाल्याबरोबर नविन मित्रमंडळी सोबत थोडीशी  चर्चा झाली आणि थोड़ा आरामही केला.
                       वेळापत्रकाप्रमाणे दोन वाजता जलपान झाले आणि नंतर डॉ. सोमनाथ रोडे यांचे "बाबा आणि युवक" यावर मार्गदर्शन झाले. बाबांच्या दृष्टी कोणातुन देशाचा तरुण  कसा असावा हे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणतात - " तरुणांचे हात हे नष्ट करणारे, मारणारे नाही तर नवनिर्मिति करणारे झाले पाहिजेत. प्रवाहा बरोबर ओंडका पण वाहतो, कधी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने झेंप घ्या", पुढे युवकांना उद्देशून म्हणाले की "बघ्यांची गर्दी  जेंव्हा सहभागींची गर्दी होते तेंव्हाच क्रांती घडते आणि स्वतःला गाडून घेतल्याशिवाय नवनिर्मिती होत नाही " असे खुप प्रेरणा देणारे मार्गदर्शन झाले. त्यावेळी  मला बाबांच्या " मी  अजुन जहाज सोडलेल नाही " या कवितेमधील काही ओळी आठवल्या, 
                          "जहाजाबरोबर स्वतःला बुडवून घेणारे कर्णधार जेथे असतात
                           तेथेच बुडता देश वाचविणाऱ्या नाविकांच्या पिढ्या जन्म घेतात 

                           वाट पाहणाऱ्या किनाऱ्याना व लाटांच्या उग्र कल्लोळाला कळू द्या,
                           मी अजून जहाज सोडलेलं नाही ! "

                                   - ज्वाला आणि फुले  
                       त्यानंतर आदरणीय विकासभाऊंचे मार्गदर्शन झाले, त्यामधे त्यांनी बाबांच्या आठवणी सांगितल्या, मुरलीधर आमटे ते बाबा आमटे हां प्रवास खुपच ह्रदय भरून आणणारा होता. नंतर त्यांनी आनंदवन प्रयोगवन याबद्दल सांगितले. व नंतर त्यांनी पाणी व्यवस्थापन यावर धड़े दिले,  सोमनाथ मधे त्यांनी खोदलेली २८ शेततळी खोदली. प्लास्टिक व जुने टायर वापरून बारमाही वाहणारा नाला कसा त्यांनी कल्पकतेने बंधारा बांधून अडवला व ते पाणी नंतर १७ तलावात सोडले  आणि तेही वीज न वापरता ह्याबद्दल ते बोलले. आता सोमनाथचा तसा पाणी प्रश्न सुटलेला आहे. सद्ध्या सम्पूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ आहे तरीही सोमनाथ पाण्यासाठी स्वयंपूर्ण आहे.
                       संध्याकाळी जेवण आटोपल्यावर रोडे सर व संजय साळुंके यांनी भारत जोड़ो मधील अनुभव सांगितले. १९८५ - ८६ ची ती गोष्ट होती, एक कार्यकर्त्याने तर सम्पूर्ण भारत जोड़ो सायकल प्रवास एका पायाने केला. ही प्रेरणा कुठून आली तर ती बाबांच्या प्रेमाने व प्रेरणेने. ज्यावेळी त्यांनी पंजाब मधे प्रवेश केला- ते वर्णन खुपच चित्त थरारक होते त्यावेळी पूर्ण पंजाब पेटला होता ते वेगळ्या खालिस्तानची मागणी करत होते. हे ऐसे वातावरण होते तरीही त्यांनी  कार्यकर्त्याच्या सहभागामुळे भारत जोड़ो आंदोलन पूर्ण केले. पाहिले आंदोलन हे कन्याकुमारी ते कश्मीर असे झाले होते तर पूर्वेच्या भारतीयांच्या अग्रहास्तव त्यांनी दूसरे भारत जोड़ो आंदोलन केले हे मेघालय ते गुजरात मधे. 

दिवस दूसरा  :-

                    < will update soon>





दिवस शेवटचा :-


-प्रमोद डमरे ( नोंदणी क्रमांक ५२१ )
शिबिरार्थी, सोमनाथ श्रमसंस्कार छावणी १५ ते २२ मे २०१६.
इमेल: damarepa555@gmail.com